-: आकर्षण म्हणजे प्रेम नसतं :-

प्रेम ही एक सदाबहार गोष्ट आहे. पिढी-दर पिढी पुन: पुन्हा नव्याने उमलणारी. कथा-कविता- नाटक- सिनेमा असे अनेक वाङ्मयप्रकार ‘प्रेम’ या विषयावर वर्षांनुवर्षे पोसले जाताहेत. तरीही प्रत्येकाला आपलं प्रेम अगदी एकमेवाद्वितीय वाटतं.
काय असतं बरं हे प्रेम? काय देतं माणसांना? प्रेमाची व्याख्या करणं खरं तर कठीण. हं, प्रेमाची लक्षणं सांगा म्हटलं, तर खूप सांगता येतील. सारखी त्याची/ तिची आठवण येणं, तो/ ती जवळ असताना हृदयाची धडधड वाढणं, कानशिलं तापणं, सतत एकत्र असावंसं वाटणं, हे नि ते.. न संपणारी यादी..
प्रेम करणं आणि करवून घेणं ही तशी नैसर्गिक गरज. त्यात वावगं काहीच नाही.
हेच प्रेम जेव्हा अधिकारी बनतं, प्रेमाच्या माणसावर अधिकार गाजवू लागतं, तिथे ‘मी’पण फार तीव्र होते आणि दुसऱ्या व्यक्तीचं माणूसपण संपवून तिला मालकीवस्तू समजली जाऊ लागते. तिथे हिंसा येते. अशा नात्यात प्रेम सोडाच, माणुसकीही नसते. का होत असेल असं? कुठे चुकतं नि फसतं सारं?
मुळात प्रेम म्हणजे काय, याचीच होते गल्लत नि मग पुढे सगळं फसत जातं.
तरुण वयात प्रेम करण्यापेक्षा प्रेम करण्याच्या/ प्रेमात असण्याच्या कल्पनेवरच प्रेम असतं. त्यामुळे प्रेम करावंसं वाटण्याच्या तीव्र इच्छेपायी युवावर्ग झटकन प्रेमात पडतो. प्रत्यक्षात प्रेमाऐवजी ते आकर्षणही असू शकतं.


ख-या प्रेमात दुसऱ्याची कदर, त्याच्या/ तिच्याबद्दलचा आदर आणि त्याच्या/ तिच्या इच्छेचा मनापासून केलेला स्वीकार असतो. मग भले तो त्याने/ तिने दिलेला नकार का असेना!
आजकाल प्रेम ही ‘करण्यापेक्षा’ ‘दाखवण्याची’ गोष्ट झाली आहे असं वाटतं. कोणी कोणासाठी काय दिलं/ किती केलं, याचे हिशेब मांडले जातात नि ते वाजवून दाखवले जातात.
प्रेम म्हणजे फक्त लाल गुलाब देणं, ‘आय लव्ह यू’ म्हणणं, ग्रीटिंग्ज/ भेटवस्तू देणं नव्हे. प्रेम म्हणजे अचानक बरसलेला पाऊस नव्हे, तर मातीत रुजलेलं आणि निगुतीनं, मशागतीने वाढवलेलं रोप असतं. मशागत जितकी मनापासून, प्रेमाचं नातं तितकंच बहरलेलं/ फुललेलं. इतक्या सुंदर नात्यात हिंसेला तर थाराच नाही. प्रेमात असायला हवं ते समजावून घेणं/ देणं, चुका मान्य करणं, पुन्हा त्या न होण्यासाठी प्रयत्न करणं. दोघांनी मिळून संपन्न होणं म्हणजे प्रेम.
यासाठी हवा संयम, विचार, मानसिक खुलेपणा नि आत्मीयता. शारीरिक आकर्षण हाही एक भाग प्रेमात आहेच. तो आपल्याला नाकारायचाही नाही. पण ‘तेवढंच’ म्हणजे प्रेम नाही.
आज प्रेम हा घासून पार गुळगुळीत झालेला शब्द झालाय. पण तरीही अनुभवासा वाटणारा. खरंतर अनुभवण्याजोगाच!

जमलं तर फुलवायचं नि सांभाळायचं असतं. जमलं नाही तर, भोसकायचं नाही. जाळायचं नाही, मारायचं नाही. हृदयात हळूच जपून ठेवायचं असतं.