एकटेपणा मनाचा...

कधी  कधी काहीच सुचत नाही… एक शून्यता साचून राहते, मनात आणि विचारात.
आपण सतत काहीतरी ठरवू पाहतो आणि ठरत नसतच काही..कोटीने आदळत राहतात विचार मनावर आणि आपण निर्विकार…!
कोणताही विचार आपल्या भावनेशी आणि मनाशी नात सांगत नसतो.आपण त्या अवस्थेत सुन्नही नसतो आणि सजगही…!
कोणाशीच काहीच बोलावंसं वाटत नसतं.. काहीच ऐकावंसंही नसतं वाटतं..आपल्यासमोर रोजचे प्रश्नच इतके असतात...
की, त्यांचा अथक विचार करून दमून  जातं मन.. त्याच्याकडे एक प्रश्न नसतोच कधी.. त्याला एकही दिवस वीकली ऑफ मिळत नसतोच...
आपण खुशाल झोपतो रात्री शांत.. पण आपलं मन हुडकत राहत त्याच्यात दडलेल्या प्रश्नांची उत्तरं...
आपले ताण, यातना, सुखं-दुख्ख सारं काही त्याच्यावर टाकतो आपण… पण ते मनही थकून जातं.
बिचारं विसावण्यासाठी एक कोपरा शोधत असतं.. असह्य होतात त्यालाही ताण…
नसतात शोधायची त्याला कोणतीच उत्तरं… नसतो करायचा कोणताही विचार सुद्धा...!
----------------------------------------------------

आज मी तिला ( वेळेला ) एकाच वेळी बरचं काही विचारलं !

तुलाही सहज दोष देतात माणसं  तेंव्हा कसं वाटतं तुला नेमकं? तू कशी डील करतेस या माणसांशी ?
कसं ठरवतेस ग कोणाला काय द्यायचं.. कधी द्यायचं आणि कस द्यायचं ते..?
ज्यांना काहीच देत नाहीस त्यांची काय चूक असते..? आणि ज्यांना देतेस अशांनी काय ग पुण्य कमावलेलं असतं..?
इतका टफ जॉब डेडलाईन न चुकवता पार कसा पाडतेस..? तुझी घालमेल, अस्वस्थता, निराशा कंट्रोल कशी करतेस..?
की तुला यातलं काहीच होतं नाही कधीच..?
हळूच हसली जराशी.. म्हणाली " एवढा विचार करायला वेळ नसतो रे मला... पण वेळ मिळाला तर नक्कीच सांगेन तुला.
----------------------------------------------------

मन... एक गर्भ विचार !

माणसाला मन आहे असं आपण म्हणतो. हे मन म्हणजे नेमकं काय असते ? मनात विचार आला..म्हणजे कुठे विचार येतो ? मन हा काही अवयव नाही.
ह्रदय हा अवयव आहे पण त्याचा व प्रेमाचा संबंध नाही. ते बिचारे ह्रदय रक्त पुरवठा करते, त्यात चार कप्पे असतात व त्यातील एकही प्रेयसीचा किंवा प्रियकराचा नसतो.
मग या मनाचा नक्कीच मेंदूशी indirect संबंध असावा. आपल्या मनात अनेक विचार येतात. मनात म्हणजेच ते मेंदूतच येत असावेत.
पण निरर्थक व काहीही उपयोग नसणारे विचार निर्माण करण्याची मेंदूला काय गरज ? तसं पाहिलं तर मेंदूचं काम खूप किचकट आहे व तसेच ते न उलगडणारं कोडे आहे.
जसं आपण म्हणतो कि माझ्या मनात विचार आला पण मी तसं वागलो नाही किंवा तो विचार मलाच पटला नाही,
याचा अर्थ विचार चुक की बरोबर हे आपला मेंदू पुर्वीच्या अनुभववावरुन , ज्ञानावरुन ठरवतो व काही विचार सोडून देतो काही कृतीत आणतो.
हे सगळं मेंदूच करत असेल तर मग तो त्यानेच निर्माण केलेल्या एका विचाराला महत्व देतो आणि दुसऱ्याला देत नाही हे असं का होतं ?
मन जर मेंदूपेक्षा वेगळं काही आहे हे मान्य केलं तर मग तात्पुरतं आत्मा / आंतर आत्मा वगैरे ही मान्य करावं लागेल.
पण यांचा व मेंदूचा काही संबंध दिसत नाही. मेंदू फक्त शारिरीक क्रिया प्रतिक्रिया व स्मरणातील गोष्टी यांच्यावरच कार्य करत असेल तर नक्कीच आत्मा नावाची काही तरी गोष्ट असेलच व यातच हे चुक व बरोबर ठरवण्याचे उद्योग चालत असावेत. आपल्या पंचेंद्रियांपेक्षा वेगळं एक इंद्रिय आपल्याला माहिती देत असतं त्याला आपण 6th Sense म्हणतो मग याचा व मनाचा काही संबंध असेल का ?
आपण म्हणतो एकदम डोक्यात विचार आला किंवा मनात आला तो नेमका कुठून येतो ? आपले संत महात्मे जे सांगतात तो हाच आत्मा तर नसेल ? मन...!
----------------------------------------------------

