कधी कधी काहीच सुचत नाही… एक शून्यता साचून राहते, मनात आणि विचारात.
आपण सतत काहीतरी ठरवू पाहतो आणि ठरत नसतच काही..कोटीने आदळत राहतात विचार मनावर आणि आपण निर्विकार…!
कोणताही विचार आपल्या भावनेशी आणि मनाशी नात सांगत नसतो.आपण त्या अवस्थेत सुन्नही नसतो आणि सजगही…!
कोणाशीच काहीच बोलावंसं वाटत नसतं.. काहीच ऐकावंसंही नसतं वाटतं..आपल्यासमोर रोजचे प्रश्नच इतके असतात...
की, त्यांचा अथक विचार करून दमून जातं मन.. त्याच्याकडे एक प्रश्न नसतोच कधी.. त्याला एकही दिवस वीकली ऑफ मिळत नसतोच...
आपण खुशाल झोपतो रात्री शांत.. पण आपलं मन हुडकत राहत त्याच्यात दडलेल्या प्रश्नांची उत्तरं...
आपले ताण, यातना, सुखं-दुख्ख सारं काही त्याच्यावर टाकतो आपण… पण ते मनही थकून जातं.
बिचारं विसावण्यासाठी एक कोपरा शोधत असतं.. असह्य होतात त्यालाही ताण…
नसतात शोधायची त्याला कोणतीच उत्तरं… नसतो करायचा कोणताही विचार सुद्धा...!
----------------------------------------------------
आज मी तिला ( वेळेला ) एकाच वेळी बरचं काही विचारलं !
तुलाही सहज दोष देतात माणसं तेंव्हा कसं वाटतं तुला नेमकं? तू कशी डील करतेस या माणसांशी ?
कसं ठरवतेस ग कोणाला काय द्यायचं.. कधी द्यायचं आणि कस द्यायचं ते..?
ज्यांना काहीच देत नाहीस त्यांची काय चूक असते..? आणि ज्यांना देतेस अशांनी काय ग पुण्य कमावलेलं असतं..?
इतका टफ जॉब डेडलाईन न चुकवता पार कसा पाडतेस..? तुझी घालमेल, अस्वस्थता, निराशा कंट्रोल कशी करतेस..?
की तुला यातलं काहीच होतं नाही कधीच..?
हळूच हसली जराशी.. म्हणाली " एवढा विचार करायला वेळ नसतो रे मला... पण वेळ मिळाला तर नक्कीच सांगेन तुला.
----------------------------------------------------
मन... एक गर्भ विचार !
माणसाला मन आहे असं आपण म्हणतो. हे मन म्हणजे नेमकं काय असते ? मनात विचार आला..म्हणजे कुठे विचार येतो ? मन हा काही अवयव नाही.
ह्रदय हा अवयव आहे पण त्याचा व प्रेमाचा संबंध नाही. ते बिचारे ह्रदय रक्त पुरवठा करते, त्यात चार कप्पे असतात व त्यातील एकही प्रेयसीचा किंवा प्रियकराचा नसतो.
मग या मनाचा नक्कीच मेंदूशी indirect संबंध असावा. आपल्या मनात अनेक विचार येतात. मनात म्हणजेच ते मेंदूतच येत असावेत.
पण निरर्थक व काहीही उपयोग नसणारे विचार निर्माण करण्याची मेंदूला काय गरज ? तसं पाहिलं तर मेंदूचं काम खूप किचकट आहे व तसेच ते न उलगडणारं कोडे आहे.
जसं आपण म्हणतो कि माझ्या मनात विचार आला पण मी तसं वागलो नाही किंवा तो विचार मलाच पटला नाही,
याचा अर्थ विचार चुक की बरोबर हे आपला मेंदू पुर्वीच्या अनुभववावरुन , ज्ञानावरुन ठरवतो व काही विचार सोडून देतो काही कृतीत आणतो.
हे सगळं मेंदूच करत असेल तर मग तो त्यानेच निर्माण केलेल्या एका विचाराला महत्व देतो आणि दुसऱ्याला देत नाही हे असं का होतं ?
मन जर मेंदूपेक्षा वेगळं काही आहे हे मान्य केलं तर मग तात्पुरतं आत्मा / आंतर आत्मा वगैरे ही मान्य करावं लागेल.
पण यांचा व मेंदूचा काही संबंध दिसत नाही. मेंदू फक्त शारिरीक क्रिया प्रतिक्रिया व स्मरणातील गोष्टी यांच्यावरच कार्य करत असेल तर नक्कीच आत्मा नावाची काही तरी गोष्ट असेलच व यातच हे चुक व बरोबर ठरवण्याचे उद्योग चालत असावेत. आपल्या पंचेंद्रियांपेक्षा वेगळं एक इंद्रिय आपल्याला माहिती देत असतं त्याला आपण 6th Sense म्हणतो मग याचा व मनाचा काही संबंध असेल का ?
आपण म्हणतो एकदम डोक्यात विचार आला किंवा मनात आला तो नेमका कुठून येतो ? आपले संत महात्मे जे सांगतात तो हाच आत्मा तर नसेल ? मन...!
