विचार करतोय....

का बरं जमतं नाही माणसाला "नाक " होऊन वागायला इतरांना दोष न देता जे योग्य ते स्वीकारायला.
हवेत असंख्य इतर नको असलेले वायु असतानाही नाक कसं फक्त आँक्सीजन शोषून घेतं.
का बरं जमतं नाही माणसाला " सूर्य " होऊन वागायला इतरांना दोष न देता निरपेक्ष जगायला.
एकमाञ तेजस्वी आणि स्वयंपूर्ण शक्ती असतानाही सर्वांनी आपल्याला पाहिलंचं पाहिजे असं हट्ट न करणं.
-------------------------------

काही सन दिवसाचे तर काही मोजक्या दिवसाचे, काही एक दिवसाचा आनंद देतात तर काही  मोजक्या दिवसांचे.
माणूसही हे सारे सन साजरे करतो आणि त्यामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
पण जन्मापासून मरणापर्यत जो सन रोज सोबत करतो एकनिष्ठपणे ,  आपण दुर्लक्ष केले तरी नियमित येतो आपली सोबत करायला त्याला कधीच जाणीवपूर्वक आंनदानै न्याहळत नाही.
अर्थात.... माणसाचा स्वभावाच असतो क्षणभंगुर आनंदात जगण्याचा, शाश्वत समाधान सोडून.
-------------------------------

आनंद आणि समाधान या एकमेकानां पूरक गोष्टी आहेत. जसं दूध आणि त्यावर येणारी साय. दूध म्हणजे आनंद आणि साय म्हणजे समाधान.
दूधाशिवाय साय तयार होत नाही कारण ती शाश्वत आहे, साईमधून लोणी किंवा तूपच तयार होतं. त्यामुळे साय नसेल तर दूध नासतं.
तसंच शुद्ध आनंदाशिवाय शाश्वत समाधान निर्माण होत नाही. ते क्षणभंगुर समाधान माणसाला नेहमी क्षणभंगुर गोष्टी शोधायला लावत.
अश्या क्षणभंगुर गोष्टीसाठी जन्म व्यर्थ घालवण्यापेक्षा एखादी गोष्ट शाश्वत करावी. सगळे कसतात ते सगळ्यानांच येत , एक काहीतरी इतरांपेक्षा वेगळ करण्यातच शाश्वत समाधान असतं.
"तुम्ही जरी साऱ्या गोष्टीचे गुलाम असलात तरी एका गोष्टीचे राजा असावं ".
-------------------------------

कायम रहावी आठवण !
आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात अनेक माणसं येतात. जरुरीचं नसतं ती सारीचं मनात जागा घेतात.
पण त्यातली काही अचूक स्वतःच अस्तित्व कोरतात. अश्या माणसांशी जोडावं मन... अन् मनात तुमच्या त्यांची कायम रहावी आठवण.
जन्माला आलेला प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडणार, वेळ आली की मरणार. जन्म - मृत्यू शाश्वत सत्य आहे ते देव ही नाही खोडणारं.
अश्या या प्रवासात जोडावा प्रत्येक क्षण.. अन् तुमच्या आयुष्यात त्यांची कायम रहावी आठवण.
-------------------------------

आवडत नाही माझ्या पावलांनां अडखळून पडण्याची भीती, अनेकांची नीती जरी माझी वाट अडवण्याची होती.
मनी नाही माझ्या नसलेल्यांची खंत आता, दुःख करण्यास त्याचे नाही मला उसंत आता.
प्रवास हा आत्मशोधाचा माझा असेल  सदैव निरंतर, जरी वाढले अनपेक्षित विश्वासाच्या नात्यांमधील अंतर.
-------------------------------

मला कळतं जेव्हा माझं वागणं तुम्हाला छळतं. आता म्हणालं तरी असे का करता, समोरच्याच मन का मारता?
खरं सांगू... मला माझा स्वभाव लपवता येत नाही. उगाचच खोटे भाव आणून समोरच्याला फसवता येत नाही.
पण खरंच सागतो मला कळतं जेव्हा माझं वागणं तुम्हाला छळतं.
-------------------------------

कसा गुंतला जीव माझा तुमच्या मनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी ?
जुळले कसे हे नाते आपूले अन् कोणत्या क्षणी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी?
संगंम हा आपूल्या आयुष्याचा कधी आदर्श जाहला जनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी?
प्रेम लाभले असे मला हा जन्म तुमचा ज्ञ्रुनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी ?
-------------------------------

काय देणार आपण एकमेकाला, जर कामी आलो नाही योग्य क्षणाला.
काय करणार अशा धनाला, जे समाधान देत नाही मनाला.
काय म्हणून मारायचं स्वतःला, जर फरक पडत नसेल त्यानं कोणाला.
काय देतो आपण अशा माणसाला, जे सर्वस्व अर्पण करत आपल्याला.
-------------------------------

धक्का देणारे बरेच असतात, पुढे नेण्यासाठी नाही तर पाडण्यासाठी...
आपण स्वतःला सावरणं जरुरीचं असतं.
भडकवणारे बरेच असतात, जोडण्यासाठी नाही तर तोडण्यासाठी...
आपण स्वतःला आवरण जरुरीचं असतं.
शिजवणारे बरेच असतात , वाढण्यासठी नाहीतर नातं मोडण्यासाठी....
आपण न बावरणं जरुरीचं असतं.
मनोगत...

कधीतरी आठवणींनां वाव द्यावा.