माणसाच्या जगण्याच्या मुलभूत गरजा कोणत्या? असा प्रश्न विचारला की, आपण लगेच उत्तर देतो – “अन्न, वस्त्र आणि निवारा..” याच मुद्द्यावर म्हणजे “मुलभूत गरजा आणि त्यांच्याशी संबंधित करिअर्स” या विषयावर मी पालकांच्या चर्चासत्रात बोलत होतो. करिअर कसं निवडावं आणि प्रत्यक्षात ते कसं निवडलं जातं, हा त्या चर्चेतला एक प्रमुख मुद्दा होता. आपल्या मुलांची करिअर्स निश्चित करत असताना आपल्या विचारांची दिशा नक्की कशी असावी आणि महत्व नेमकं कोणकोणत्या गोष्टींना द्यावं, असाही एक मुद्दा चर्चेत आला. मुलं तर करिअर निवडताना गोंधळलेली असतातच, पण त्यांचे पालकच कितीतरी अधिक गोंधळलेले असतात आणि भ्रामक समजांची मोठमोठी वजनदार गाठोडी त्यांच्या डोक्यावर असतात,
“समाधान, आयुष्य जगण्यातला आनंद, इतरांना वेळ देणं, स्वतःला वेळ देणं” या गोष्टी करिअर मध्ये महत्वाच्या असतात, हे कळूनही आता मागे फिरणं शक्य नाही, असल्या वाटा निवडण्यापूर्वीच विचार केला पाहिजे. पॉश आणि चकचकीत आयुष्याच्या मोहात पडून मोठमोठ्या कर्जांच्या हप्त्यांच्या ओझ्याखाली आयुष्यातली २५-३० वर्षं जगत राहणं, हे कितपत योग्य आहे? आणि याला यशस्वी करिअर म्हणायचं का?
करिअर हे असं असतं का? स्वतःच्या आवडी-निवडी, छंद, मन रमवणं या गोष्टी सोडून देण्यासाठी असतात का?  एखादा कोर्स करून किंवा अभ्यासक्रम पूर्ण करून, घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं, पैसे कमावण्यासाठी नोकरीच्या भोवती गोलगोल फिरत राहायचं आयुष्यभर.. याला करिअर म्हणतात का?
सततचा मानसिक-शारिरीक ताण, कामाचा न संपणारा व्याप, व्यस्त नीरस जीवनशैली, अनियमित वेळापत्रक, वेळी-अवेळी प्रवास, सतत ऑनलाईन असणं, सततची दगदग आणि त्यामुळं आपण आपल्या आनंदापासून कायमचं दूर जाणं  हे सगळं सकारात्मक आणि यशस्वी करिअरच्या व्याख्येत बसतं का?
मी प्रश्न निर्माण केले आणि ज्यांना उत्तरे मिळणार नाहीत त्यांनी माझ्याशी बोलावे असे सांगितले.... तहान असेल त्यालाच पाणी पाजावे.
----------------------------------------------------

बदलत्या नात्यांचं वादळ.....!

