काही तरी करुन जावं !

सारेच करतात छंद आपण स्वतःला कोणाच्या तरी मनात बंद करून जावं.
सगळेच पाहतात निसर्ग आपण त्याच्या गर्भ श्रीमंतीत रमुन जावं.
सारेच देतात आश्वासन आपण आपण कृतीत प्रत्यक्ष करून जावं.
सारेच दाखवतात वाट आपण हात धरून घेऊन जावं.
सगळेच झटतात घेण्यासाठी आपण काहीतरी देऊन जावं.
सगळेच लढतात जिकण्यासाठी आपण हारून न ही जिंकून जावं.
सगळेच जगतात मरेपर्यत आपण मरून ही आठवणीत उरुन जावं.
----------------------

प्रेम.......मनाचं !
एकदा राधेनं भगवान श्रीकृष्णानां विचारले...
मी तुमच्या जवळ असतानाही  तुम्हांला माझ्यापेक्षा ती मीरा का बरं जास्त प्रिय आहे ?
कृष्ण स्मित हास्य करत उद्गारले !
मी आता तुझ्याबरोबर आहे तरी तु माझा विचार न करता आणि माझ्या सहवासात रममान न होता, मीराच्या विचारात मनात ञस्त आहेस.
आणि मी मीरा बरोबर नसतानाही ती फक्त माझ्याच विचारात रममान असते आणि मनात माझ्या विचारातच व्यस्त असते.
मी तुझ्याजवळ असूनही मी तुझा नाही कारण तु माझ्याबरोबर नाहीस.
मी तीच्याबरोबर नसतानाही ती माझ्याबरोबर आहे...... मनानं !
"तनानं कोणाचं असणं हे क्षणभंगुर असू शकतं पण मनानं कोणाच असणं हे शाश्वत असतं."
----------------------

नजरेला ही भाव आणि भाषा असते.
म्हणूनच अस वाटत मला.......
कधी तरी नजरेतून ओळखावं आपल्या माणसांना,
जेव्हा त्यानं बंद केलेलं असत शब्दानां.
सुकलेला कंठ जेव्हा फुटत नाही,
बोलायचं असत पण मूखातून शब्द उठत नाही.
तेव्हा डोळे बोलत असतात, फक्त त्यांच्यात शब्द नसतात.
अशी डोळ्यांची (नजरेची) भाषा समजण्यासाठी मनाची तार जुळलेली असावी लागते.
फार कमी नजरा मनाच्या तारेनं जुळलेल्या असतात,
बहुतेक नजरा तर तनाच्या देखाव्यातच खुळलेल्या दिसतात.
अर्थात...... मनाला भिडलेली नजरंच डोळ्यांची भाषा समजू शकते.
----------------------

तु संयमाने वाग मना !

भंगल्या नात्यातल्या त्या भेगा जुळवीण्यास,
आनंदासह सहजतेने रागा हरवण्या..
तु संयमाने वाग मना !

अहम् पणाचे तेच मनोरे पुन्हा पाडण्यास,
मुखवट्यातील जुणे चेहरे पार तोडण्यास...
तू संयमाने वाग मना !

संशयाचे पडले ठेके मनमनावर जरी,
विश्वासाचे गीत पुन्हा लयीत गातच गाण्यास...
तू संयमाने वाग मनावर !
नाती सारी देखाव्यातील पार *तोडण्यास,
बंध जाणीवेचा घट्ट करण्यास...
तु संयमाने वाग मना !

तुझ्या भावनांच मूल्य राखण्यास,
अन् जगण्याच तत्व जपण्यास.....
तु संयमाने वाग मना !                                                                
----------------------

काय झाले माझ्या मना, काय केल्या कळेना ! कुणासाठी धाव घेई शोधूनीया मिळेना !
भूललास रे पामरा, भावनांच्या मृगजळी ! थांब रे भ्रमरा माझ्या शब्द दाटले गळी !