जर कधी मन खूपच नाराज असेल , आणि स्वतःजवळ कोणीच नसेल.
तेव्हा मनाला संयमाचा आधार द्यावा.
कधीतरी आठवणींनां वाव द्यावा...
विचारांची वादळं तर असणारचं , एकटेपणा कधीतरी भासणारचं.
अशावेळी मनाला स्वतःचं भाव द्यावा.
कधीतरी आठवणींनां वाव द्यावा.
जसे भासते तसे असतेच असे नाही , आपले दुःख सांऱ्यांनां दिसतेच असे नाही.
अशावेळी मनाला क्षणांचा गाव द्यावा.
कधीतरी आठवणींनां वाव द्यावा.
-----------------------

बऱ्याच काळानंतर पाहिले मी तीला काल.
तेव्हा ही तशीच जसं माकडं म्हणतं "माझीच लाल."
मी म्हटलं" दिसत नाहीस हल्ली.
"म्हणाली" अजून सोडली नाही गल्ली".
मी म्हटलं मला तर म्हणाली होतीस मुलांची लाईन लावीन, तेव्हा मला वाटलं शिस्त प्रमुख होशील.
वाटलं नव्हतं अशी वाया जाशील. म्हणाली.."वाया गेलयं माझ खेटर.. माझा नवा छावा आहे चायनीज हाँटेलात वेटर.
मी म्हटलं.... मस्त! तुझ्या मोठ्या स्वप्नांनां आणखीन काय असेल बेटर.
मी म्हटलं अगं आता तरी सुधर, आवर जरा पदर.
"म्हणाली" पदर तर पडणारच रे, वाऱ्यावार उडणारचं रे.
"मी म्हटलं" अगं अशी किती दिवस वाऱ्यावर ठेवणार.
"म्हणाली" अजून मी तरूण आहे, सारं काही भरून आहे.
मी म्हटलं ठीक , वेळ आल्यावर शिक.
जे इतरांची ठेवत नाहीत इज्जत,  त्यांची अशीच राहणार भाजत.
मग भाजल्यावर झाले जरी कडक हाल, तरी माकड म्हणणार माझीच लाल.
-----------------------

शिऱ्याची प्लेट आली की त्यात रवा, काजू, बदाम, मणूके, बेदाणे सगळंच दिसत होतं.आपल्याला ते सगळं आकर्षित करत आणि ते पाहून आपण भारावून जातो.
पण ज्या मुळे तो शिरा गोड लागतो ती साखर आपल्या सहज लक्षात येत नाही कारण ती दिसत नाही.
काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असच असतं. दिसत नसलं तरी आपल्यामुळे त्या व्यक्तीला गोडवा आणि पूर्णत्व मिळावं यासाठी आपण सहज विरघळून जातो आणि एकरूप होतो.
आपला जीवन रुपी शिरा देखील असाच असतो. जीवनात त्याला बदाम, काजू, मणुके, बेदाणे अशा रूपात येणारी माणसं सहज दिसतात आणि त्यात आपण भारावून जातो.
पण आपल्यासाठी विरघळलेलं आणि  एकरुप झालेलं साखर रुपी माणूस आपण सहज विसरतो.
-----------------------

झिडकारलं जरी जणानं मला, तरी आधार द्यावा मनानं मला.
दूर केल जरी इतरांनी मला, जवळ ठेवावं माझ्यांनी मला.
तिरस्कारलं जरी परक्यांनी मला, तरी स्वीकारावं माझ्यांनी मला.
झालो जरी कधी अपरिचित या विश्वाला, परिचित असावं मी माझ्या विश्वासाला.
-----------------------

जीवनाचा प्रवास.......
ऐश्वर्य भोगताना आईच्या गर्भात, जेव्हा घेता येत नव्हता स्वतःहून श्वास.
तेव्हापासून सुरू झाला हा प्रवास....
जोपर्यंत जात नाही पुन्हा आईच्या गर्भात तो पर्यंत सुरू राहणार हा जीवनाचा प्रवास.
-----------------------

काय पाहतोस रे मना, जे दिसत नाही कुणा !
का बावरतोस रे मना, तरी कळतं नाही कुणा !
काय मागतोस रे मना, जे देता येत नाही कुणा !
का उदास होतोस रे मना, जर कळत नसेल कुणा !
-----------------------

चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या.......
नेहमीच कोणासाठी तरी किंवा  कशासाठी तरी धावतोय, एकदाच मिळणाऱ्या या जन्मातील अनमोल क्षणांनां गमावतोय. म्हणूनच म्हटलं...
चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या.......
काय करतोय तर फक्त मनाची ओढातानं, कशासाठी फक्त कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी अन् मग आपल्या मर्जीचं काय? म्हणूनच म्हटलं...
चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या.........
खरंतर सारे मस्त असतात आपआपल्या जगात, सारे रंग राखलेले आणि त्यात सोयीने माखलेले. आपणच बेरंग वाटतो सगळ्यांना. म्हणूनच म्हटलं...
चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या..........
-----------------------

काय करायचं जेव्हा सारं काही प्रतिकूल असतं !
असं वागायचं........
जणू जे होतयं ते सारं होणारच आहे , आयुष्य थोडं खाली-वर करणारंच.                                                                 घाबरायंंच नाही, बिनधास्त रहायंच !
असं वागायचं.....
आपली वाटणारी माणसं ही आपली नसतात, रक्ताच्या नात्याची अंग काढून बसतात.
तूटायंच नाही, तटस्थ रहायंच !
असं वागायचं..........
आपण परिपूर्ण  प्रयत्न करतोय , जिंकायचंच आहे असा निर्धार मनी धरतोय तरीही हरतोय.
पडायंच नाही, फक्त लढायंच !
असं वागायचं........
-----------------------

सगळं काही वाऱ्यावर असतं.
फक्त आकर्षण ! मनं जुळण्याचा एकही क्षण नसतो.  तेव्हा प्रेमात ....
सगळं काही वाऱ्यावर असतं.
फक्त देखावा ! प्रत्यक्षात काहीच हवा नसते. अशा मैञीत .......
सगळं काही वाऱ्यावर असतं.
फक्त विरंगुळा ! एकमेकांबाबत जराही लळा नसतो. अश्या नात्यात.....
सगळं काही वाऱ्यावर असतं.
-----------------------