बालपण... शाळा... कॉलेज... नोकरी... प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे हे टप्पे...
आयुष्याच्या या सर्वच सुखद वळणांवर प्रत्येकाला भेटतात, सखेसोबती. त्यांच्याच साथीने हे आयुष्य अधिक सुंदर, समृद्ध बनतं, फुलत जातं.
या आयुष्याच्या विविध वळणांवर भेटलेल्या मित्रमैत्रिणींशी जुळलेले ऋणानुबंध काळानुरूप फुलत, बहरत जातात आणि ते आयुष्यभराचे साथी होतात.
लग्न हा आयुष्यातला असाच एक अटळ टप्पा. या टप्प्यावर भेटतो नवरा नावाने जोडलेला जीवनसाथी.
त्यामुळेच आयुष्यातील काही सखे-सोबती विस्मरणात जातात, काही जाणीवपूर्वक जपले-जोडलेही जातात.
खरं तर बदलत्या काळात, बदलत्या जीवनशैलीत कोणतंही नातं त्रासदायक ठरावं, अशी परिस्थिती नाही.
त्यामुळेच या धकाधकीच्या काळात शेअर करण्यासाठी, मनमोकळा संवाद साधण्यासाठी कुटुंबाव्यतिरिक्त कुणीतरी असावं, असं वाटणंही साहजिक.
दिवसाभरातला सर्वाधिक काळ करिअरच्या ठिकाणी जातो. काही वेळा आयुष्यातील मागच्या टप्प्यांवर भेटलेले दोस्त आवर्जून संपर्कात राहतात.
मग, केवळ जोडीदाराच्या अट्टहासासाठी हे सारेच बंध झुगारावे का ? जपलेली नाती तोडावीत का ? हा विचार ज्यानं त्यानं करणं आवश्यक आहे.
त्यामुळे परस्परांची स्पेस जपत आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता आयुष्यातील विविध टप्प्यांवर भेटणारी माणसं, जुळलेले बंध आणि मैत्री याकडे पाहिले तर बघण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदलू शकतो.


अहिराणी आमची बोली....

उत्तर महाराष्ट्र (खान्देश) मधील लग्नातील काही व्हिडिओस जे मी गावी गेलो असताना शूट केलेले...
आमची बोली भाषा अहिराणी आणि आम्हाला जास्त आवडणारी गाणी पण अहिराणीच असतातं....

  • हळदीच्या रात्रीचा डान्स... फुल्ल टू  देशी स्टाईल...




  • खान्देशी डीजे बॅण्ड


  • नवरदेवाच्या वरातीतला डान्स.. फुल्ल टू धमाल 


अहिराणी धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यांत बोलली जात असली तरी तिचे बोलले जाणारे स्वरूप सर्वत्र सारखे नाही. धुळे हा अहिराणीचा केंद्रप्रदेश मानला जातो. नाशिक जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर मराठीचा जास्त पगडा असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर गुजरातीचा प्रभाव आहे. गुजरात सीमेला लागून असल्यामुळे हा प्रभाव नवापूर, नंदुरबार भागांत जास्त आढळतो. जळगाव जिल्ह्यातील अहिराणी भाषा वऱ्हाडी-वैदर्भी भाषेला जवळची वाटते.

आठवणीतलं नातं !...

आयुष्यात खूप काही गोष्टी करायच्या असतात. योग्य वेळी त्या करू अशी आपणच आपली समजूत घालतो, पण ती योग्य वेळ कधीच येत नाही. हळूहळू जाणीव होते आयुष्य हातून निसटून जाण्याची जशी गच्च मुठीतून वाळू सरकून जाते. प्रत्येक दिवस संपताना आयुष्य संपून गेल्याची चाहूल लागते. मग हळूच पानावलेल्या डोळ्यामध्ये येतात आठवणीतली नाती.

रक्ताच्या नात्यांपेक्षाही वेगळी, नावं नसलेली पण मनाने जोडलेली आतल्या आत जपलेली अनेक नाती आठवत राहातात. त्यातलंच एक हे एक आठवणीतलं नातं आहे. त्या नात्याला नव्हतं कधी कसलं कुंपण. ना वयाचं... ना देहाचं......ना अंतराचं...ना संवादाचं....बांधिलकी होती ती फक्त विश्वासाची आणि प्रामाणिकपणाची. 

ते नातं कधी फुलवायचं गालावरची खळी तर कधी पुसायचं गालांवर ओघळणारे अश्रू. ते नातं निर्मळ अन् निस्वार्थी होत. त्या नात्याला माहीत होता फक्त जगण्यासाठी लागणारा  "जाणीवेचा ऑक्सिजन ".
---------------------------------------

असं असावं आपलं नातं !

लाटांच किनार्‍याशी असतं, एक अशब्द नातं !
लाटा कधी.....आवेगाने रौद्र रुप धारण करून येतात... 
       कधी अक्राळविक्राळ तांडव करत येतात... 
तर कधी संथपणे एखाद्या रमणीसारख्या लयबद्ध हालचाली करत येतात. लाटांची रुपे प्रत्येक वेळेस वेगळीच !
       कधी नुसतच नितळ पाणी तर कधी मात्र त्या सोबत वाळूही.
       कधी ती येतात उचंबळत, खळखळत. तर कधी हलकेच गर्दीतून डोकावून पहाणार्‍या एखाद्या उंच माणसासारख्या मान उंचावून पाहात येतात.
        सरतेशेवटी किनार्‍याशी आल्या की लाटा शांत होतात आणि सगळी ख़ळब़ऴ बाजूस सारून शांतपणे त्याच्या मिठी एकरूप होतात.
          अन्... एकरूप नाही झाल्या तरी मागे सरुन दुसर्‍या लाटेत विलिन होते.
---------------------------------------

"नातं... मनाचं आणि भावनांच !..."