मी म्हटलं मनाला "ए मना, तु का रे इतका कडू , आपल्यानांच लावतोस उगाचच रडू."
मन म्हणालं "अरे.... मी जेव्हा तुझ्यात नसतो तेव्हा स्वतःला, तुझ्या आपल्यांच्या अश्रूत शोधत असतो."
मी म्हटलं "अरे पण अश्रू म्हणजे नात्याचं सत्व आहे."
मन म्हणालं " तिथंच माझं अस्तित्व असतं."
----------------------

कडू आहे पण सत्य आहे !
सगळे जाणीवांचे झरे आत्मसुखात येऊन सहज आटतात आणि तिथूनच स्वार्थाला पाझर फुटतात.
स्वःसुखासाठी भावनांनचे झेंडे फडकवले जातात आणि कर्तव्य वेशीवर टांगले जाते.
तात्पुरत्या सुखासाठी मनाचं भांडवल केलं जातं आणि मेंदूच्या बाजारात क्षणभंगुर आनंद लुटला जातो.
शब्दांची ढाल आत्मसंरक्षणास वापरली जाते आणि नाती सुळावर चढवली जातात.

जरूरी नाही माझं म्हणनं सांऱ्यांनाचं पटलं पाहिजे, सांऱ्यांनी माझ्या विचारांनीच नटलं पाहिजे.
कारण प्रत्येकाला आपआपल्या सोयीचंच पटतं आणि प्रत्येकजण स्वतःच्या विचारांनीच नटतो.
"विचारांचा विचार करता आला पाहिजे ".

आपलं नातं जर खरोखरच मनाचं आहे तर ते जपा. जर का तुम्ही इतर कुणासोबत मस्त आहात तर उगाच समोरच्यांला वेडं समजू नका.
कारण आपल्या लपवाछपवीच्या शहाणपणाचं प्रदर्शन कधीतरी लागणरंच.
----------------------

* शब्द *
आज शब्द रहायला आला होता, शब्दाला शब्द जोडला आणि आमचा संवाद घडला.
मी म्हटलं "शब्दा !.. तु फार महान आहेस.
अबोल बाळाच्या मुखातूनच अ.. अ...च्या सूरात,
शिरतोस हळूच सांऱ्यांच्या मन घरात.
शब्द म्हणाला " नाही रे तसा मी  "अज्ञ" आहे. म्हणजे  'अ' ते  'ज्ञ' पर्यत.
अविचाराने पाहिलसं तर 'अ'ज्ञान आणि विचार करुन पाहिलसं तर 'ज्ञा'न आहे.
भारावूनच गेलो शब्द सामर्थ्य ऐकून आणि मी दिलं स्वतःला शब्दांमध्ये झोकून.....
मी म्हटलं " शब्दा, तु आहेस म्हणूनच प्रत्येकाला नाव मिळाले आहे, अन् स्वतःच वेगळेपण कळाले आहे.
तुझ्यामुळे 'हसू' 'आनंद' 'दुःख' 'रुसू' सारे मनातून निघून कवी-लेखकांच्या लिखाणातून कागदावर अवतरले आहेत.
तु सागराला तुझ्यातून ओळख देऊन स्वतःला अथांग ठेवलं आहेस.
तु विश्वाला आणि विश्वातील प्रत्येक सजीव - निर्जीवाला स्वतंत्र शब्दरुप ओळख दिलीस.
तु  प्रगल्भ  असं शाश्वत सत्य आहेस. कोणीही नाकारणार नाही असं तथ्य आहेस.
माझ्या जीभेला लगाम घालून शब्द म्हणाला "हुशारच आहेस!
माझ्याच शब्दसुमनांची माझ्यावर उधळण करत तुझ्या रसिकेचं राज्य तयार करतोयसं.
तुझं 'मनोगत' लिहताना हेच करतोस. माझ्यावर नेहमी राज्य करतोस.
तुला माहीत आहे, हे वाचणारे आता वाचताना काय करतील.
मी म्हटलं " नक्कीच ते मनात विचार करत गालात हळूच हसत असतील ". ते हसू ही तुच आहेस " त्यांच्यां 'मनातलं' अन् 'शब्दांतलं'.
शब्द म्हणाला "चल निघतो आता  पहाट झाली..... वाट पाहत असतील माझी सगळे तुझं मनोगत वाचणारे ."