धन्य मम हा जन्म जाहला, या जन्मी मज तुम्ही लाभला.
एकमाञ हा जन्म जाहला, अस्तित्व मार्ग या मनी कोरला.
येथेच मज हो देव भावला, तुमच्या सहवासात पावला.
अधिक नको आता काही मजला, अतुट असावा मनबंध आपला.
-----------------------

माझं मनोगत जेव्हा काही गोष्टी मांडत असतं,
तेव्हा ते प्रत्यक्षात त्या गोष्टी विरूद्ध भांडत असतं.
माझं मनोगत म्हणजे कोणाच्या विरोधात जाण्याचं तंञ नसतं,
कारण प्रत्येकाला मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य असतं.
म्हणूनच मला ही माझं विचार स्वातंत्र्य वापरून वागायला आवडतं,
अन् ... कोणालाही खटकलं तरी जे खरं ते सांगायला आवडतं.
मनोगतातलं कोणी काय घ्यायचं आणि टाळायचं हा ज्याचं त्यानं ठरवायचं असतं,
मला फक्त माझ्या मनाला प्रत्यक्ष  मांडायचं असतं.

मनोगत...

असं वाटतयं सारं मृगजळ आहे...!

आपण निर्मळ वागलं तरी संशयाला जास्त बळ आहे, निरागस भावनांना नेहमीच फसवणूकीचे फळ आहे....
असं वाटतयं माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
स्वार्थ येथे पावलांवर आणि एकनिष्ठता मैलावर तरी, निस्वार्थी नात्यांवर अविश्वासाचा मळ आहे...
असं वाटतय  माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
मेंदू म्हणजे खोटेपणाची एकमाञ कळ आहे, मनाचा माञ यामध्ये नेहमीच छळ आहे.
असं वाटतयं माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
---------------------------

असे क्षणच साठवायचे असतात....
नेहमीच आंनंदाचे नाही तर कधीतरी कोणीतरी अलगद सावरलेले क्षणही आठवायचे असतात.
असे क्षणच साठवायचे असतात....
नेहमीच आपण कोणाला हरवले होते हे आठवण्यापेक्षा कधीतरी आपण हरुणही जिंकलो होतो.
असे क्षणच साठवायचे असतात.....
आपण काय कमावले आणि काय गमावले याचाच विचार करण्यापेक्षा कधीतरी आपण कधी आणि कशात  समाधान  मिळवले.
असे क्षणच साठवायचे असतात.....
---------------------------

असं काही तरी करुन जाईन......
नेहमीच जिकंता आलं नाही तरी, तुमच्यासाठी हरुणही जिंकून जाईन.
असं काही तरी करुन जाईन......
कायम कोणाच्याही आयुष्यात नाही राहिलो तरी , सांऱ्यांच्या आठवणीत उरून जाईन.
असं काही तरी करुन जाईन......
स्वीकारली नाही जरी मी संसाराची जबाबदारी तरी, तुम्हाला जबाबदारी शिकवून जाईन.
असं काही तरी करुन जाईन.......
शरीराने जरी राहिलो जवळ तुमच्या तरी , मनाने निरंतर तुमचाच राहीन.
असं काही तरी करुन जाईन.....
मरण अटळ आहे माहीत आहे मला तरी , दुसरा जन्म तुमच्याच गर्भी घेऊन पुन्हा तुमच्या जवळ हक्काने राहीन.
असं काही तरी करुन जाईन......
---------------------------

मलाही वरवरच वागता येईल, पण तसं केलं तर जगण्यातला अर्थच निघून जाईल.
मलाही अंग काढून व्यवहारीक वागता येईल, पण तसं केलं तर आपल्या नात्यातला आत्मा निघून जाईल.
आत्मा नसल्यास शरीर जसे निरर्थक असते, तसचं नात्यात आत्मियता नसेल तर ते निरर्थक आहे.
---------------------------

माणसानं आपल्या गेलेल्या आयुष्यातील आठवणींनां कधीच कुरवाळत बसू नये, कारण त्या आठवणी असतात.
त्यांची तुलना कधीच वर्तमानातील आयुष्याशी करु नये, कारण प्रत्येक घटना परिस्थितीवर अवलंबून असते.
आपण सद्य परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे जास्त योग्य असते.
आपण परिस्थिती किंवा स्वतःला बदलू शकतो, वेळ बदलता येत नाही कारण ती कायम अरिवर्तनीय असते.
---------------------------

कोणासाठी चांगले तर कोणासाठी वाईट असतो आपण , खरंतर जसे ज्यांचे विचार असतात तसे त्यांना वाटतो आपण.
कोणासाठी छान तर कोणासाठी घान असतो आपण, खरंतर जशी ज्यांची नजर असते तसे त्यांना दिसतो  आपण.
कोणासाठी मनामध्ये तर कोणासाठी जनामध्ये असतो आपण, खरंतर जशी ज्यांची भावना तसे त्याच्यांत असतो आपण.
---------------------------

टीका करत नाही,थोडी चेष्टा वाटते !
एकञ selfi काढणारे आणि त्यासोबत 'Best friend' 'made for each other' वैगरे बरचं काही लिहणारे, वेळ आली की फक्त selfish च वागतात.....
टीका करत नाही,थोडी चेष्टा वाटते...
जीवनातलं सगळं काही सपलं आहे असे dp वर चिञ आणि status ठेवणारे आणि दयनीय स्थिती दाखवून सात्वनं करुन घेणारे, प्रत्यक्षात मस्त मजा करत असतात..
टीका करत नाही, थोडी चेष्टा वाटते. एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नातं आहे असे भासवणारे, पाठ फीरताच निंदेची घंटा वाजवतात.
टीका करत नाही, थोडी चेष्टा वाटते.
---------------------------

