माणूस आयुष्यभर जीवनाचा.....

माणसाला आयुष्यभर आपल्याला काय मिळवायचं आहे याचा निवाडा करता येत नाही.त्याला सैरभैर धावताना दिशांचं भान नसतं नि जेव्हा धावणं संपवून भिंतीला लावलेल्या शिडीवर चढून भिंतीपलीकडे नजर टाकतो तेव्हा त्याला कळून चुकते कि आपण चुकीच्या भिंतीला शिडी लावली...तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो...आयुष्यभर त्याला व्यक्तिमत्व नि चारित्र्य यातील फरक कळून येत नाही...व्यक्तिमत्व म्हणजे आपणाकडे कुणीना कुणी बघत असताना आपण जे असतो व आपण जे करतो...नि चारित्र्य म्हणजे आपणाकडे कुणीही बघत नसताना आपण जे असतो व आपण जे करतो...माणसाला जीवनात कृतार्थ (...यशस्वी नव्हे...) होण्यासाठी स्वत:च्या आतल्या आवाजाशी हितगुज करून कुठल्या तरी शिखराचा रस्ता पक्का करायला हवा...त्यावरील वाटचाल आत्मज्ञान...बुद्धिमत्ता ...खडतर परिश्रम...नि दृष्टीकोन या शिदोरीच्या बळावर पार करावयाची असते..तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तुमची अर्धी लढाई सुरु होण्यापूर्वीच जिंकत असतो...तुमचा स्वत:च्या जगण्यावर ..बोलण्यावर...चालण्यावर असलेला " विश्वास नि श्रद्धा "! परीक्षेच्या घडीला किंवा अडचणीत असताना या दोन्हीला तडा न जावू देणारा तुमचा स्वभाव...समोर येणाऱ्या सगळ्या अडचणींना समर्थपणे तोंड देणारा असेल.
---------------------------------

शक्ती.....
प्रत्यक्षात शक्ती ही प्रगल्भ संकल्पना आहे. शक्ती ही स्वतःला आणि इतरांना सांभाळण्यासाठी आहे, ध्येयाचे रक्षण करण्यासाठी आहे.
चंदनाच्या वृक्षाला सर्प विळखा घालून बसतो व तोडावयास येणार्‍यावर फुत्कार करतो. त्याप्रमाणे आपली जी ध्येये- त्या ध्येयांभोवती आपली शक्तिसर्पिणी वेढे घालून जागरूक अशी राहिली पाहिजे.
शक्तीचा उपयोग शक्तीला लगाम घालून करावयाचा असतो. शक्तीबरोबर आपण वाहून जावयाचे नाही. अग्नीने लोखंड लाल होते, परंतु लोण्याप्रमाणे लगेच वितळून जात नाही. आपण भावनावश होऊन शक्तीबरोबर वितळून जाता कामा नये. हुशार सारथ्याने काबूत ठेवलेल्या घोड्याप्रमाणे आपली शक्ती असली पाहिजे. घोड्याला लगाम घालता येतो, म्हणून घोड्याची किंमत आहे. संयम हेच खरे सामर्थ्य. सामर्थ्याला ताब्यात ठेवण्यातच खरे बळ आहे; ज्याच्याकडे धैर्य नाही, ज्याच्याजवळ शौर्य नाही, त्याला कोणी मान देत नाही; त्याप्रमाणेच संयमहीन माणसाच्या शक्तीलाही कोणी मान देत नाही. ज्याच्या कृत्यांवर विचाराचा ताबा नाही, ज्याची कृत्ये विकाराच्या ताब्यात गेलेली असतात, अशाला मान मिळत नाही.

