काल पडलेलं स्वप्न....

ज्यामध्ये..मी लहान होतो कदाचित ८-९ वर्षाचा. कुठल्यातरी जत्रेत बाबांबरोबर फिरत होतो ( बाबांचा चेहरा दिसत नव्हता ).
जत्रेतली पाळणे , खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करत होतो.
बाबांकडे मी बॅट मागितली, बाबांनी ती घेतली आणि पिशवीत टाकली. पण मी हट्ट केला "बाबा.. माझ्याकले द्या".बाबांनी दिली.
पुन्हा पुढं गेल्यावर मला खेळण्यातली ढोलकी दिसली. ती ही बाबांनी घेतली आणि माझ्या पिशवीत टाकली.
जरा पुढे गेल्यावर मी खायला मागितलं. बाबांनी एक खाऊच पॅकेट घेऊन दिलं. एव्हाना माझे दोन्ही हात भरले होते. बाबांनी माझ्याकडे असलेली खेळणी पिशवीत ठेवायला मागितली पण मी नाही दिली.
पुढे आणखी फिरल्यावर मला आईस्क्रीम दिसलं. हट्ट करून मी ते सुद्धा घेतलं. पण हातातल्या इतर गोष्टी मला सोडवत नव्हत्या. दोन्ही हात भरल्यावर मात्र बाबांचा हात सोडून मी चालू लागलो. एका हाताने खेळणी सांभाळत आणि दुसऱ्या हातात असलेलं आईस्क्रीम खाता खाता मी बाबांपासून कधी दूर जात हरवलो ते मलाही नाही कळलं आणि बाबांनाही.
त्या गर्दीत बाबा कुठे दिसत नाहीत, म्हणून मी हिरमुसला झालो आणि जोरजोरात रडू लागलो. हातातली खेळणी आणि खाऊ फेकून जमिनीवर आडवा होऊन मोठ्याने रडू लागलो. इतर लोक मला शांत करण्यासाठी खेळणी देत होते, पण मी ती फेकून देत होतो. आणि "बाबा... बाबा..." करत फक्त रडत राहिलो. आता मला फक्त माझे बाबा हवे होते पण ते दिसत नव्हते.तेवढ्यात दचकून जागा झालो. आता बसून स्वप्न आठवलं आणि मनात विचार आला. आपलं सुद्धा असंच होतं. स्वार्थ साधण्यात किंवा पैसा, नाव आणि प्रसिद्धी कमवायच्या नादात आपल्या माणसांचा हात कधी सुटून जातो, ते आपल्याला सुद्धा नाही कळत.
वेळेवर भान आलं तर ठीक, नाहीतर हीच माणसं इतकी दूर गेलेली असतात, कि उरल्या आयुष्यात त्यांच्या केवळ आठवणीच आपल्याकडे उरतात. लक्षात ठेवा... "जपलं ते आपलं"*
-------------------------

जिवंत राहण्यासाठी जेवढी *अन्न* आणि *पाण्याची* गरज असते. तेवढीच जीवन जगताना *स्पर्धक* आणि *विरोधक* यांची गरज आहे.
*स्पर्धक* आपल्याला सतत गतीशील आणि क्रियाशील बनवितात.
*विरोधक* कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात.
आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम *पोषक वातावरण* तयार करतात ..
या दोघांना निर्माण करायला आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत.
हे समाजात आपल्या आजूबाजूला जागोजाग असतात.
त्यांच्यावर चीडू नका त्यांचे कायम स्वागत करा कारण त्यांच्या शिवाय जगण्यात मजा नाही.
-------------------------