बरं झालं .. देवानं चेहऱ्याला आरसा नाही बनवलं....
नाहीतर प्रत्येकाला खऱ्या चेहऱ्याने जगणं कठीण झालं असतं.
कारण काचेच्या मागच्या भागाला गंधकाचा लेप दिल्यावर आरसा बनतो, तसेच चेहऱ्यावर भावनांचा लेप आल्यावर चेहऱ्याचा आरसा होतो.
म्हणूनच म्हटलं ! बरं झाल ..देवानं चेहऱ्याला आरसा नाही बनवलं. नाहीतर प्रत्येकाला खऱ्या चेहऱ्याने जगणं कठीण झालं असतं.
---------------------------

सरळ सांगायला चोरी असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
चारचौघात कमरेत हात, अन् घरच्यांनां कळलं तर सापाची कात.सरळ सांगायला चोरी असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
औकात काडीची आणि वार्ता माडीची, आईबापाच्या कमाईवर फुकटचा देखावा असतं.
सूरवातीला कूरकूरीत नंतर चाहात बुडवलेली खारी असतं, पण आजकालाच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
एकमेकांच्या हातावर एकमेकांचं नाव नाहीतर नावाचं अल्फाबेट, बाकी सगळं पिक्चर नाहीतर सिरियलचा सेट असतं.
भाड्याची बाईक अन् मागे तोडांवर स्कार्फ लावून पोरी असं असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी  भारी असतं.
सगळ्यांचे लवर म्हणून आपला पण लवर प्रत्यक्षात मनावर नसतो आवर, खरंतर हा फक्त फँशनचा फीवर असतं.
प्रदर्शन नुसतं असंस्कारी असं टपोरी असतं, आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
---------------------------

जीवनाचा आनंद आपल्या जीभेच्या दर्जावर अवलंबून असतो.
जीवनाचे समाधान आपल्या मनाच्या गर्भावर अवलंबून असते.
---------------------------

नाती कधीच नैसर्गिक रित्या मरत नाहीत त्यांची  हत्या केली जाते .....
स्वार्थ, अहंम, संशय, अविश्वास, निरर्थक अपेक्षा किंवा दुर्लक्ष अश्या प्रवृत्ती मधून.
---------------------------

असे जगाया शिकव क्षणा... जपून घेण्या माझ्याच्या मना.
चेहऱ्याला या माझ्या आता कृतीत जरा तु आण मना... निरागस जगाया शिकव क्षणा.
---------------------------

तुम्ही तुमच्या समोरची परिस्थिती बदलू शकत नाही....
तुम्ही बदलू शकता फक्त तीला सामोरे जाण्याचा योग्य पर्याय आणि तंत्र.
---------------------------

जेव्हा तुमच्याकडे कोणाचे लक्ष नसेल तेव्हा तुमचे स्वतःवर लक्ष असणे जरूरीचे आहे. कारण इतरांना तुमच्या बाबतीत विचार करायला वेळ नसतो तेव्हा तुम्ही त्यांच्या लक्षात येत नाही.
प्रत्येकाला आपलं लक्ष असतं , म्हणूनच तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवणं जरुरीचं असतं.
---------------------------

हसतानाही दुःखाचे गहीवर आवरता आले पाहीजेत.
खुप काही बोलताना आपले शब्द सावरता आले पाहीजेत.

मनोगत...

आता ठरवलयं...

आता ठरवलयं कोणालाही स्वतःला सहज घेऊ द्यायचे नाही, आणि कोणावरही भरवसा ठेऊन राहायचे नाही.
लायक राहून आपली जागा सांभाळायची आणि प्रत्येकाला त्यांच्या लायकीनूसार जागा घेऊ द्यायची. आपण योग्य आहोत यावर तटस्थ राहून इतरांच्या योग्यतेचा आदर करत राहायचंं.
पहिल्या सारखंच कोणाला आवडलो नाही तरी स्वतःच्या मनासारखंच वागायचं. उद्यापासून पुन्हा सरळ आणि स्पष्ट जगायचं.
-------------------

जर कोणाला काही देण्याची वेळ आली तर आपण त्या व्यक्तीला तेच देऊ शकतो जे आपल्याकडे आहे.
प्रत्येकाला स्वतःजवळ काय आहे फार चांगलं माहीत असतं.
-------------------

उधळावे रंग आपल्या मनातील विचारांचे गुदमरलेलं मन तरी मुक्त होईल.
ओघळु द्यावे अश्रू सारे भावनांचे नात्यातील सारे बंध तरी घट्ट होतील.
--------------------

मला ओळखणाऱ्यानां  माझ्याबद्दल तर्क लावून वागतात आणि  न ओळखणारे सहज स्वीकारतात.
मला ओळखणारे माझ्यावर सहज बोट उगारतात आणि न ओळखणारे माझं बोट धरायला सरसावतात.
अर्थात.... आपली ओळख फक्त विश्वासातील माणसांना करुन द्या कारण साधेपणाचा बुरखा पांघरूण अनेक लोक आपल्या पोळ्या भाजत असतात.
--------------------

काही एकमाञ वस्तूंना बदलण्याचा निरर्थक प्रयत्न करणे जसे चुकीचे आहे.
तसेच काही पाञ व्यक्तींना बदलण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःला मूर्ख ठरवण्यासारखे असते.
--------------------

संत मंडळी सांगून गेली, "निंदकाचे घर असावे शेजारी". पण आता अश्या निंदकानां तुम्ही शेजारीच नाही तर समोरी - माघारी तसेच आजूबाजूला ही पाहू शकता.
आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे कारण माणसं त्यांच्या सोयीनेच विचार करतात.
--------------------

मला माणसं तेव्हा फार विशेष वाटतात जेव्हा ती कोणताही मुखवटा सहज घालतात.
त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा ती विश्वासातील व्यक्तीला खोटं सांगून त्याला वेडात काढल्याचा आनंद साजरा करतात.
--------------------