परंतु सामर्थ्य असेल तर संयम. आधी बळ मिळवा व मग ते बळ संयमित करा. शक्तीची उपासना करा, परंतु ती शक्ती शिवाच्या आज्ञेत राहणारी हवी. शक्तियुक्त शिव व शिवयुक्त शक्ती हे ध्यानात असावे. जेथे संयमशील शक्ती आहे, तेथे मंगल असा शिव नांदणारच. मला वाटते माणसाचे पहिले कर्तव्य शक्तिशाली होणे हे आहे. आपण केवळ जवळ असल्यानेच आपल्यानां सुरक्षितता वाटेल, आपण केवळ जवळ आहोत एवढ्यानेच आपल्यांच्या वाटेस कोणी जाणार नाही- असे बलशाली व प्रभावशाली आपले जीवन झाले पाहिजे. आपला असा दरारा सर्वत्र बसला पाहिजे. असे जीवन ज्याला साधले, असे जीवन ज्याला मिळाले, तोच खरा जगला. त्याने मनुष्यजन्मात येऊन पुष्कळच मिळविले असे म्हणता येईल.
---------------------------------

जाणीव..... स्वतःची.
आपण स्वतः व भोवतालची  परिस्थिती यांतील संबंध जाणण्याची क्षमता, स्वतःचा दृष्टिकोन विचार तसेच आपण स्वतः इतरांपासून वेगळे अस्तित्त्वात आहोत असे जाणण्याची क्षमता म्हणजे जाणीव.
जाणीव... उपकारांची 
यशाबरोबर येणारा अहंकार व्यक्तीच्या अध:पतनाला कारणीभूत ठरतो. उपकारकर्त्याची जाणीव मनामध्ये सातत्याने असेल, तर ‘हे माझे एकट्याचे नाही’ हा भाव जागृत राहून माणूस अधिक नम्र होतो.
चांगल्या कामाकरिता अनेकांचा सहभाग आवश्यक असतो याचे भान ठेवावे आणि जेथे अनेकांचा सहभाग तेथेच चांगले काम सहज घडून येते.
आपल्या हातून किती चांगली कामे झाली आणि किती विध्वंसक कामे झाली, याचा कधीतरी ताळेबंद मांडून पाहा, म्हणजे आपण कोठे आहोत आणि आपल्याला काय करायचे, याची दिशा निश्चिती होईल. आपल्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अनेक जण उपकार करीत असतात. काही उपकार लक्षात राहतात, तर काही लक्षात ठेवावे लागतात.
आपल्या सुखासाठी आणि आपल्यातील गुणांसाठी आपण अनेकांचे उपकार स्वीकारत असतो. अनेकजण कळत - नकळत आपल्यासाठी बरंच काही त्याग करत असतात. आपण किमान सुखाच्या उपकाराची तरी जाणीव ठेवावी.
---------------------------------

स्वः आणि स्वभाव......
माणसाचा स्वभाव चंचल आहे.त्याला त्याच्याजवळ नसणाऱ्या गोष्टींचं अप्रूप असतं.कधी एकदा तिला मिळवितो असं त्याला झालेले असते.त्या गोष्टींच्या चिंतनात नि तिच्या प्राप्तीच्या स्वप्नात किती तरी राती त्यानं स्वत:ची झोप उडवून घेतलेली असते.पण एकदाका ती मिळाली कि त्याची  हळू हळू त्या गोष्टीसोबतची जवळीक ..तिच्यातलं गुंतणं पातळ होत जातं...पुन्हा त्याला नव्या गोष्टींचा ध्यास लागतो...म्हणून तर घरात जेवताना घरगुती जेवणाला हॉटेलची चव नाही म्हणून तो नाक मुरडतो...नि बाहेर जेवायला गेल्यावर घरगुती चांगलं जेवण कुठं मिळते याची चौकशी करतो... अशी माणसाची अगम्य स्वभाव शैली असते...एखादी व्यक्ती आपण तीला कितीही ओळखत असलो तरी कुठल्या क्षणी आपण त्याच्याबाबतच्या अनुमानाला फसू याचा नेम नसतो...त्याही पुढे , एखाद्या  व्यक्तीबद्दल कशाला ?  आपल्या स्वत:बद्दल आपण तरी खात्रीने काही ठाम भूमिका घेऊ याची हमी देऊ शकतो काय ? लक्षात ठेवा खेळात आणि जीवनात सगळेच पत्ते काही आपल्या मनासारखे सगळ्याच डावात हाती येत नाहीत..पण आलेले  पत्ते स्वीकारून योग्यवेळी नेमके पत्ते खेळून काही हरणारे डावसुद्धा जिंकता येतात...नि खरी कसोटी अश्या डावातच लागते...केवळ तुमच्या चेहरा वाचून तुमच्यापेक्षा चांगले पत्ते असणारा खेळाडू सुद्धा त्याचा होणारा डाव तुमच्या नावे करून जातो..डाव जिंकताना कधीही कुणाला फसवायचे नाही. फक्त डाव मांडताना आपल्या पुढचे मागचे किंवा बाजूचे सवंगडी आपल्यावर लोभ करणारे असावेत एवढीच काळजी घ्यायची.
---------------------------------

