गुपित सुप्त भावनाचं....

प्रेम...स्वतःच अस्तित्व विसरून ,फक्त तिचा विचार करणे ,आणि स्वतःला विसरून फक्त तिचं होऊन जाणं.
कधी तीनं विचारलं असतं ना कि तुला माझी किती आठवण येते का ? तर मी सांगितलं असतं तीला नजरेत नजर भरून...

मनात तू ध्यानात तू
नकळत पडणाऱ्या स्वप्नात तू
ध्यास तू विश्वास तू
आनंदी मनाचा निःश्वास तू …

पानात तू फुलात तू
पहिल्या पावसाचा सुवास तू
रागात तू प्रेमात तू
नुकत्याच फुललेल्या कळीत तू …

गाण्यात तू पाण्यात तू
आठवणींच्या गोड गोड शहाळ्यात तू
दिवस तू राञही तू
चमकणाऱ्या हजारो चांदण्यात तू …

इकडे तू तिकडे तू
दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तू
श्वासात तू आवाजात तू
भिरभिरत्या नजरेच्या शोधात तू …

वाऱ्यात तू झऱ्यात तू
बागेतल्या सुंदर पाखरात तू
माझ्यात तू माझी तू
सगळीकडे फक्त तूच तू …
-------------------------------

मनातल्या मनात  आज वाटले...

मनातल्या मनात काही तरी लिहावं वाटले,
मनातल्या मनात काही तरी बोलावं वाटले …!
काही भाव नेणीवेतले पेरावे शब्दातून,
थोडे वाहणाऱ्या या मुक्त आसवातून,
सारे मन रिते रिते करावे वाटले ….!
सरलेले हरवलेले आठवातील क्षण,
उरलेले कल्पनेतले रेखाटलेले मन,
सारे सारे ओळी ओळीतून गुंफावे वाटले …!
दोन तुमचे..दोन माझे रंगलेले काही डाव,
कधी असे कधी तसे बसलेले काही घाव,
सारेच्या सरे भाव, ठाव आता सांगावे वाटले ..!
जीवनाचे गीत गाताना विरलेले काही ताल - सूर,
कंठात अडकलेले फसलेले काही स्वर,
सारे टाहो मुक्तपणे आता फोडावे असे वाटले ..!
थोडं गुदगुदतय, थोडं खद्खदतय,
थोडं दाटतय, आठवणींचे आभाळ भरून येतंय,
सारे सोडून तोल, कोसळावे असे वाटले ..!
कुठे वीज, कुठे झीज, कुठे ओलावा मायेचा,
कुठे हार, कुठे जीत, कुठे गंध  हा जाणीवेचा,
सारे काही मनोगतातून आज सांगावे वाटले…!
हसा कुणी रुसा कुणी, कुणी वेडा खूळा म्हणा,
लढा कुणी मारा कुणी, कुणी भागा कुणी गुणा,
सारे सारे हिशोब इथेच, मांडावे वाटले …!
मनातल्या मनात खूप खूप दडलंय,
वेदनेचे पाणी अधिक अधिक काढलंय,
सारे काही आज उपसून टाकावेसे वाटले…!
सारं काही शब्दात शांत आज करावे वाटले,
मनातल्या मनात काही तरी बोलावे वाटले,
मनातल्या मनात काही तरी लिहावे वाटले…!!
-------------------------------

सांत्वन...

पानगळीत जेव्हा पानं झडू लागतात,
सांगतात तेव्हा ती फांद्यांना!

आम्ही तर आमचा मोसम जगून जातोय.
तुम्ही काळजी घ्या....
तुम्हाला तर कित्येक मोसम मुलाबाळांचा सांभाळ करून
त्यांना निरोप द्यावा लागणार आहे.

जेव्हा फांदीची वेळ आली होती तोडलं जाण्याची तेव्हा ती झाडाला म्हणाली.. स्वत:च म्हणाली-
‘माझंही आयुष्य तुला मिळो..
तुलाऽ वाढत जायचंय, उंचच उंच व्हायचंय.
माझ्या जागी येईल दुसरी, मला आठवणीत ठेवूस माझ्या जाण्यावर दुःख करत बसू नको.