जाणीव.....
खिडकीपाशी निर्विकार उभं राहून दिवसाचे आणि निसर्गाचे बदलते चिञ पाहताना जाणीव होते......
हातून काहीतरी निसटून चालल्याची.
माझ्या हक्काच्या आणि वाट्याला आलेल्या माणसांच्या सौम्य सुखदायी आठवणी आठवताना जाणीव होते...
ती माणसंच माझ्यापासून दूर होत चालल्याची.
रक्ताची नाती नसताना जे बंध घट्ट होते आता जाणीव होते.... ते बंधच सैल पडत चालल्याची.
मनाच्या बंद कप्प्यात साठवून ठेवलेले क्षण , एकांतात हळूवारपणे कवटाळताना जाणीव होते.... ते क्षणच पूसट होत चालल्याची.
मनात ओढ असेल तर भेट ही घडतेच. पण आता जाणीव होते प्रत्येक भेटीतली ओढ कमी होत चालल्याची.
मनावर झालेल्या खोल जखमांची खपली काढताच त्या भळाभळा वाहू लागतात. आणि मग जाणीव होते... त्या जखमा कधी भरल्याच नव्हत्या.
उद्याचा दिवस कधी उजाडेल या प्रतिक्षेत , आजचा दिवस कधी मावळतो हे ही कळत नाही आणि मग जाणीव होते.... हे दिवसही हातून सुटत चालल्याची.
ज्या आधाराची मला जीवनाच्या वाटेवर गरज होती , आता जाणीव होते.... तो आधारच खूप दूर गेल्याची.
कधी कधी आयुष्य माणसाला कसं एकट पाडते , याची प्रचिती येत असतानाच जाणीव होते.... मी ही एकाकी पडल्याची.
-------------------------

क्षण असे...... क्षण तसे..... !
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे..!
एकदाच बंद करावा श्वास, नि संपवून टाकावेत सारे संशयाचे वारे..
दूर लोटावा अविश्वासाचा चंद्र आणि फुंकून द्यावेत मुखवट्यातले तारे..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे..!
कित्येक क्षण असे येतात, की अनोळखी वाटतात सगळेच चेहरे..
सांगावे आपले गाऱ्हाणे कोणाला, जेव्हा आपलेच होतात बर्फ, बधीर, बहीरे..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे..!
कित्येक क्षण असे येतात, की समजत नाही काय वाईट, काय बरे..
निराशेचे कल्लोळ मनात, आटून जातात इच्छेचे झरे..
कशासाठी जगाचे? इथे कोणाचेच काही नाही खरे..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे..!
पण......
एखादा क्षण असाही येतो, की उठून ताठ उभे राहतात ढासळणारे..
पारंबीचे दोरही जिद्दीने सावरतात, कधीकधी वटवृक्ष कोसळणारे..
असा एखादा क्षणीक स्पर्श, शातं करतो मन तळमळणारे..
असा एखादा क्षणीक शब्द, तोलून धरतो अवघे आयुष्य डळमळणारे..
अशाच एखाद्या क्षणावरच जगतात माणसं, असे कित्येक क्षण मरणारे !
-------------------------

आठवण....
काही आठवणी विसरता येत नाहीत,
काही नाती तोडता येत नाहीत,
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत,
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत,
वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत,पावल अडखलली तरी चालण नाही थांबत,
अंतर वाढल म्हणून प्रेम कमी होत नाही ,
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत.
-------------------------

जन्माची सूरवात आपल्या इच्छेनुसार नव्हती आणि शेवट ही नसेल.
आपल्या इच्छेनुसार फक्त या दोघांनाही सामावून घेणारे आपले कर्म असते.
कितीही प्रयत्न केला तरी लहानपणीचा गोंडस चेहरा आणि तारुण्यातील काया कायम ठेवता येत नाही.
कायम ठेवता येतात लहानपणापासून तारूण्यापर्यत मनात निर्माण होणाऱ्या भावभावना , त्याच आपल्यातलं माणूस जगासमोर आणत असतात.
तारूण्यापासून म्हातारपणापर्यत केलेली कमाई देखील आजन्म कायम राहत नाही.
आजन्म कायम राहतात या प्रवासात जोडलेली बीनरक्ताची नाती.
ती माञ जाणीवेनेचं टिकतात.
-------------------------

माझं मन मी दिलं म्हणजेच माझं सर्वस्व दिलं. ज्याला कळलं त्यांनी संभाळलं आहे.
"मन" फक्त माझ्या मालकीचं..."शरीर" सक्रीय आकारात आलं तेव्हा आईनं संभाळलं , निष्क्रिय होईल तेव्हा चार दुसरेच खांदे संभाळणार आहेत.
जन्माला आलो तेव्हा कोणी पहिलं हातात घेतलं हे शरीराला माहीत नव्हतं आणि जाईल तेव्हा कोण घेईल हे ही माहीत नाही.
"मन" मी कोणाला दिलयं आणि कुणाकडे ते हट्ट करुन गेलयं हे खाञीनं माहित आहे मला.
कोण जपतयं आणि कोण त्याच्याशी खेळतयं हे वेळ दाखवतेय आता मला.
-------------------------