ज्यांच्या आठवणीनंही मन जात मोहरून, दिसला नाहीत तुम्ही तर डोळे जातात बावरून.
जाईल जेव्हा तोल माझा तेव्हा घ्यावं जरा सावरून, जाण्याआधी नक्कीच जाईन सारा पसारा आवरून.
माझ्या नसण्याची नसावी तुमच्या मनात उणीव, शेवटच्या श्वासापर्यत ठेवेन आणल्या नात्याची जाणीव.
---------------------------------

आपल्या जीवनात पदोपदी असे प्रसंग येत असतात की, ज्या वेळेस अमूक प्रकारचे वर्तन आपण करावयास पाहिजे असते.
पुष्कळ लोक आपणाजवळ चांगले वागतात; त्यांचे व आपले संबंध सलोख्याचे असतात, याचे कारण हे की, त्या लोकांना पूर्णपणे जाणीव असते की,
जर का आपण नीट वागलो नाही, समजुतीने घेतले नाही, जर का आपण योग्य मर्यादेचे अतिक्रमण करून अरेरावी करू,
तर मग कठीण प्रसंग येऊ शकतो. तर मग काही विस्कटेल. नाते तूटेल याची त्यांना भीती असते व म्हणून ते जपून गुण्यागोविंदाने आणि संयमाने वागतात. यातच जाणीव जन्म घेऊन वाढत असते.
-------------------------

पाखरांच्या पंखात बळ आलं की ती भरारी मारतात आणि सगळं विसरून सोडून भरकटत जातात.
कदाचित निसर्गाचा मोह त्यानां आवरता येत नाही. अन् पाखरंचं ती....आता माणसांंची पाखरं होऊ लागलेत.
-------------------------

नातं जपण्यासाठी कोणालाही मुद्दाम टाळण्याऐवजी स्पष्टपणे संवाद महत्वाचा असतो.
नाहीतर नाते तर तुटतेच राहीलेल्या व्यवहारी संबंधामध्ये देखील अविश्वास राहतो.
आपण एखाद्यच्या आयुष्यात काही क्षण आणि समाधान देऊन त्या व्यक्तीचं आयुष्य वाढवत नाही तर असलेल आयुष्य फुलवतो.
जर फुलवता येत नसेल तर ते विस्कटू नका.
-------------------------

आता सारं सावरण्याची वेळ झाली आहे. बरीच पडझड झाली आहे , आवरण्याची वेळ झाली आहे.
अपेक्षांच्या चिखलात माखलेल्या मनाला स्वच्छ करून आत्मविश्वासाचे चिलखत घालण्याची वेळ झाली आहे.
क्षणभंगुर नात्यांच्या मोहात न अडकता...जे खोटी स्वप्न न दाखवता प्रत्यक्ष सोबत आहेत त्यानां घेऊन नाहीतर एकटेपणाला सोबत करत प्रवास सुरू करण्याची वेळ झालेली आहे.
थोडा वेळ लागले पण सुरवात करण्याची वेळ झालेली आहे.

मनोगत...

गुपित सुप्त भावनाचं....