काही कळत नाही !!!

नातं जोडण्यासाठी आधी मनापासून प्रयत्न करतात माणसं,
अन् अचानक त्या नात्यांवर ही संशय घेतात माणसं.
असं का बरं वागतात माणसं?
काही कळत नाही !
एकटेपण असलं की मनाची सोबत शोधतात माणसं,
अन् कोणी थोडं वेगळ भेटलं की सोबतच्याला विसरतात माणसं.
असं का बरं करतात माणसं?
काही कळत नाही?
काही नसलं स्वतःजवळ की ऐकमेकांजवळ सहज हसतात माणसं,
थोडं काही मिळवलं की आपल्यांंजवळ हसणं ही व्यर्थ मानतात माणसं.
असं का बरं करतात माणसं?
काही कळत नाही!
अडचणी असल्या की आपल्यानां आठवतात माणसं,
अन् आनंदात आपल्यानांच विसरून इतरांना जोडतात माणसं.
अस का बरं करतात माणसं?
काही कळत नाही!
---------------------

माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
निरपेक्ष नाती जोडताना,
जीवन रथ ओढताना,
खाचखळगे, चढउतार असणारच.
अशावेळी एकनिष्ठ राहून विश्वास जोपासत पुढं गेलं पाहीजे...
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
प्रत्येक माणूस इथं नवं आणि वेगळं काहीतरी मिळवण्यास धडपडत असतं.
इच्छा, आवड आणि प्राधान्य हे सगळं सोईस्कर बदलत असतं.
अशावेळी अधीर न होता जाणीव ठेऊन वागलं पाहिजे...
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
जीवनाच्या स्पर्धेत सगळे स्पर्धक भिडणारच,
आपआपल्या पद्धतीने नवीन चाल चालणारच,
स्पर्धा म्हटलं की हार जित होणारच.
अशावेळी यश- अपयश प्रामाणिकपणे स्वीकारले पाहिजे....
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
---------------------------------

भावनांचा बाजार....
आज बाजारात काय स्वस्त आहे?  खोटेपणा !
आज बाजारात काय उपलब्ध नाही?  खरेपणा !
आज बाजारात काय फ्री मिळत आहे?  खडुसपणा !
आज बाजारात काय जाणवतयं?  खवटपणा !
आज बाजारात काय शिजत आहे?  खुरापतीपणा !
आज बाजारात काय जाणवत नाही?   खमंगपणा !
---------------------------------

पहावं जरा स्मरुन !
कोठून आपण सुरूवात केली, कशी धडपड करुन.
मिळवलं सारं काही अपण ज्यांचा हात धरून.
कधीतरी त्यांची साथ पहावी जरा स्मरुन...
असे क्षण बरेच आहेत जेव्हा आपण गेलो होतो बावरून.
अलगद कोणीतरी आपल्याला घेतलं होत सावरून.
कधीतरी त्यांचं प्रेम पहावं जरा स्मरून...
एकटेच पुढे जात आहोत कोणी दिसत नाही दूरून.
ज्यांचा आधार घेतला त्यानां मागे आलो सारून.
कधीतरी त्यांची सोबत पहावी जरा स्मरून....
कोण इथं अमर राहणार वेळेवर मात करून.
एका क्षणाला सारेजण जाणार कर्म भरून.
कधीतरी त्यांंचा त्याग पहावा जरा स्मरून....
---------------------------------