जेव्हा कधी मी तीच्या सोबत काही वेळ असतो, ती माझ्या डोळ्यांत अश्रुच आणते...कधी गोड आनंदाचे तर कधी असह्य विरहाचे.
ती कशीही असली तरी मला सुखावत असते, कारण ती कशीही असली तरी फक्त माझीच असते...मला मनाचा राजा आहेस तु हेच सांगत असते.
तिचं माझ्या सोबत आणि माझं तिच्यासोबत असणं फार जरुरीचं आहे... हा जन्म पूर्ण करण्यासाठी.
ती फक्त माझीचं आहे हे कोणाला सांगण्याची मला गरज वाटत नाही, वेळ आलीच तर सांगायला ही कोणाला घाबरणार नाही.
ती माझ्याबरोबर आहे म्हणूनच मी आज आहे. ज्या वेळेस ती माझी नसेल तेव्हा मी तीचा नसेन आणि तुमचा ही नसेन.... अशी गोड आहे माझी " आठवण ".*

यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?

आपल म्हणणं सगळ्यांना पटलं पाहिजे, आपल्या मर्जी नूसार आपलं माणूस नटलं पाहिजे.
आपलीच जागा असावी पहिली त्याच्या ध्यानी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
आपण जेवढा जीव लावला आहे त्याच्यावर, त्याची जाणीव असावी त्याच्या मनी.
प्रेमानं हलकच जवळ घ्याव त्यानं आपल्या दुःखाच्या क्षणी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
कठीण परिस्थितीचं उन्हात नकळत त्याची सावली आपल्यावर पडावी.
डोळ्यांतील अश्रू ओघळण्याआधी टीपावं त्यानी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
एकांतात असताना आपण सुखावून जाव्यात फक्त त्याच्या गोड आठवणी.
दूर असतानाही चिञ आपले सहज यावे त्याच्या नयनी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
---------------------------

सगळं काही गुपीत आहे...जणू अत्तर मनाच्या कुपीत आहे.
चेहरा कितीही तेजस्वी असला तरी...मेंदू संशयाच्या अंधाराने शापीत आहे.
सगळं काही गुपीत आहे...जणू अत्तर मनाच्या कुपीत आहे.
शरीरं म्हणजे मृगजळ फसवं...भावनांच रूप डोळ्यांतील आसवं.
सगळं काही गुपीत आहे...जणू अत्तर मनाच्या कुपीत आहे.
---------------------------

आपले " प्रेम " ज्याच्यावर आहे हे त्या व्यक्तीला माहीत असणे जरूरीचे असते... पण त्यासाठी त्याचं प्रदर्शन जरूरीचे नसते.
जसं जगण्यासाठी लागणाऱ्या श्वासाचं आणि शरीरातील रक्ताचं महत्व असतं तसचं निखळ " प्रेम " ही असावं.
प्रत्यक्षात प्रेम ही शाश्वत आणि शुद्ध भावना आहे परंतू  जेव्हा लाज, ईर्शा, अहंकार, अविश्वास, संशय, स्वार्थ, अपेक्षा या विषाणुजन्य दुर्गुणांची बाधा होते तेव्हा प्रेम अशुद्ध होते.
---------------------------

माणसं नेहमी फक्त स्वतःच्या सोयीने अर्थ शोधत असतात.
साजस चेहऱ्याने मनात धूर्त काव्याने स्वार्थ शोधत असतात.
मी असं नाही म्हटलं की.... माणसानं स्वतःच भलं साधू नये.
फक्त स्वार्थ साधताना होऊ नये की, आपल्या आजूबाजूला कोणी उरू नये.
---------------------------

व्यक्त आणि अव्यक्त दोन्हीही भावना योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.                                                                   अपेक्षित आणि अनपेक्षित दोन्हीही  घटना योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.
समर्थ आणि असमर्थ दोन्हीही स्वभाव योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.
मान आणि अपमान दोन्हीही आदर योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.
---------------------------

कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.......अन्
खोटे मुखवटे पांघरूण आजूबाजूला वावरणाऱ्या सांऱ्यांना एका क्षणात मनाच्या हद्दपार करावसं वाटतं....
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.......अन्
भावनांशी खेळ करून नात्यांवर डाव मांडणाऱ्या सांऱ्यांना एका क्षणात चित्त करावसं वाटतं.....
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.......अन्
जाणीवेची लक्तरे अविश्वासाच्या वेशीवर टांगणाऱ्या सांऱ्यांना नामशेष करावसं वाटतं..
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.......अन्
स्वतःला सगळ्यातून वेगळ करून एकांतात अलिप्त रहावसं वाटतं.
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.
---------------------------

हळूहळू वय निघून जातं...जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते...कधी कुणाची आठवण मनाला सुखावते.
आठवणींच्या आधारावर जीवन वेल बहरत जाते...वेलीला कधी फांद्या येत नाहीत..
सागराचा खजाना किनाऱ्यावर नाही येत...तोडलेली नाती जीवनात पुन्हा जुळून  येत नाहीत.
---------------------------

कधीतरी सावर मना, स्वतःला आवर मना.....
कणखर आहेस तरी असा का बरं असा अधीर होतोस ?
सर्व काही नीट ठरवलंं आहेस तरी छोटया अपेक्षांत बधीर होतोस.
कधीतरी सावर मना, स्वतःला आवर मना.....
तटस्थ  आहेस तरी का बरं असा भावनांनी भारावून जातोस ?
म्हणतोस मी राजा आहे  तरी अचानक का बरं गुलाम होतोस.
कधीतरी सावर मना, स्वतःला आवर मना....
---------------------------

मनातील भावना...

* सगळं ठरवता येत प्रत्येकाला जेव्हा स्वतःशिवाय बाकी सर्व शून्य असतं. पण अशीही वेळ येते जेव्हा शून्य महत्वाचे असतात.
कारण शून्याने संख्येचा पट वाढतो आणि माणसातील शून्याने गट वाढतो.
* राज्य तर मी ही करतो....माझ्यावर प्रेम करणाऱ्याच्या " मनावर " आणि तिरस्कार करणाऱ्याच्या " मेंदूवर "
* आयुष्यात काही कोणाला देता आलं नाही तरी "विश्वास" नक्कीच देता येतो...कारण तो जपणं आणि तोडणं हे फक्त आपल्यावर अवलंबून असतं.
* अविश्वासाच्या भोवऱ्यात" आणि "संशयांच्या वलयात" नाती विस्कटू देऊ नका. अर्थहीन क्षणभंगुर सुखानं भारावून जाऊ नका.
शब्दांत वचन देणं सर्वांनाच येतं, दिलेला शब्द पाळणं काहींनाच येतं.
* शब्द निर्जिव असूनही सजीव माणसानां शिकवतात... पण माणसं एवढी धूर्त असतात की शब्दांशी ही खेळतात.
आपण पुढं चालतो ठेऊन आंधळा विश्वास अन् ती माञ सोयीस्कर स्वार्थाच्या वळणावर वळतात.
* "नातं" हा शब्द जुळणं जेवढं सोप आहे, ते जपणं ही कठीण असतं. "नातं" हा शब्द बोलणं जेवढा सोपं आहे, ते समजणं ही कठीण आहे.
"नातं" या शब्दाची उणीव भासेल, जेव्हा तुम्हाला त्याची जाणीव नसेल.
* निस्वार्थ बुद्धीने आणि निर्मळ नजरेनं पाहिलं तर सारं "मस्त" असतं. फक्त आपल्या मनासारखं नसलं की "अस्वस्थ" भासतं.
* जन्म हा जगण्यासाठीच होतो, फक्त जगताना जाणीव असणं जरूरीचं असतं कारण जगणं जाणीवेने पूर्णत्वास जातं.
* नक्की काय मिळवतात माणसं ? जीवापाड जपणाऱ्या एखाद्याला सहज फसवून नक्की काय मिळवतात माणसं....
आंधळा विश्वास ठेऊन सर्वस्व देणाऱ्या एखाद्याला सहज फसवूण नक्की काय मिळवतात माणसं.
* वस्तू कालबाह्य असतात हे ऐकले होते, पण विश्वास देखील कालबाह्य असू शकतो या अनुभवाने मनाला दुःख झाले.

मनोगत...