प्रेम...स्वतःच अस्तित्व विसरून ,फक्त तिचा विचार करणे ,आणि स्वतःला विसरून फक्त तिचं होऊन जाणं.
कधी तीनं विचारलं असतं ना कि तुला माझी किती आठवण येते का ? तर मी सांगितलं असतं तीला नजरेत नजर भरून...

मनात तू ध्यानात तू
नकळत पडणाऱ्या स्वप्नात तू
ध्यास तू विश्वास तू
आनंदी मनाचा निःश्वास तू …

पानात तू फुलात तू
पहिल्या पावसाचा सुवास तू
रागात तू प्रेमात तू
नुकत्याच फुललेल्या कळीत तू …

गाण्यात तू पाण्यात तू
आठवणींच्या गोड गोड शहाळ्यात तू
दिवस तू राञही तू
चमकणाऱ्या हजारो चांदण्यात तू …

इकडे तू तिकडे तू
दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तू
श्वासात तू आवाजात तू
भिरभिरत्या नजरेच्या शोधात तू …

वाऱ्यात तू झऱ्यात तू
बागेतल्या सुंदर पाखरात तू
माझ्यात तू माझी तू
सगळीकडे फक्त तूच तू …
-------------------------------

मनातल्या मनात  आज वाटले...

मनातल्या मनात काही तरी लिहावं वाटले,
मनातल्या मनात काही तरी बोलावं वाटले …!
काही भाव नेणीवेतले पेरावे शब्दातून,
थोडे वाहणाऱ्या या मुक्त आसवातून,
सारे मन रिते रिते करावे वाटले ….!
सरलेले हरवलेले आठवातील क्षण,
उरलेले कल्पनेतले रेखाटलेले मन,
सारे सारे ओळी ओळीतून गुंफावे वाटले …!
दोन तुमचे..दोन माझे रंगलेले काही डाव,
कधी असे कधी तसे बसलेले काही घाव,
सारेच्या सरे भाव, ठाव आता सांगावे वाटले ..!
जीवनाचे गीत गाताना विरलेले काही ताल - सूर,
कंठात अडकलेले फसलेले काही स्वर,
सारे टाहो मुक्तपणे आता फोडावे असे वाटले ..!
थोडं गुदगुदतय, थोडं खद्खदतय,
थोडं दाटतय, आठवणींचे आभाळ भरून येतंय,
सारे सोडून तोल, कोसळावे असे वाटले ..!
कुठे वीज, कुठे झीज, कुठे ओलावा मायेचा,
कुठे हार, कुठे जीत, कुठे गंध  हा जाणीवेचा,
सारे काही मनोगतातून आज सांगावे वाटले…!
हसा कुणी रुसा कुणी, कुणी वेडा खूळा म्हणा,
लढा कुणी मारा कुणी, कुणी भागा कुणी गुणा,
सारे सारे हिशोब इथेच, मांडावे वाटले …!
मनातल्या मनात खूप खूप दडलंय,
वेदनेचे पाणी अधिक अधिक काढलंय,
सारे काही आज उपसून टाकावेसे वाटले…!
सारं काही शब्दात शांत आज करावे वाटले,
मनातल्या मनात काही तरी बोलावे वाटले,
मनातल्या मनात काही तरी लिहावे वाटले…!!
-------------------------------

सांत्वन...

पानगळीत जेव्हा पानं झडू लागतात,
सांगतात तेव्हा ती फांद्यांना!

आम्ही तर आमचा मोसम जगून जातोय.
तुम्ही काळजी घ्या....
तुम्हाला तर कित्येक मोसम मुलाबाळांचा सांभाळ करून
त्यांना निरोप द्यावा लागणार आहे.

जेव्हा फांदीची वेळ आली होती तोडलं जाण्याची तेव्हा ती झाडाला म्हणाली.. स्वत:च म्हणाली-
‘माझंही आयुष्य तुला मिळो..
तुलाऽ वाढत जायचंय, उंचच उंच व्हायचंय.
माझ्या जागी येईल दुसरी, मला आठवणीत ठेवूस माझ्या जाण्यावर दुःख करत बसू नको.

