मी जर झाड असतो तर...

माझ्या मनाची मुळं, मातीच्या रक्ताशी एकनिष्ठ राहिली असती.
माझ्या विश्वासाच्या खोडाने जाणीवेचा ओलावा कायम ठेवला असता.
माझ्या नात्यांच्या फांद्यावर अनेकाच्या इच्छांची फुले-फळे बहरली असती.
माझ्या कर्तव्यदक्ष पानांनी मायेच्या सूर्यप्रकाशात नात्यांच्यां फांद्यानां सांभाळले असते.
निरागस वाऱ्यावर डूलताना माझ्या भावनांच रसायन झाडाच्या प्रत्येक पेशीत पोचलं असतंं.
ज्यांना हे झाड आहे तसं आवडलं असतं त्या सजीवानं हे झाड आपलं म्हणून निवडलं असतं.
------------------------------

कठीण असतं खरेपणानं जगणं..
एखाद्याला दिलेल्या शब्दाला जागणं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
एखाद्या साठी सहज स्वार्थ त्यागनं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
कोणतीही अपेक्षा न ठेवता वागणं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
कोणाची निंदा न करता त्याच्या मागनं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
------------------------------

माझे आजोबा अशिक्षित होते, ते आपला अंगठा स्वाक्षरी म्हणून वापरायचे.
माझे वडील शिकले होते, ते आपली स्वाक्षरी कागदपञावर करायचे.
मी माझ्या आँफीसमध्ये आत जाण्यास आणि बाहेर येण्यास अंगठ्याचा ठसा वापरतो.
सध्याची पिढी मोबाईल वर काम करायला अंगठा वापरतेय.
कळत नाही प्रगती कशाला म्हणायचे?
------------------------------

फक्त एक करा...
खुप नाराज आहात तुम्ही वेळेच्या खेळावर , काहीच करु शकत नाही आहात तुम्ही स्वबळावर.
तेव्हा फक्त एक करा.... वेळेचा हात घट्ट धरा.
प्रयत्न तुम्ही अथक करताय , विश्वासाला मनाशी धरताय पण धेय्य साध्य होत नाही.
तेव्हा फक्त एक करा.... विश्वासाचा हात घट्ट धरा.
तुमच्या अपेक्षा स्वाभाविक आहे अगदी साधारण परंतु मनाची नेहमीच उपेक्षा होते.
तेव्हा फक्त एक करा.... मनाचा हात घट्ट धरा.
------------------------------

अन् नातं जडतं ...
एखादं  माणूस आपल्या भावनांना अलगद सांभाळू लागतं..... अन् नातं जडतं.
एखाद्या माणसात कधीतरी मन अलगत गुंतलं जात..... अन् नातं जडतं.
एखाद्या माणसाचं डोळ्यांना कळत-नकळत वेड लागतं... अन् नातं जडतं.
एखाद्या वळणावर एखादं माणूस आपली काळजी घेऊ लागतं.... अन् नातं जडतं.
एखाद्या माणसाचं हसणं म्हणजे आपलं असणं होऊन जातं... अन् नातं जडतं.
आपला श्वास एखाद्या माणसाच्या असण्यासाठी आतूर होतो... अन् नातं जडतं.
एखाद्याच्या प्रेमळ सावलीत आयुष्य सहज सुखावतं.... अन् नातं जडतं.
------------------------------

समाजरूपी पोत्यातून एकदा बाल-युवारूपी धान्य निवडायला घेतले.
अर्थात... धान्य निसर्ग नियमानुसार मातेच्या उदरातूनचं आकारलं होतं. फरक एवढाच की, या धान्यांला अडचणींच्या पाऊस-वाऱ्यानं कोवळेपणातचं झोडपलं होतं.
तरी माय-बाप शेतकऱ्यांनं धान्य सावरलं आणि जपलं होतं.
तरी अपरिपक्व धान्यालां कसलीही लागण होणं सहज शक्य होतं, कारण पोत्यातलं वातावरण असुरक्षित होतं.
बिचाऱ्या शेतकऱ्यांनं किती जपलं तरी धान्यातं असंस्काररूपी कीड, भुंगे, गार-खडे होणं नैसर्गिक आणि स्वाभाविक होतं.
अस्तित्व मार्ग रुपी सुपात जेव्हा आपूलकीच्या पश्यानं पोत्यातलं धान्य घेतलं. तेव्हा सारं बाहेर आल आतलं.
मोकळ्यावर येता क्षणी कीड भुंगे लागले पळू हळूहळू...इथं आपली नासाडी प्रवृत्ती टिकणार नाही हे लागले त्यानां कळू.
धान्यात लपलेल्या खडे- गारा  निवडल्या अचूक कारण धान्याच्या साजात त्याचं योग्य नव्हतं रूप.
मग काय....बाल-युवा विकास केंद्राच्या खळ्यात धान्याला दिला प्रेमाचा वारा, अलगद वाढला की हो त्याचा तोरा.
वाऱ्यानं धान्यातलं नैराश्य झटकून टाकलं अन् धान्य कला-कौश्यल्यानं माखलं.
या धान्याचं आता बियानं झालयं अन् आता ते नावारूपात आलयं.  नवं धान्य पिकवायला कोणत्याही बिकट परिस्थितीत.
------------------------------