मन थोडं खिन्न होत !  कारण...
मुद्दा अविश्वासाचा नसतो, रक्ताचं नातं नसतानाही एकमेकांना समजून घेतलेल्या मनातील श्वासाचा असतो.
मुद्दा आवडीचा नसतो, अनेकांना बाजूला सारून मनापासून आपण केलेल्या निवडीचा असतो.
म्हणूनच...मन थोडं खिन्न होत ! कारण...
मुद्दा कसल्याही उणीवेचा नसतो, स्वार्थ पाठी विसरलेल्या जाणीवेचा असतो.
म्हणूनच...मन थोडं खिन्न होत ! कारण...
मुद्दा डोळ्यांतील अश्रूचा नसतो, त्यानां जन्म देणाऱ्या मनातील निर्मळ भावनांचा असतो.
म्हणूनच...मन थोडं खिन्न होत ! कारण...
---------------------------------

प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागतं असतो !
कोणी इतरांसाठी तर कोणी स्वतःसाठी जगत असतो.
अर्थात... कोणी कशासाठी आणि कोणासाठी कसं जगायचं हे जे तो स्वतःच्या मनानं ठरवत असतो.
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो !
तसं आपण कुणाला काय देतो. रक्ताचा असो वा जोडलेला आयुष्यभर थोडी राहतो.
कोणी कोणाचं मन  किंवा धन थोडीच चोरत असतो, त्यातला आनंद आणि समाधानाच क्षण स्वतःशी जोडत असतो.
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो !
कोतीतरी समोरच्यात आपलं सर्वस्व पाहत असतो. तर कोणीतरी सर्व काही साधत असतो. जो आपले हेतू ठाम ठेऊन वागत असतो.
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो !
---------------------------------

सवय...
जन्म झाला तेव्हा कोणा एका डाँक्टरने आपल्याला पहिल्यांदा हाथ लावला. काळजीचा हाथ होता तो तरीही रडलो.
पुन्हा आईच्या जवळ जाताच केवळ तीच्या उबदार स्पर्शाने शांत झालो.
अर्थात...तीच्या गर्भातच तीच्या उबेची सवय होती.
नंतर अनेक हातांंनी आपल्याला उचललं, खेळवलं पण सांऱ्यांच्याच हातात आपल्याला तसा उबदार आपलेपणा जाणवला नाही,
जेव्हा कधी आपल्याला मायेचा आणि सुरक्षिततेच्या ओलाव्याची कमी वाटली तेव्हा ही आपण खूप रडलो. परत आपल्याच्या सुरक्षा कवचात जाण्यासाठी.
अर्थात...आपल्याला आता आपले कोण याची सवय झाली होती.
आपण चालू , बोलू लागलो म्हणजेच शाळेत आलो. आता माञ स्पर्शातील उबदार पणाचा आपल्याला विसर पडला.
आता आपण  फक्त विचारांची उब शोधू लागलो. जे आपल्या विचारांना मान्य करतील ते आपले समर्थक (मिञ) आणि जे आपले विचार मान्य करणार नाहीत ते आपले विरोधक (शञु).
अर्थात...आता आपल्याला विचारांच्या राजकारणाची सवय झाली.
आता आपण पैसा कमवायला लागलो. इथं मिञ आणि शञू या संकल्पना संपल्या. इथून पुढं सगळं व्यवहारात असणार. आपल्याला आवडणारे आणि न आवडणारे या सगळ्यांमध्ये आपण झक मारुन बसणार. अर्थात...आता आपल्याला इतरांना सहन करण्याची सवय झाली.
आपण कमवते झालो म्हणून आपलं लग्नाचं वय झालं. लग्न झालं आणि मायेची उब संपली आता फक्त शरीरांची देवान-घेवान एका नवीन शरीराला आकार देण्यास.
अर्थात ...स्वतःच्या इच्छेनुसार न जगता केवळ संसाराच्या चक्रात फीरण्याची  सवय आपल्याला आपोआप होणार.
आणि पुन्हा तेच! सवयीच चक्र निरंतर वंशपरंपरेने पुढे जाणार.

मनोगत...

धर प्रहरा हात माझा...!!!

धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
मनी मनांच्या गुंतलेला,
अश्रूंनी चिंब भिजलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
भावनांनी बांधलेला,
वेदनांनी सांधलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
विश्वासाने जोडलेला,
संशयाने तोडलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
----------------------

कधीतरी....
एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
समोरच्याला विश्वासात घेण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
जे आपल्याला आवडत नाहीत त्यानां अडचणीत पाडण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
आपल्या आवडत्या व्यक्तीचं समर्थन करण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
एखाद्या वेळेस कळत तर कधी नकळत , कशासाठी तरी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
खोटं बोलणं चुकीचं नसतं पण त्यातून एखाद्याचं मन दुखवणे किंवा एखाद्याच नुकसान करणं वाईट असतं.
----------------------

कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना! सगळंच आहे वाऱ्यावर जरी दिसत आहे स्थावर,
जीवनाच्या पुस्तकाला नाही नात्याचं कव्हर. सगळीच फरपड समाधान मिळेना...
कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना! सगळंच आनंदी दिसतयं जणाला,
मनाची सल कळेना कोणाला. सगळीच ओढातान कारण मिळेना... कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना
----------------------

आपण विचार करतो तेवढं सगळं सहज नसतं आणि आपल्याला वाटतं तेवढं सगळ सोपं ही नसतं.
प्रत्यक्षात आयुष्य म्हणजे एक संघर्ष आहे, स्वतःचा स्वतःशीच करायचा फक्त आत्मविश्वासाने करायचा.
संघर्ष संघर्ष असावा त्यात सूड आणि मुड नसावा.
----------------------

खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं.....
आपण सारेच कुठं बरं सोन्यासारखे शुद्ध असतो, मग खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्यानां स्वीकारून वागावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं.....
आपण सारे कुठे बरं असतो नेहमी खरे, मग उगाच समोरच्याशी खोटेपणानं वागावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं......
आपण थोडी ना सर्वांची दुःख भरून काढतो, मग तोंड देखला आनंद देण्यापेक्षा मनभरुन समाधान द्यावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं....
----------------------

इतरांचा स्वभाव बदलण्यापेक्षा स्वतःची उंची कायम ठेवा. कारण आजूबाजूच्या सामान्य माणसांच्या गर्दीत आपण असामान्य आहोत हे उंचीच दाखवते.
उंचीचे दोन फायदे असतात....
१. आपल्याकडे बघणाऱ्यांना खाली मान घालण्याची गरज नसते ते ताठ मानेने राहतात.
२. आपण कोणाकडे बघीतलं नाही तरी लोक आपल्याकडे बघतातच.
अर्थात....
ज्यांना आपणआवडतो ते अभिमानाने बघतात आणि ज्यांना आपण आवडत नाही ते स्वाभिमान जपण्यास वर मान करून बघतात.
----------------------

देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
कोण आहोत आपण ? दिव्य शक्ती तर नाही ना !
तरी का जपत असतो आपण निष्फळ अहंकार, कधीतरी पहा त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
आपण हसलो नाही तर सारं जग दुःखी होईल असं आहे का ? नाही ना ! मग हसावं माणसानं बिनधास्त पोटभरुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
आपली नोदं भूतकाळात नाही आणि भविष्यात काय याची खाञी नाही !
तरी का उगाच व्यर्थ घालवतोय आपण वर्तमान. त्यापेक्षा जगा मस्त स्वतःवर प्रेम करुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
कोण आहे असं जे आपल्या वेदना वाटून घेईल ? कोण आहे असं जे मेल्यावर आपल्या सोबत येईल ?
असं करणं माणसाला शक्य नाही. कारण शरीर स्वतःच त्यामुळे जिवंत असे पर्यत त्याचं जे काही होईल ते आपल्यालाच सहन करायचं आहे.
मग कशासाठी आपण ही धन-दौलत साठवतोयं , असह्य धावपळ करुन रक्त आठवातोय ! त्यापेक्षा मुंगीपाखरा सारखं आनंदानं जगावं मिळवून कणभर.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभर !
----------------------