पुन्हा एकदा सुरू झाला आज शोध.......
कसला ? माहीत नाही. पण सकाळी उठून समस्त शरीर यंञासारखं काम करु लागेल.
पण या यंञाच्या कार्यातून निर्माण होणारं उत्पादन ज्यांना माहित असेल त्यांना आजच्या मेहनतीचा मोबदला " पैसा " आणि मानधन " समाधान " मिळेलच.
अर्थात... तुम्ही जे कार्य करता त्यामध्ये स्वतःला एकरुप करा.
--------------------

माणसानं प्रयत्न करणं थांबवून चमत्काराची वाट पाहणे म्हणजे निष्क्रियता.
समोरच्यांनी आपणास कितीही कमजोर केले तरी तटस्थ प्रयत्न करणे म्हणजे सक्रीयता.
म्हणूनच माणसानं वेळेसारखं वागावं जे सोबत आहेत त्यांच्याबरोबर आनंदानं जगावं.
--------------------

आपण कोण आहोत? यापेक्षा .....
आपण कोणाबरोबर आहोत? आणि का आहोत? आपण कसे आहोत?
या प्रश्नांची उत्तरे शोधा यामध्येच तुम्हांला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
--------------------

आयुष्य म्हटलं की चढ-उतार असणारचं.....एक गोष्ट स्वीकारून चालायचं की दोन्ही मध्ये संयम महत्त्वाचा असणारचं.
--------------------

माणसाला स्वप्न बघण्याची प्रवृती असावी पण ती पूर्ण करताना कोणालाही दुःख देण्याची वृती नसावी.
--------------------

माणसानं सर्व काही नाकारले तरी एक शाश्वत सत्य नेहमी स्वीकारले पाहिजे, ते म्हणजे "कोणी कितीही महान, आदर्श आणि मोठं झालं तरी निदंक आणि विरोधक हे असणारच".

मनोगत...

मी जर झाड असतो तर...

माझ्या मनाची मुळं, मातीच्या रक्ताशी एकनिष्ठ राहिली असती.
माझ्या विश्वासाच्या खोडाने जाणीवेचा ओलावा कायम ठेवला असता.
माझ्या नात्यांच्या फांद्यावर अनेकाच्या इच्छांची फुले-फळे बहरली असती.
माझ्या कर्तव्यदक्ष पानांनी मायेच्या सूर्यप्रकाशात नात्यांच्यां फांद्यानां सांभाळले असते.
निरागस वाऱ्यावर डूलताना माझ्या भावनांच रसायन झाडाच्या प्रत्येक पेशीत पोचलं असतंं.
ज्यांना हे झाड आहे तसं आवडलं असतं त्या सजीवानं हे झाड आपलं म्हणून निवडलं असतं.
------------------------------

कठीण असतं खरेपणानं जगणं..
एखाद्याला दिलेल्या शब्दाला जागणं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
एखाद्या साठी सहज स्वार्थ त्यागनं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
कोणतीही अपेक्षा न ठेवता वागणं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
कोणाची निंदा न करता त्याच्या मागनं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
------------------------------

माझे आजोबा अशिक्षित होते, ते आपला अंगठा स्वाक्षरी म्हणून वापरायचे.
माझे वडील शिकले होते, ते आपली स्वाक्षरी कागदपञावर करायचे.
मी माझ्या आँफीसमध्ये आत जाण्यास आणि बाहेर येण्यास अंगठ्याचा ठसा वापरतो.
सध्याची पिढी मोबाईल वर काम करायला अंगठा वापरतेय.
कळत नाही प्रगती कशाला म्हणायचे?
------------------------------

फक्त एक करा...
खुप नाराज आहात तुम्ही वेळेच्या खेळावर , काहीच करु शकत नाही आहात तुम्ही स्वबळावर.
तेव्हा फक्त एक करा.... वेळेचा हात घट्ट धरा.
प्रयत्न तुम्ही अथक करताय , विश्वासाला मनाशी धरताय पण धेय्य साध्य होत नाही.
तेव्हा फक्त एक करा.... विश्वासाचा हात घट्ट धरा.
तुमच्या अपेक्षा स्वाभाविक आहे अगदी साधारण परंतु मनाची नेहमीच उपेक्षा होते.
तेव्हा फक्त एक करा.... मनाचा हात घट्ट धरा.
------------------------------

अन् नातं जडतं ...
एखादं  माणूस आपल्या भावनांना अलगद सांभाळू लागतं..... अन् नातं जडतं.
एखाद्या माणसात कधीतरी मन अलगत गुंतलं जात..... अन् नातं जडतं.
एखाद्या माणसाचं डोळ्यांना कळत-नकळत वेड लागतं... अन् नातं जडतं.
एखाद्या वळणावर एखादं माणूस आपली काळजी घेऊ लागतं.... अन् नातं जडतं.
एखाद्या माणसाचं हसणं म्हणजे आपलं असणं होऊन जातं... अन् नातं जडतं.
आपला श्वास एखाद्या माणसाच्या असण्यासाठी आतूर होतो... अन् नातं जडतं.
एखाद्याच्या प्रेमळ सावलीत आयुष्य सहज सुखावतं.... अन् नातं जडतं.
------------------------------