माणसाबाबतीत एक गोष्ट फार विशेष असते , की माणसाची वेळ सरली की त्याला सर्व काही सहज भासते.
खरंतर ... वेळ कधीच सरत नाही, फक्त  माणसाला जाणीव उरत नाही.
माणसानं कितीही पसरावं फक्त जमिनीस ( परिस्थितीस ) कधी न विसरावं.
------------------------------

अहंम नसता तर...
माणसाला माणसाचं महत्त्व सहज कळलं असतं, अहंम नसता तर.....
मनाचं मोठंपण ठेऊन सहज जुळली असती नाती, अहंम नसता तर.....
एखाद्याच्या कर्तुत्वाची राहीली असती सहज जाणीव, अहंम नसता तर.....                                                                 माणूसकीची कधीही झाली नसती उणीव, अहंम नसता तर.....
आपल्या जागेवर एकनिष्ठ राहिली असती माणसं, अहंम नसता तर....
चांगली माणसं ओळखणं फारच कठीण झालं असतं, अहंम नसता तर.
------------------------------

शक्य असते तर फाडून टाकली असती माणसाच्या मनातील संशयाची लक्तरे....देऊन त्यांच्या निरर्थक विचारांना सडेतोड उत्तरे.
पण विचार येतो , अथांग संशयात बरबटलेली ती माणसं ही उत्तरे समजण्यास पाञ असतील का?
नाहीतर... आपलाच बिरबल व्हायचा, उकीरड्यावरील डुकराला राजमहालात आणून , गुलाब पाण्याची अंघोळ घालून मखमलावर झोपवणारा.
कारण शेवटी डूक्कर उकीरड्यावरचं सुखावणार , अन् स्वतःच्या प्रवृत्तीत आपलं मन दुखावणार.
पण मन ऐकत नसतं , सगळं काही हीच अपेक्षा करत असतं.
------------------------------

"विचार"
असाच शातं बसलो होतो. अर्थात विचार करत तेवढ्यातच " विचार " समोर आला आणि म्हणाला, काय ? कोणाबरोबर आहेस !
मी ही उत्तरलो, "मी नेहमीच असतो तुझ्याबरोबर, पण आज पाहतोय प्रत्यक्ष खरोखर ".
मला भेटायला आलास तसा सर्वांना भेटतोस का रे ?
तसा थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला, माझा विचार पडलाय कोणाला ?
मी तर वेळेनूसार सर्वांकडे जातो पण जो तो मला सोयीनेच घेतो.
तरी...माझी जाणीव ठेऊन का रे वागत नाहीत सारे, मनात खोटं ठेऊन का दाखवतात खरे.
मी काही बोलणार, इतक्यात पुढे म्हणाला, "ञास होतो रे मला! जेव्हा माणसं पोसतात माझ्यामध्ये संशयाला.
मी गोंंधळून गेलो त्याची अवस्था पाहून ,मनात अस्वस्थ झालो न राहून.
जवळ येऊन म्हणाला " अरे वेड्या,  गुंतूं नकोस माझ्यात, मी स्वतःला ओवले आहे तुझ्यात.
हसतच पुढे म्हणाला " माझंही मन दाटत, फक्त कोणी मला सहज घेतलंं की वाईट वाटतं ".
"तु कसा वागतोस निःपक्ष, म्हणून आलो तुझ्यासमोर प्रत्यक्ष ".
आज नंतर जर दिसलो नाही कोणाला, तरी माणसं पाहतील तुझ्या कृतीत मला.
दिसेनासा झाला दुसऱ्या क्षणात, पण कायम असतो माझ्या मनात...सर्वाचा.....  " विचार ".
-----------------------------------------------
माणसानं धनानं मोठं व्हावं पण मनानं खोटं होऊ नये.
माणसाकडे आठवणींचे पर्व असावे पण साठवणीचा गर्व असू नये.
माणसाचं नातं अक्षय असावं पण मनात संशय असू नये.

मनोगत...

1 comment:

  1. मी जर झाड झाले तर काय या विषयावर निबंध

    ReplyDelete