आठवणीतलं नातं !...

आयुष्यात खूप काही गोष्टी करायच्या असतात. योग्य वेळी त्या करू अशी आपणच आपली समजूत घालतो, पण ती योग्य वेळ कधीच येत नाही. हळूहळू जाणीव होते आयुष्य हातून निसटून जाण्याची जशी गच्च मुठीतून वाळू सरकून जाते. प्रत्येक दिवस संपताना आयुष्य संपून गेल्याची चाहूल लागते. मग हळूच पानावलेल्या डोळ्यामध्ये येतात आठवणीतली नाती.

रक्ताच्या नात्यांपेक्षाही वेगळी, नावं नसलेली पण मनाने जोडलेली आतल्या आत जपलेली अनेक नाती आठवत राहातात. त्यातलंच एक हे एक आठवणीतलं नातं आहे. त्या नात्याला नव्हतं कधी कसलं कुंपण. ना वयाचं... ना देहाचं......ना अंतराचं...ना संवादाचं....बांधिलकी होती ती फक्त विश्वासाची आणि प्रामाणिकपणाची. 

ते नातं कधी फुलवायचं गालावरची खळी तर कधी पुसायचं गालांवर ओघळणारे अश्रू. ते नातं निर्मळ अन् निस्वार्थी होत. त्या नात्याला माहीत होता फक्त जगण्यासाठी लागणारा  "जाणीवेचा ऑक्सिजन ".
---------------------------------------

असं असावं आपलं नातं !

लाटांच किनार्‍याशी असतं, एक अशब्द नातं !
लाटा कधी.....आवेगाने रौद्र रुप धारण करून येतात... 
       कधी अक्राळविक्राळ तांडव करत येतात... 
तर कधी संथपणे एखाद्या रमणीसारख्या लयबद्ध हालचाली करत येतात. लाटांची रुपे प्रत्येक वेळेस वेगळीच !
       कधी नुसतच नितळ पाणी तर कधी मात्र त्या सोबत वाळूही.
       कधी ती येतात उचंबळत, खळखळत. तर कधी हलकेच गर्दीतून डोकावून पहाणार्‍या एखाद्या उंच माणसासारख्या मान उंचावून पाहात येतात.
        सरतेशेवटी किनार्‍याशी आल्या की लाटा शांत होतात आणि सगळी ख़ळब़ऴ बाजूस सारून शांतपणे त्याच्या मिठी एकरूप होतात.
          अन्... एकरूप नाही झाल्या तरी मागे सरुन दुसर्‍या लाटेत विलिन होते.
---------------------------------------

"नातं... मनाचं आणि भावनांच !..."

एकदा का स्वतःची हतबलता जाणवली की मग मनाला आलेली भरती डोळ्यांपर्यतं पोहोचते. कशानकशा प्रकारे तो उचंबळ बाहेर येऊ पाहतोच. आठवांचे, जाणिवांचे प्रतिबिंब, ओघळणार्‍या प्रत्येक आसवात पुन्हा दिसू लागते.

एखाद्या सरणार्‍या चित्रफितीसारखे ते क्षण आसवातून डोळ्यासमोर सरत जातात आणि मग हलकं होणारं मन त्या आसवातील क्षार विसरून पुन्हा त्याच्या नेहमीच्या जगात परतू लागतं.

मनाची जडणघडण किती विचित्र ! भावनांच आसवांशी नेमकं काय नात असावं हेच कळत नाही. कुठे ना कुठे... कधी ना कधी.... एखादी भावना मनाला एकांतात गाठतेच. मग ती त्याच्यासंगे बोलते, बोलता बोलता मनाच्या तटबंदीमागे साकळलेल्या आठवणींनां वाट मो़कळी करून देते.

अन् कळत नकळत मन भावनांन सोबतच नातं सांगत डोळ्यातून बरसतं.

नातं..... मनाचं आणि भावनांच,
जसं..... माझं आणि तुमचं !
---------------------------------------

"जिद्द........"

जिंकण्याची जिद्द, जिंकण्यासाठी प्रयत्न , जिंकेपर्यंत प्रयत्न करत राहणं, त्यासाठी लागतील ते सर्व कष्ट करणं- आणि आपल्याला कोणत्या क्षेत्रात आपलं अस्तित्व करायचं हे ओळखणं म्हणजे ‘स्वत:च्या ओळखी’पासून व्यक्तिमत्त्व विकास  किंवा चारित्र्य घडणीपर्यंतचा प्रवास.