समाजरूपी पोत्यातून एकदा बाल-युवारूपी धान्य निवडायला घेतले.
अर्थात... धान्य निसर्ग नियमानुसार मातेच्या उदरातूनचं आकारलं होतं. फरक एवढाच की, या धान्यांला अडचणींच्या पाऊस-वाऱ्यानं कोवळेपणातचं झोडपलं होतं.
तरी माय-बाप शेतकऱ्यांनं धान्य सावरलं आणि जपलं होतं.
तरी अपरिपक्व धान्यालां कसलीही लागण होणं सहज शक्य होतं, कारण पोत्यातलं वातावरण असुरक्षित होतं.
बिचाऱ्या शेतकऱ्यांनं किती जपलं तरी धान्यातं असंस्काररूपी कीड, भुंगे, गार-खडे होणं नैसर्गिक आणि स्वाभाविक होतं.
अस्तित्व मार्ग रुपी सुपात जेव्हा आपूलकीच्या पश्यानं पोत्यातलं धान्य घेतलं. तेव्हा सारं बाहेर आल आतलं.
मोकळ्यावर येता क्षणी कीड भुंगे लागले पळू हळूहळू...इथं आपली नासाडी प्रवृत्ती टिकणार नाही हे लागले त्यानां कळू.
धान्यात लपलेल्या खडे- गारा  निवडल्या अचूक कारण धान्याच्या साजात त्याचं योग्य नव्हतं रूप.
मग काय....बाल-युवा विकास केंद्राच्या खळ्यात धान्याला दिला प्रेमाचा वारा, अलगद वाढला की हो त्याचा तोरा.
वाऱ्यानं धान्यातलं नैराश्य झटकून टाकलं अन् धान्य कला-कौश्यल्यानं माखलं.
या धान्याचं आता बियानं झालयं अन् आता ते नावारूपात आलयं.  नवं धान्य पिकवायला कोणत्याही बिकट परिस्थितीत.
------------------------------

माणसाबाबतीत एक गोष्ट फार विशेष असते , की माणसाची वेळ सरली की त्याला सर्व काही सहज भासते.
खरंतर ... वेळ कधीच सरत नाही, फक्त  माणसाला जाणीव उरत नाही.
माणसानं कितीही पसरावं फक्त जमिनीस ( परिस्थितीस ) कधी न विसरावं.
------------------------------

अहंम नसता तर...
माणसाला माणसाचं महत्त्व सहज कळलं असतं, अहंम नसता तर.....
मनाचं मोठंपण ठेऊन सहज जुळली असती नाती, अहंम नसता तर.....
एखाद्याच्या कर्तुत्वाची राहीली असती सहज जाणीव, अहंम नसता तर.....                                                                 माणूसकीची कधीही झाली नसती उणीव, अहंम नसता तर.....
आपल्या जागेवर एकनिष्ठ राहिली असती माणसं, अहंम नसता तर....
चांगली माणसं ओळखणं फारच कठीण झालं असतं, अहंम नसता तर.
------------------------------

शक्य असते तर फाडून टाकली असती माणसाच्या मनातील संशयाची लक्तरे....देऊन त्यांच्या निरर्थक विचारांना सडेतोड उत्तरे.
पण विचार येतो , अथांग संशयात बरबटलेली ती माणसं ही उत्तरे समजण्यास पाञ असतील का?
नाहीतर... आपलाच बिरबल व्हायचा, उकीरड्यावरील डुकराला राजमहालात आणून , गुलाब पाण्याची अंघोळ घालून मखमलावर झोपवणारा.
कारण शेवटी डूक्कर उकीरड्यावरचं सुखावणार , अन् स्वतःच्या प्रवृत्तीत आपलं मन दुखावणार.
पण मन ऐकत नसतं , सगळं काही हीच अपेक्षा करत असतं.
------------------------------

"विचार"
असाच शातं बसलो होतो. अर्थात विचार करत तेवढ्यातच " विचार " समोर आला आणि म्हणाला, काय ? कोणाबरोबर आहेस !
मी ही उत्तरलो, "मी नेहमीच असतो तुझ्याबरोबर, पण आज पाहतोय प्रत्यक्ष खरोखर ".
मला भेटायला आलास तसा सर्वांना भेटतोस का रे ?
तसा थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला, माझा विचार पडलाय कोणाला ?
मी तर वेळेनूसार सर्वांकडे जातो पण जो तो मला सोयीनेच घेतो.
तरी...माझी जाणीव ठेऊन का रे वागत नाहीत सारे, मनात खोटं ठेऊन का दाखवतात खरे.
मी काही बोलणार, इतक्यात पुढे म्हणाला, "ञास होतो रे मला! जेव्हा माणसं पोसतात माझ्यामध्ये संशयाला.
मी गोंंधळून गेलो त्याची अवस्था पाहून ,मनात अस्वस्थ झालो न राहून.
जवळ येऊन म्हणाला " अरे वेड्या,  गुंतूं नकोस माझ्यात, मी स्वतःला ओवले आहे तुझ्यात.
हसतच पुढे म्हणाला " माझंही मन दाटत, फक्त कोणी मला सहज घेतलंं की वाईट वाटतं ".
"तु कसा वागतोस निःपक्ष, म्हणून आलो तुझ्यासमोर प्रत्यक्ष ".
आज नंतर जर दिसलो नाही कोणाला, तरी माणसं पाहतील तुझ्या कृतीत मला.
दिसेनासा झाला दुसऱ्या क्षणात, पण कायम असतो माझ्या मनात...सर्वाचा.....  " विचार ".
-----------------------------------------------
माणसानं धनानं मोठं व्हावं पण मनानं खोटं होऊ नये.
माणसाकडे आठवणींचे पर्व असावे पण साठवणीचा गर्व असू नये.
माणसाचं नातं अक्षय असावं पण मनात संशय असू नये.

मनोगत...

मी नशीबात असेल...