मुळांना खोलवर खोदून खोदून जमिनीपासून उखडून झाडाला वेगळं करताना......
झाड तरी जमिनीला काय म्हणणार!

उलट जमिनीलाच म्हणावं लागलं....
जे शाश्वत आहे ते कधीच नष्ट होत नाही, तूला असंच नेहमी या माणसानं लुटलेलं,
पण आठवतंय, जेव्हा तुला पहिलं पान फुटलेलं ,
एका छोटय़ाशा बीजातून तू डोकावून पाहिलं होतंस ,
पुन्हा येशील, माझ्याच पोटी जन्म घेशील !
---------------------------------

आयुष्य.....

चांगले वाईट प्रसंग आणि
कडू गोड आठवण...
आयुष्य म्हणजे अनुभवांची
एक मोठी अनमोल साठवण..

"माझे आयुष्य कष्टाचे"..
असे प्रत्तेकालाच वाटे..
दिसत नाहीत जेव्हा..
दुसऱ्याला बोचलेले काटे...

आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर,
असते काही नवे...
गरज पूर्ण झाली तरी..
सांऱ्यांना अधिकच हवे...

आयुष्यावर प्रेम करणे...
हेच महत्वाचे तत्व,
कारण, मृत्यू अटळ आहे ,
म्हणूनच जन्माला आहे महत्व.

आयुष्य राहिले तर .. पैसा मिळवण्याची
देऊ शकाल हमी...
पण पैशामागे धावून धावून..
नका करू आयुष्य कमी..

आयुष्यात कधीही कायम नसते,
सुख-दुःखाची वेळ..
संकटांना भिवून .. संपवू नका,
आपल्याच आयुष्याचा खेळ..

कठीण आहे सांभाळणे,
प्रत्येक माणसाचे मन...
म्हणूनच...आयुष्यात जोडलेली  माणसं..
हेच खरे धन..

जीवनावर चिंतन करायला....
माणसाला आज वेळच नाही..
म्हणूनच आज वाटलं..
"आयुष्यावर बोलावं काही...
---------------------------------

'मी' च  'तुम्ही' होणं....
कधीच अपेक्षा नव्हती मला तुमच्या शाब्दीक स्तुतीची,
अगदी पहिल्या भेटीपासून ते आजपर्यंत,
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे,
तुमच्या बंदिस्त मनापर्यंत !
अर्थात तुमच्याजवळ काय आहे याला कधीच महत्त्व दिले नाही,
अरुप ते रूप कोणत्याही गोष्टीला,
पण तुमच्या वागण्यानं तूम्ही पोहचलात रोमरोमापर्यंत !
या 'स्वप्नवेड्याला' भुलवणंही काही सोप्पं नव्हतं,
अनेक सुंदर मनाच्या चेहऱ्यांनी संभाळलेलं मला,
पण तुमच्या निर्मळ मायेने मला गुंतवलेल तुमचा होईपर्यंत !
तुमचं  निरागस हसणं, तुमचं निरागस असणं,
हळूहळू मला जिंकंत गेलं,
अन तुझ्या मनाचा भावगंध पसरत गेला,माझ्या मनाच्या अंतरंगापर्यंत !
माझं "मी" पण हरवून बसेनअसं कधीच नव्हतं वाटलं,
माझ्या मनासकट तूम्ही मला पूर्ण  वेढून घेतलं,
आता तुमचं आस्तित्व घेऊन जगतोय मी ...
तुमचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत !
---------------------------------

*प्रगल्भता म्हणजे काय ?*

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारण्याची प्रवृत्ती जोपासता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेणं ( स्वार्थ  ) सोडून देणं ( परमार्थ ) महत्वाचं हे समजू लागता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यानां जपण्याचा प्रयत्न करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमच्यात जाणीव निर्माण होते.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं कोणाला तरी आदर्श मानता आणि त्या आदर्शा प्रमाणेच आपले विचार आणि आचरण करता.

मनोगत...

No comments:

Post a Comment