मुळांना खोलवर खोदून खोदून जमिनीपासून उखडून झाडाला वेगळं करताना......
झाड तरी जमिनीला काय म्हणणार!

उलट जमिनीलाच म्हणावं लागलं....
जे शाश्वत आहे ते कधीच नष्ट होत नाही, तूला असंच नेहमी या माणसानं लुटलेलं,
पण आठवतंय, जेव्हा तुला पहिलं पान फुटलेलं ,
एका छोटय़ाशा बीजातून तू डोकावून पाहिलं होतंस ,
पुन्हा येशील, माझ्याच पोटी जन्म घेशील !
---------------------------------

आयुष्य.....

चांगले वाईट प्रसंग आणि
कडू गोड आठवण...
आयुष्य म्हणजे अनुभवांची
एक मोठी अनमोल साठवण..

"माझे आयुष्य कष्टाचे"..
असे प्रत्तेकालाच वाटे..
दिसत नाहीत जेव्हा..
दुसऱ्याला बोचलेले काटे...

आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर,
असते काही नवे...
गरज पूर्ण झाली तरी..
सांऱ्यांना अधिकच हवे...

आयुष्यावर प्रेम करणे...
हेच महत्वाचे तत्व,
कारण, मृत्यू अटळ आहे ,
म्हणूनच जन्माला आहे महत्व.

आयुष्य राहिले तर .. पैसा मिळवण्याची
देऊ शकाल हमी...
पण पैशामागे धावून धावून..
नका करू आयुष्य कमी..

आयुष्यात कधीही कायम नसते,
सुख-दुःखाची वेळ..
संकटांना भिवून .. संपवू नका,
आपल्याच आयुष्याचा खेळ..

कठीण आहे सांभाळणे,
प्रत्येक माणसाचे मन...
म्हणूनच...आयुष्यात जोडलेली  माणसं..
हेच खरे धन..

जीवनावर चिंतन करायला....
माणसाला आज वेळच नाही..
म्हणूनच आज वाटलं..
"आयुष्यावर बोलावं काही...
---------------------------------

'मी' च  'तुम्ही' होणं....
कधीच अपेक्षा नव्हती मला तुमच्या शाब्दीक स्तुतीची,
अगदी पहिल्या भेटीपासून ते आजपर्यंत,
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे,
तुमच्या बंदिस्त मनापर्यंत !
अर्थात तुमच्याजवळ काय आहे याला कधीच महत्त्व दिले नाही,
अरुप ते रूप कोणत्याही गोष्टीला,
पण तुमच्या वागण्यानं तूम्ही पोहचलात रोमरोमापर्यंत !
या 'स्वप्नवेड्याला' भुलवणंही काही सोप्पं नव्हतं,
अनेक सुंदर मनाच्या चेहऱ्यांनी संभाळलेलं मला,
पण तुमच्या निर्मळ मायेने मला गुंतवलेल तुमचा होईपर्यंत !
तुमचं  निरागस हसणं, तुमचं निरागस असणं,
हळूहळू मला जिंकंत गेलं,
अन तुझ्या मनाचा भावगंध पसरत गेला,माझ्या मनाच्या अंतरंगापर्यंत !
माझं "मी" पण हरवून बसेनअसं कधीच नव्हतं वाटलं,
माझ्या मनासकट तूम्ही मला पूर्ण  वेढून घेतलं,
आता तुमचं आस्तित्व घेऊन जगतोय मी ...
तुमचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत !
---------------------------------

*प्रगल्भता म्हणजे काय ?*

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारण्याची प्रवृत्ती जोपासता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेणं ( स्वार्थ  ) सोडून देणं ( परमार्थ ) महत्वाचं हे समजू लागता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यानां जपण्याचा प्रयत्न करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमच्यात जाणीव निर्माण होते.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं कोणाला तरी आदर्श मानता आणि त्या आदर्शा प्रमाणेच आपले विचार आणि आचरण करता.

मनोगत...