त्या दिवशी मटकत मटकत जात होती, स्वतःच्याच तालात हसत गालात.
तीला सहज विचारलं "एवढी आकडतेस ! काय आहे तुझ्यात?"
म्हणाली... सगळ्या पेक्षा वेगळंच आहे माझ्यात !
मी स्तःला सावरलं..अन् विचारलं :
तरी तूला जमतं सगळ्या सारखं वागायला? लाज नाही वाटत असं सरळ सरळ सांंगायला.
म्हणाली..... त्यात कसली आलेय लाज ! माझा हा नेहमीचाच साज.
बऱ्याच जनांचे चे तर मला बघूनच गळतात....... पाय.
ज्यानां मी मिळत नाही मी, ते फक्त चोळतात...... आपले हाथ !
मी म्हटलं अशी चावट भाषा एवढ्या सहज कशी बोलतेस ?
म्हणाली..जे आहे ते आहे. मी थोडीच टाळते !
ज्यालां जे पाहिजे ते ते निवडतात , मला सांऱ्यां गोष्टी स्पष्ट दाखवायला आवडतात.
ज्यांना जमतं ते घेतात, नाही तर गुपचूप निघून जातात.
मी म्हटलं ..... तुझं बरं  आहे.
लगेच म्हणाली .... सगळं खरं आहे.
गेली लगेच निघून मटकत मटकत....मी आपला राहीलो बघतं !
......अशी ही लबाड " वेळ " हो !

मनोगत.......

कसं व्हायचं माणसाचं...!!!

स्वतः केलेलं सारं सार्थ आणि समोरच्यानं स्वतःसाठी काही केलं तर व्यर्थ.
सारं काही हवं असतं माणसाला फक्त अर्थाच.....
म्हणून मला वाटतं...कसं व्हायचं माणसाचं...
स्वतःला जे हवं ते मिळालचं पाहिजे आणि समोरच्याला हवं ते नसलं तरी चालतं....
म्हणून मला वाटतं...कसं व्हायचं माणसाचं...
-----------------------------------

आपण सारे संपत्ती कमवू अमाप, पण त्या संपत्तीने शेवटच्या क्षणाला  श्वास विकत घेता येत नाही.
आपल्या आजूबाजूला माणसं असतील अगणित, पण माणसांच्या गर्दीत जेव्हा गरज असते कुणाची तरी तेव्हा मनाच्या नात्याशिवाय कोणी पुढं येत नाही.
-----------------------------------

सारं काही जमतं प्रत्येक माणसालां, जसं पंख आल्यावर उडता येतं शेणातल्या कीड्याला.
सारं काही कळत असतं प्रत्येक माणसलां, जसं ज्ञान असतं छोट्याश्या मुंगीला.
सारं काही आवडणारं हवं असतं प्रत्येक माणसालां , इथं माञ उदाहरण म्हणून मांडता येतं नाही कोणाला.
-----------------------------------

जन्म झाला सर्वाचाचं आणि स्वतंत्र झालो आपणं आईच्या नाळेपासून.
डोकं आपलं असावं शांत आणि सकस म्हणून तेल होत टाळूपासून.
शब्द ओळखायला आणि वाक्य बोलायला शिकलो आपण शाळेपासून.
जग आपल्याला समजलं आणि नातं उमगलं जेव्हा दूर गेलो घरापासून.
नात्यात राजकारणाचं तंञ आणि व्यवहाराचा मंञ कळलं इतरांपासून.
वाईट एवढयाचचं वाटतं की... आपण सगळं मिळवलं फक्त स्वार्थापासून.
-----------------------------------

खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
भावनांच्या प्रवाहात मनाची नाती जोडून, अचानक मेंदूच्या आहारी जाऊन. दुसऱ्यावर आरोप करून स्वतःला निर्दोष ठेवतो तेव्हा...
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
चांगलं असेल तेव्हा सक्रीय राहून, वेळप्रसंगी निष्क्रिय राहून. समोरच्यांना निकड असताना आपण अंग काढून लपून राहतो तेव्हा ...
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
वचनचिठ्ठी बंद करुन, कर्तव्याला बाजूला सारून . एकनिष्ठतेची लक्तरे आपण वेशीवर टांगतो तेव्हा...
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
आपूलकीचा चेहरा ठेऊन, प्रेमाचे अश्रू दाखवून. जाणीवेचा जेव्हा  बाजार करतो तेव्हा....
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
-----------------------------------