----------------------------------------------------
माणसाच्या जगण्याच्या मुलभूत गरजा कोणत्या? असा प्रश्न विचारला की, आपण लगेच उत्तर देतो – “अन्न, वस्त्र आणि निवारा..” याच मुद्द्यावर म्हणजे “मुलभूत गरजा आणि त्यांच्याशी संबंधित करिअर्स” या विषयावर मी पालकांच्या चर्चासत्रात बोलत होतो. करिअर कसं निवडावं आणि प्रत्यक्षात ते कसं निवडलं जातं, हा त्या चर्चेतला एक प्रमुख मुद्दा होता. आपल्या मुलांची करिअर्स निश्चित करत असताना आपल्या विचारांची दिशा नक्की कशी असावी आणि महत्व नेमकं कोणकोणत्या गोष्टींना द्यावं, असाही एक मुद्दा चर्चेत आला. मुलं तर करिअर निवडताना गोंधळलेली असतातच, पण त्यांचे पालकच कितीतरी अधिक गोंधळलेले असतात आणि भ्रामक समजांची मोठमोठी वजनदार गाठोडी त्यांच्या डोक्यावर असतात,
“समाधान, आयुष्य जगण्यातला आनंद, इतरांना वेळ देणं, स्वतःला वेळ देणं” या गोष्टी करिअर मध्ये महत्वाच्या असतात, हे कळूनही आता मागे फिरणं शक्य नाही, असल्या वाटा निवडण्यापूर्वीच विचार केला पाहिजे. पॉश आणि चकचकीत आयुष्याच्या मोहात पडून मोठमोठ्या कर्जांच्या हप्त्यांच्या ओझ्याखाली आयुष्यातली २५-३० वर्षं जगत राहणं, हे कितपत योग्य आहे? आणि याला यशस्वी करिअर म्हणायचं का?
करिअर हे असं असतं का? स्वतःच्या आवडी-निवडी, छंद, मन रमवणं या गोष्टी सोडून देण्यासाठी असतात का? एखादा कोर्स करून किंवा अभ्यासक्रम पूर्ण करून, घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं, पैसे कमावण्यासाठी नोकरीच्या भोवती गोलगोल फिरत राहायचं आयुष्यभर.. याला करिअर म्हणतात का?
सततचा मानसिक-शारिरीक ताण, कामाचा न संपणारा व्याप, व्यस्त नीरस जीवनशैली, अनियमित वेळापत्रक, वेळी-अवेळी प्रवास, सतत ऑनलाईन असणं, सततची दगदग आणि त्यामुळं आपण आपल्या आनंदापासून कायमचं दूर जाणं हे सगळं सकारात्मक आणि यशस्वी करिअरच्या व्याख्येत बसतं का?
मी प्रश्न निर्माण केले आणि ज्यांना उत्तरे मिळणार नाहीत त्यांनी माझ्याशी बोलावे असे सांगितले.... तहान असेल त्यालाच पाणी पाजावे.
----------------------------------------------------
बदलत्या नात्यांचं वादळ.....!
बालपण... शाळा... कॉलेज... नोकरी... प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे हे टप्पे...
आयुष्याच्या या सर्वच सुखद वळणांवर प्रत्येकाला भेटतात, सखेसोबती. त्यांच्याच साथीने हे आयुष्य अधिक सुंदर, समृद्ध बनतं, फुलत जातं.
या आयुष्याच्या विविध वळणांवर भेटलेल्या मित्रमैत्रिणींशी जुळलेले ऋणानुबंध काळानुरूप फुलत, बहरत जातात आणि ते आयुष्यभराचे साथी होतात.
लग्न हा आयुष्यातला असाच एक अटळ टप्पा. या टप्प्यावर भेटतो नवरा नावाने जोडलेला जीवनसाथी.
त्यामुळेच आयुष्यातील काही सखे-सोबती विस्मरणात जातात, काही जाणीवपूर्वक जपले-जोडलेही जातात.
खरं तर बदलत्या काळात, बदलत्या जीवनशैलीत कोणतंही नातं त्रासदायक ठरावं, अशी परिस्थिती नाही.
त्यामुळेच या धकाधकीच्या काळात शेअर करण्यासाठी, मनमोकळा संवाद साधण्यासाठी कुटुंबाव्यतिरिक्त कुणीतरी असावं, असं वाटणंही साहजिक.
दिवसाभरातला सर्वाधिक काळ करिअरच्या ठिकाणी जातो. काही वेळा आयुष्यातील मागच्या टप्प्यांवर भेटलेले दोस्त आवर्जून संपर्कात राहतात.
मग, केवळ जोडीदाराच्या अट्टहासासाठी हे सारेच बंध झुगारावे का ? जपलेली नाती तोडावीत का ? हा विचार ज्यानं त्यानं करणं आवश्यक आहे.
त्यामुळे परस्परांची स्पेस जपत आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता आयुष्यातील विविध टप्प्यांवर भेटणारी माणसं, जुळलेले बंध आणि मैत्री याकडे पाहिले तर बघण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदलू शकतो.
विचारांची दिशा बदलता येते, आचारांची पद्धत बदलता येते, पण स्वतःचा स्वभाव बदलने, सगळ्यांनाच येत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
माझ्या मनाची मुळं, मातीच्या रक्ताशी एकनिष्ठ राहिली असती. माझ्या विश्वासाच्या खोडाने जाणीवेचा ओलावा कायम ठेवला असता. माझ्या नात्यांच्या ...
-
कधी कधी काहीच सुचत नाही… एक शून्यता साचून राहते, मनात आणि विचारात. आपण सतत काहीतरी ठरवू पाहतो आणि ठरत नसतच काही..कोटीने आदळत राहतात विचार...
-
उत्तर महाराष्ट्र (खान्देश) मधील लग्नातील काही व्हिडिओस जे मी गावी गेलो असताना शूट केलेले... आमची बोली भाषा अहिराणी आणि आम्हाला जास्त आवडणार...
No comments:
Post a Comment