मी नशीबात असेल तर या भरवस्यावर आणि हातावरील रेषांच्या भविष्यावर कधीच विश्वास ठेवला नाही.
कारण... मी अनेकाचं नशीब फुटलेलं आणि हातावरच्या रेषांना विस्कटलेलं पाहीलं आहे.
माणसानं आपल्या कृत्याचा स्वीकार आणि कर्तव्याची जबाबदारी घ्यावी. असं वागणं म्हणजे माणूसकीला जागणं म्हणता येतं.
नाहीतरं अनेकांना दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेऊन नात्याला ठार  करताना आणि स्वतःच्या गळ्यत निर्दोषत्वाचा हार घालताना ही मी पाहिलं आहे.
------------------------------

का बरं माणसं उगाचच नात्यांचा आणि जिव्हाळ्याचा देखावा करतात? काही माणसं एखादं नातं निच्छित स्वार्थ किंवा हेतूने ठेवतात,
तो स्वार्थ किंवा हेतू साध्य झाल्यावर त्या नात्यालाच दोष देतात. का बरं माणसं जाणीव न ठेवता नात्यांचा असा व्यापार करतात.
खरं आहे.... प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असतात, पण त्यासाठी निर्मळ भावनांना का बरं फसवतात.
------------------------------

माणसानं स्वप्नं आकाश भरारी ची ठेवावी, परंतु हे विसरू नये भरारीची सुरूवात आणि शेवट जमिनीवरंच होतो.
अर्ध्या हळकुंंडांने पिवळे होऊ नये, कारण पिवळेपण हा हळदीचा गुण आहे.
आपल्यामध्ये जे अंतर्भूत नाही ते क्षणभंगुर किंवा कालबाह्य आहे हे लक्षात ठेवावे. वस्तूची साठवण करण्यापेक्षा व्यक्तीची आठवण ठेवायला शिका.
------------------------------

काही माणसं क्षणभंगुर रूपाच्या अहमांंत स्वतःला वेगळं समजतात.
काही माणसं परपोषी संशयानं स्वतःला स्वतःला वेगळं करतात.
काही माणसं केवळ निरर्थक हट्टामध्ये स्वतःला आपल्यांपासून वेगळं ठेवातात.
एखादचं माणूस असं असतं जे केवळं मनाला जपण्यासाठी सारं काही त्याग करु शकत.
------------------------------

नातं काळांच.......
काळांच नातं अतुट असतं.
माणसासाठी वर्तमान महत्वाचा असतो, पण माणूस नेहमी भविष्याचाच विचार करत बसतो.
आणि भूतकाळाला विसरून वर्तमानाला गमावत असतो.
भविष्य महत्वाचा नसतो असे  नाही, पण आयुष्य तर वर्तमानावरचं अवलंबून असतं.
माणसाला कळत नसतं, भूतकाळाच्या गर्भातूनच वर्तमानाचा जन्म झालेला असतो.
अन् .... भविष्य साकारण्यासाठी ही  वर्तमानाच महत्त्वाचा असतो.
------------------------------

तेव्हा आपण एकटेच असतो.
जग माणसांनी भरलेल असतं,
अन् नातं गरजे पुरतंच उरलेलं असतं.
जेव्हा आपण कोणाच्या मनात नसतो.
तेव्हा आपण एकटेच असतो...
संबंधात फक्त स्वार्थ शोधला जातो,
अन् क्षणभंगुर सुखात आनंद मानला जातो.
जेव्हा आपल्या भावनांना आधार  नसतो.
तेव्हा आपण एकटेच असतो...
विश्वासातील रागावर ऊगाचच रूसतो,
संशयाच्या प्रेमात सहजच फसतो.
जेव्हा सगळ्यांमध्ये असूनही आपण समाधानी नसतो.
तेव्हा आपण एकटेच असतो....
------------------------------

अहंम आणि आत्मा...
अहंम अर्थात Ego आणि आत्मा अर्थात Soul यामध्ये फरक काय?
अहंम नेहमी शोधत असतो स्वार्थ आणि आत्मा फक्त परमार्थ.
अहंम म्हणजे दिशाहीन असत्य  आणि आत्मा शाश्वत सत्य.
अहंमासाठी जीवन म्हणजे हाव  आणि आत्म्यासाठी निर्मळ भाव.
अहंम म्हणजे मी पणा चा शोध   आणि आत्मा म्हणजे जीवन बोध.
अहंम म्हणजे "मीच" आणि आत्मा म्हणजे "तुम्हीच".
------------------------------

चेहरा...
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा.
------------------------------

जगणं ...
आनंद साजरा करणं म्हणजे जगणंं.
दुःखाला सामोरे जाणं म्हणजे जगणं.
स्वतःच्या डोळ्यातील हास्य इतरांना देणं म्हणजे जगणं.
इतरांच्या डोळ्यांतील अश्रूनां सावरणं म्हणजे जगणं.
एकञ गप्पा-गोष्टी, गाणी गाणं म्हणजे जगणं.
एकटं असलं तरी निसर्गाशी सवांद साधणं म्हणजे जगणं.
जोडलेलं नातं जपणं म्हणजे जगणं.
सोडलेलं गोतं शिपणंं म्हणजे जगणं.
जोडलेले हात आवरणं म्हणजे जगणं.
पकडलेला हात सावरणं म्हणजे जगणं.
पक्ष्यांना उडतानां पाहणं म्हणजे जगणं.
लक्ष्यांनां साध्य करणं म्हणजे जगणं.
तुम्ही माझ्याबरोबर असणं म्हणजे जगणं.
मी तुमच्यामध्ये असणं म्हणजे जगणं.
आपल्यांसाठी मागणं म्हणजे जगणं.
समोरच्याला मान देऊन वागणं म्हणजे जगणं.
मुंगीचे प्रयत्न म्हणजे जगणं.
कासवाची चाल म्हणजे जगणं.
गरूड भरारी म्हणजे जगणं.
मुळाचं मातीशी नातं म्हणजे जगणं.
सूकलेल्या झाडांच्या फांदीवर एखादं पान फुटणं म्हणजे जगणं.
आपल्यांच्या आठवणीत मन दाटनं म्हणजे जगणं.

मनोगत...

माझ्यासोबत कोण आहे...