असं का वागतं मन कळत नाही !
जोडलेल्या नात्यातील, निरागस भावनेच्या रोपाला जपतं जीवापाड. अन् अचानक होत मोठं रागाचं झाड..
असं का वागतं मन कळत नाही !
वेडं होऊन देतं फक्त मायेची सावली, अन् अचानक कधीतरी होतं हट्टी बाहुली...
असं का वागतं मन कळत नाही!
सांऱ्यांचा त्याग करून आलयं तुमच्या सावलीत, पण अचानक कधीतरी गूंतंत माऊलीत...
असं का वागतं मन कळत नाही !
सगळ्यांना जपताना स्वतःला सावरत, अन् अचानक कधीतरी एकटेपणानं बावरतं...
असं का वागत मन कळत नाही !
खूप विचार करतो मी पण उत्तर मिळत नाही.
-----------------------------------

अथांग पसरलाय हा जीवन समुद्र, आपण जेव्हा एकटे असतो या प्रवासातल्या बोटीत.
आलचं समजा अचानक नैराश्यांचं वादळ, तर असावं कोणीतरी आपलं अलगद घेणारं मिठीत.
-----------------------------------

संयम आणि शांतता ह्या सर्वांत मोठ्या शक्ती आहेत.
संयम तुम्हाला मेंदूने बळकट करतो. आणि शांतता मनाने बळकट करते.
-----------------------------------

आपल्याला भेटून सगळे आनंदी झाले पाहिजेत असे नाही.
पण आपल्याला भेटून कोणीही दुःखी होऊ नये हे महत्वाचे.
-----------------------------------

कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.
नेहमीच ठेवलं होती मी नाउमेदीचं धेय्य, आनंदाने स्वीकारलं मेहणतीच श्रेय.
नेहमीच वेळेबरोबर केले अथक परिश्रमाचे युद्ध, मिळवले समाधान हरपून सारी शुद्ध.
कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.
जपलयं आतापर्यत बिनरक्ताच्या नात्यातलं सत्व, आत्मसन्मानात जगण्याचं असाधारण तत्त्व.
नाही कोणाची हूजुरी नाही कोणाचा गुलाम , निडर नेतृत्व नाही कोणाला सलाम.
कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.
विरोधकांचे गेम, आपल्याचं प्रेम. गरूड भरारी ची तहान, अस्तित्व मार्ग  हा एकच मान.
कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.

मनोगत...

आपण सर्वच तसे शहाणे असतो...


आपण सर्वच तसे शहाणे असतो पण वेळेनूसार भोळेपणाचा मुखवटा घालतो.
समोरच्या आपल्याला काय हवं! काय नको! ते फार साधवपणे शोधत असतो, हवं ते त्याच्या कडून मिळवत नको तेव्हा त्याला बरोबर टाळत असतो.
आपण सर्वच तसे शहाणे असतो पण वेळेनूसार भोळेपणाचा मुखवटा घालतो.
समोरचा मूर्ख आहे असा गैरसमज करून, मनात रोष असला तरी खोटे हसू चेहऱ्यावर खेळवत असतो.
आपण सर्वच तसे शहाणे असतो पण वेळेनूसार भोळेपणाचा मुखवटा आणतो.
-----------------------------------

माणसानं अपेक्षा आपल्या क्षमतेनूसार कराव्या आणि अपेक्षा मोठी असल्यास आपली क्षमता वाढवावी.
माणसानं स्वप्नं तर बघावी पण ती प्रत्यक्षात आणण्यास कृती करावी.
माणसानं नाती जरूर जोडावी पण ती जपण्याची जाणीव ठेवावी.
-----------------------------------