लोक म्हणतात, "आयुष्य छोटं आहे".

लोक म्हणतात, "आयुष्य छोटं आहे".
पण असं बिलकुल नाही....
खरं तर आपण जगायला उशीरा सुरुवात करतो.क्षणा क्षणाला जोडत आयुष्य पुढे सरकत असते.
कधी तरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो....जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो.
फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. ज्याने तो क्षण ओळखून पाऊल उचलले आणि जाणीवेने चालत राहीला त्या माणसाकडे यश चालून येतं.
-------------------------

पुसून टाकावे सगळे रंग देखाव्याचे, मुखवटे पांघरलेल्या चेहऱ्यावरचे.
मोकळ करावं सर्व भावनांना, अडकल्या आहेत ज्या सांभाळात त्या मुखवट्यानां.
नसावा असा एकही चेहरा फसवणारा, मुखवटा पांघरूण हसणारा आणि हसवणारा.
-------------------------

एखाद्या माणसावर आंधळं प्रेम करणं हा त्या व्यक्तीवर केलेला विश्वास असतो.....
पण त्या व्यक्तीला ते प्रेम न सांभाळता येण हा त्या व्यक्तीमधील जाणीवेचा अभाव असतो.
-------------------------

विधात्याची भेट घेणं शक्य असतं तर माझ्या विधिलिखिताची प्रत मिळवली असती तर थोडेफार फेरबदल करायला सांगितले असते.
पण ते शक्य नाही म्हणूनच स्वः लिखित नवी प्रत तयार करायला घेतली जीला एकच अध्याय आहे " अस्तित्व मार्ग ".
-------------------------

तुमच्यामध्ये निर्बंध बांधल जाणं जर जाणीवपूर्वक नसतं तर तुमच्या बरोबर नातं जुळूनचं आल नसतं.
तुमच्या निस्वार्थ प्रेमाची जाणीव नसती तर आजपर्यंत तुमच्यासोबत राहिलो नसतो.
-------------------------

आपण सगळं बदलण्याचा हट्ट किंवा प्रयत्न करू नये.....कारण बदल घडून येण्यासाठी मन जूळुन यावी लागतात.
खरतरं.... मनं जुळली तर काही बदलण्याची गरज पडत नाही.
-------------------------

नेहमी हसत रहाण्याचा मुख्य फायदा म्हणजे " इतरांना तुमचे दुःख समजत नाही आणि ते तुमच्यावर दया दाखवू शकत नाहीत.
कोणाच्याही दयेवर केवळ आत्मसन्मान नसलेले जगतात.
पण...आत्मसन्मान मिळवण्यासाठी कर्तव्य आणि कर्तुत्व सिद्ध करावं लागतं.
-------------------------

जीवनातील सर्वात मोठं दुःख म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर निस्वार्थ नातं ठेऊनही ते स्वार्थ ठेऊनच वागतात.
पण या दुःखाने विस्कटून न जाता आपली मनात भावना कायम ठेऊन जगण्यातच खरा अर्थ असतो. स्वार्थ बदलतो अर्थ शाश्वत असतो.
-------------------------

तुमच्या असण्याने कुणाला फरक पडत नसेल तर नसण्याने पडणारच नाही. खरंतर....तुम्ही नसल्यावर फरक नाही पडला तर हरकत नाही
पण तुम्ही असताना तुमच्या असण्याची दखल घेतली जाईल अशा स्वभावात जगा.
-------------------------

काही लबाड लांडग्याच्या स्वभावाचे चोरून जातात ,
काही धुर्त कोल्ह्याच्या स्वभावाचे फसवून जातात,
काही चोर मांजरांच्या स्वभावाचे चोरून जातात,
माणसाच्या जन्मी येऊन प्राण्यांच्या स्वाभावात न जगता काही माणसं इमानाने जगून जातात.
-------------------------