माझ्यासोबत कोण आहे हा विचार करत राहीलो असतो तर तुम्हा सर्वांना कधीच भेटलो नसतो. मी नेहमी कोणातरी सोबत असावं असा विचार करत असतो.
फक्त ज्या कोणाच्या सोबत असेण त्याला समजलं पाहिजे की तो/ती माझ्यासोबत आहे. यासाठी अधिक काही नाही फक्त " विश्वास " पुरेसा असतो.
-----------------------------

आपल्यासाठी कोणीतरी असावं अशी सगळ्यांनाच वाटत असतं.... आपण कोणासाठी तरी असावं  म्हणजे कोणा एकाची तरी इच्छा पूर्ण होईल.
-----------------------------

जेव्हा तुमची वेळ चांगली असते तेव्हा तुम्ही केलेल्या चूकानां देखील लोक जोक समजतात. आणि जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा तुमच्या जोक ला देखील तुमची चुक समजली जाते.
-----------------------------

मी जो आणि जसा विचार करतो तो सगळ्यांना पटेल असे नाही...आणि माझा विचार पटलाच पाहिजे असा विचार करणारे पटेल माझ्या सोबत मी ठेवत नाही.
कारण प्रत्येक जण इतरांसाठी नटतो आणि फक्त माझ्यांसाठीच झटतो आणि नटतो.
-----------------------------

स्वतःला अवखळ समजून मी नेहमी निखळ माणसं शोधत असतो. माझ्यासारखेच असतात सर्व हे मला अनुभवाने कळते.
फरक एवढाच मी माझ्यामधील अवखळपणा स्वीकारून  वागतो..मला भेटलेले बहुतांश त्यांचा अवखळपणा लपवून आणि नकारून वागताना दिसतात.
-----------------------------

नाती आणि फ्रीजमाध्ये तयार केलेले बर्फ एक सारखेच असतात....ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.*
दोघांना सांभाळण्यासाठी फक्त एकच उपाय असतो....गारवा कायम ठेवायचा असतो "
-----------------------------

जीवनात काहीही निर्माण करण्याआधी त्या निर्मिती ची जबाबदारी घेण्यास स्वतःला तयार करणे जरुरीचं असतं. पाण्यात उडी मारण्यासाठी पोहायला शिकणं जरुरी असतं.
पोहायचं म्हटलं की पाण्याचा गारवा आणि सर्दी सोसण्याची तयारी हवी.
-----------------------------

कशाच्या शोधात निघालाय यापेक्षा, जे शोधताय ते का शोधताय हे महत्वाचं असतं. सगळेच धावतायत म्हणून धावू नका, मी कशासाठी धावू हा प्रश्न दमछाक होण्याआधी स्वतःला विचारा.
कारण आपण इतरांना दोष देतो पण निर्णय स्वतःचेचं घेतो ना?
-----------------------------

अगणित मानाचे लोक आपल्या आजूबाजूला ठेवण्यापेक्षा , मोजता येतील एवढी मनाची माणसं ठेवा. आयुष्याच्या खडतर प्रवासात तुम्हांला  इच्छापूर्तीची वाट आणि स्वप्न साकारण्याचा मार्ग लाभावा.
-----------------------------

चालताना ठेच लागली म्हणून आपण दगडावर राग काढत बसतो का? नाही! आपण आपल्या लागलेल्या भागाला जपून ठेवतो.
असचं... नात्यात ही करावं. जर आपल्याला कोणी दुखावलं तर त्याला दोष देत रहाण्यापेक्षा स्वतःच्या मनाला सांभाळावं.
-----------------------------

इथं प्रत्येकाला वाटतं की आपलंच म्हणणं बरोबर आहे! हो... अगदी खरं आहे. पण जसं आपण आपण आपल्या जागेवर बरोबर आहोत तसं समोरचा त्याच्या जागेवर बरोबर असेल.
ही साधारण गोष्ट स्वीकारणे माणसं सहज टाळतात..... तरीही मीच बरोबर आहे अश्या भ्रमात वागतात.
-----------------------------

" गणिती चिन्ह जीवनाचं "
आपण बरोबर असणं चूकीचं नसतं. फक्त आपण बरोबर असू तर समोरचा गुणाकार असल्यास आपल्या पेक्षा भारी असू शकतो. मग समजा आपण गुणाकार असल्यास समोरचा घातांकात किंवा वर्गमुळात असेल तरी आपल्यापेक्षा भारी असू शकतो. समजा आपण वर्गमुळ किंवा घातांक असलो आणि समोरचा सरासरी किंवा भाजक असेल तरी तो भारी असू शकतो. अर्थात....आपण बरोबर असणं कधीही छान असलं तरी बाकी राहणं अधिक उत्तम असतं. "बाकी" महत्त्वाची असते कारण जीवनाच्या गणितात सर्वांची ल.सा.वी., म.सा.वी., बेरीज, वजाबाकी, गुणोत्तर  तर होणारच असते.
-----------------------------

वातावरणात मिसळलेला प्राणवायु जसा डोळ्यांना दिसत नाही पण तो श्वासात जानवतो, आपल्याला जीवन देत असतो.
अगदी तसंच मनाच असत मानवी शरीरातील मन दिसत नाही पण ते स्वभावात जानवते, आपणांस जाणीव देत असतं.
-----------------------------

कधी हीशेब करु नये वेळेचा, कारण वेळ कधी काही देत नाही आणि कधी कोणाचं काही घेत नाही.
हीशेब ठेवलाच तर जीवनात जोडलेल्या नात्यांचा ठेवा.
हीशेब ठेवलाच तर आयुष्यातील व्यतीत केलेल्या क्षणांचा ठेवा.
हीशेब ठेवलाच तर एकमेकांच्या सहवासातील आठवणींचा ठेवा.
कोणाला जोडले ?
कसे जोडले ?
कशा साठी जोडले ?
समोरच्याने जोडले का ?
काय मिळवले ?
काय गमावले ?
कारण या सर्वात आपण आपल्याला आणि आपल्यांना शोधू शकतो आणि ओळखू शकतो.

मनोगत...