माणसाला कालची गोष्ट आणि उद्याची गोष्ट आत्ताच्या क्षणात मिळवता येत नाही...
तरीही माणूस आजजे महत्त्व ओळखू शकत नाही यातचं सुख आणि समाधान हरवून जातं.
-----------------------------------

माणसाला काही नाही करता आलं तरी, जाणीवेचं मूल्य धरता आलं पाहिजे.
जरूरी नाही की सारं काही चांगलचं करता आलं पाहिजे, पण विस्कटलेलं सावरता आलं पाहिजे.
नेहमीच जिंकलं नाही तरी अपयश स्वीकाराता आलं पाहिजे.
-----------------------------------

इतरांसाठी आपण झूरत राहायचं आणि त्यांनी माञ मजा मारत राहायचं.
मग आपण तरी कशाला मनानं मरत राहायचं त्यापेक्षा मस्त जगायचं.
असही सगळेच कुठे सरळस्ष्ट असतात, लपतछपत मिष्ठ असतात.
मग आपण तरी कशाला कडू व्हायचं, आपल्या मनाला रडू द्यायचं.
त्यापेक्षा मस्त जगायचं आपल्या मनासारखं वागायचं.
-----------------------------------

"प्रेम" आणि "राग" ह्या दोन्ही ऐकण्यात वेगळ्या वाटतात, वेगवेगळ्या परिस्थितीत येतात.
पण एक गोष्ट सारखीच करतात कोणाच्या तरी भावना दुखावतात आणि स्वार्थापायी जाणीव विसरून क्षणभंगुर सुखासाठी जपलेलं नातं सहज पायदळी देतात.
-----------------------------------

"एक" आणि "अनेक" यामधील माणसालां एकच निवडता येतं. माणसं ही फार हुशारीने आणि स्वतःच्या सोयीने यामधील स्वतःसाठी निवडत असतात.
पैसा हा पैसा असतो, एक रूपातला तरी माणसाला तो अनेक संख्येत हवा असतो.
माणूस हा माणूस असतो पण अनेक रूपातला तरी माणसाला आवडत माणूस एकच हवा असतो.
-----------------------------------

आपण जन्मलो तेव्हा इतरांची गरज म्हणून पहीलं वस्ञ घातलं ते "लंगोट".
आपण मरतो तेव्हा इतरांची गरज म्हणून शेवटचं वस्ञ घातलं ते "कफण".
या दोन्हीनां खिसा नाही तरी आयुष्यभर काय जमवत असतो आणि कशासाठी?
-----------------------------------

तसं... प्रत्येकाला स्वतःची स्वप्नं असतात. फरक एवढाच की,
काहीजण ती एकनिष्ठतेने साध्य करत असतात तर काहीजण ती धूर्तपणे साध्य करत असतात.
तसं.... प्रत्येकाला स्वतःच्या इच्छा असतात. फरक एवढाच की,
काहीजण त्या आपला विश्वास ठसवून पूर्ण करत असतात तर काहीजण त्या कोणाला तरी फसवूण पूर्ण करत असतात.
-----------------------------------

चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.
जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा.
-----------------------------------

घर जेवढ मोठ असतं तेवढ्या खिडक्या मोठ्या नसतात.
घराला खिडक्या कितीही असल्या मुख्य दरवाजे अनेक नसतात.
घराचा मुख्य दरवाजा कितीही मोठा असला तरी त्याचं कुलूप तेवढं मोठ नसतं.
घराचं कुलूप जेवढं मोठं असतं तेवढी मोठी त्याची चावी नसते.
अर्थात....घर कितीही मोठं असलं तरी त्यावर अधिकार चावीचा असतो.                                                                   माणसाचं अस्तित्व देखील असंच असतं.
घर म्हणजे शरीर.
खिडक्या म्हणजे नाक-कान.
दरवाजा म्हणजे तोंड.
कुलूप म्हणजे जीभ
आणि...चावी म्हणजे मन.
"मन म्हणजे अरुप धन"

मनोगत....