सगळीच जोडलेली नाती निरपेक्ष आणि निस्वार्थ असतात असं ही नाही. त्यामुळे त्यानां गालबोट लागतं.
अर्थात... मनाची नाती ही रक्ताच्या आणि जोडलेल्या नात्यांपेक्षा निर्मळ असतात. कारण त्यात इतरांबद्दल तिरस्कार नसतो आणि मन जुळतं त्याच्याबद्दल अविश्वास नसतो.
-------------------------

एकदा पाण्याने भरलेले डोळे आणि भारावलेले शब्द आवरत ती मला सांगत होती.
जर जगातल्या सांऱ्यां पुरूषांना एका रांगेत उभं केल तरी मी माझं नातं तुमच्याशी आहे हे अभिमानाने सांगेन आणि तुझा हात पकडेन.
मी ही भावनांना आवरत तीला म्हटलं मी तुला दुसऱ्या कोणाला निवडायला संधीच देणार नाही.
-------------------------

आता नव्या प्रवासाची सुरूवात करण्याची वेळ झाली आहे.
पुन्हा स्वतःबरोबर नातं जोडून अपेक्षा आणि भावनिकतेला सोडून जाणीवांचे धागे जोडत नवा प्रवास सुरू करण्याची वेळ झालीआहे.
-------------------------

पाखरांच्या पंखात बळ आलं की ती भरारी मारतात आणि सगळं विसरून सोडून भरकटत जातात.
कदाचित निसर्गाचा मोह त्यानां आवरता येत नाही. अन् पाखरंचं ती....आता माणसांंची पाखरं होऊ लागलेत
-------------------------

नातं जपण्यासाठी कोणालाही मुद्दाम टाळण्याऐवजी स्पष्टपणे संवाद महत्वाचा असतो.
नाहीतर नाते तर तुटतेच राहीलेल्या व्यवहारी संबंधामध्ये देखील अविश्वास राहतो.
आपण एखाद्यच्या आयुष्यात काही क्षण आणि समाधान देऊन त्या व्यक्तीचं आयुष्य वाढवत नाही तर असलेल आयुष्य फुलवतो. ...जर फुलवता येत नसेल तर ते विस्कटू नका.
-------------------------

आता सारं सावरण्याची वेळ झाली आहे. बरीच पडझड झाली आहे , आवरण्याची वेळ झाली आहे.
अपेक्षांच्या चिखलात माखलेल्या मनाला स्वच्छ करून आत्मविश्वासाचे चिलखत घालण्याची वेळ झाली आहे.
क्षणभंगुर नात्यांच्या मोहात न अडकता...जे खोटी स्वप्न न दाखवता प्रत्यक्ष सोबत आहेत त्यानां घेऊन नाहीतर एकटेपणाला सोबत करत प्रवास सुरू करण्याची वेळ झालेली आहे.
थोडा वेळ लागले पण सुरवात करण्याची वेळ झालेली आहे.
-------------------------

कोण कुठं असतं हे फक्त वेळेला माहित असतं आणि ज्याचं त्याला माहीत असतं. अनेकदा जवळ वाटणारे लांब असतात. लांब असलेल्याचा जवळ असण्याचा संबंधच येत नाही. कोणी कुठेही असलं तरी मी माझ्यासोबत असणं जरूरीचे आहे हे कळलंय म्हणूनच कोण कुठं आहे हे न शोधता स्वतःला हरवून न देण्याचं ठरवलं आहे. आता कळतयं ञासात राहणं हे भासात राहाण्यापेक्षा कधीही योग्य असतं. म्हणूनच भासातून बाहेर येऊन जाणीवेच्या व्यासात असलेल्यांनां मनाच्या केंद्राच्या गुरूत्वकर्षणात कायम जोडलेल ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या गुरूत्वकर्षनाच्या बाहेर गेलेल्या कोणालाही परत आणता येणार नाही. आता हे पाहायाचं आहे कोण या व्यासात आणि गुरूत्वकर्षणात आपली जागा कायम टिकवून ठेवणार आहे. म्हणूनच म्हटलं.... कोण कुठं असणार हे वेळेलाच माहित असतं.

मनोगत.....