एकदा का स्वतःची हतबलता जाणवली की मग मनाला आलेली भरती डोळ्यांपर्यतं पोहोचते. कशानकशा प्रकारे तो उचंबळ बाहेर येऊ पाहतोच. आठवांचे, जाणिवांचे प्रतिबिंब, ओघळणार्‍या प्रत्येक आसवात पुन्हा दिसू लागते.

एखाद्या सरणार्‍या चित्रफितीसारखे ते क्षण आसवातून डोळ्यासमोर सरत जातात आणि मग हलकं होणारं मन त्या आसवातील क्षार विसरून पुन्हा त्याच्या नेहमीच्या जगात परतू लागतं.

मनाची जडणघडण किती विचित्र ! भावनांच आसवांशी नेमकं काय नात असावं हेच कळत नाही. कुठे ना कुठे... कधी ना कधी.... एखादी भावना मनाला एकांतात गाठतेच. मग ती त्याच्यासंगे बोलते, बोलता बोलता मनाच्या तटबंदीमागे साकळलेल्या आठवणींनां वाट मो़कळी करून देते.

अन् कळत नकळत मन भावनांन सोबतच नातं सांगत डोळ्यातून बरसतं.

नातं..... मनाचं आणि भावनांच,
जसं..... माझं आणि तुमचं !
---------------------------------------

"जिद्द........"

जिंकण्याची जिद्द, जिंकण्यासाठी प्रयत्न , जिंकेपर्यंत प्रयत्न करत राहणं, त्यासाठी लागतील ते सर्व कष्ट करणं- आणि आपल्याला कोणत्या क्षेत्रात आपलं अस्तित्व करायचं हे ओळखणं म्हणजे ‘स्वत:च्या ओळखी’पासून व्यक्तिमत्त्व विकास  किंवा चारित्र्य घडणीपर्यंतचा प्रवास.

विचारांनी गुंतागुंत...

विचारांचा खेळ काही निराळाच..
मी नको असलो तरी तुमच्या विचारात ,
तुम्ही हवे आहात म्हणून माझ्या विचारात.
विचाराने विचार केला तुम्हांला विसरायचा
पण विचारांच न जुमानता तुम्ही पुन्हा माझ्या विचारात…
तूम्ही विचारून विचार मुरवला माझ्या विचारात
मी मात्र उगाचच , न विचारता तुझ्या विचारात…
कोणतीही संमती न घेता मी हैदोस घालतो तुमच्या विचारात
तुम्ही मात्र नेहमीच निरागस माझ्या विचारात…
तूम्ही हलकेच गुदगुल्या करता माझ्या विचारात
आणि मी खुदकन हसतो तुमच्या विचारात
 तुम्ही खूपच हूशार, चाणाक्ष, आणि भूरळ घालणारे माझ्या विचारात
आणि मी सभ्य, सुशील, शब्दखेळात तुम्हांला अडकवणारा माझ्या विचारात…
आपल्या विचारांच्या या दुनियेत बरेच साम्य आणि विभिन्नता
तुमच्या विचारतली मी आणि माझ्या विचारातला तुम्ही यातही असेल का साम्य?
कि असेल फक्त विभिन्नता?
-------------------------------

कोडं स्वभावाचं....

कुणी सौम्य तर कुणी भयानक रागावतं,
कुणी अबोल होतं तर कुणी रुसून बसतं.
तर कुणी अगदी जुळलेल नातंच डावावर लावतं.
नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची ऐकमेकांकडून काहीं ना काही अपेक्षा असतेच.
त्यामुळे रागावणं , रुसणं , ह्या सारख्या गोष्टी अधेमधे घडत राहतातच.
कुणाला आपलं वागणं पटत नसतं,
कुणाला आपला चेहरा मोहरा पसंद नसतो,
कुणाला आपला स्वभाव नडत असतो,
तर कुणाला निर्मळ मायेची अपेक्षा असते पण त्याची पूर्तता होत नसते,
कुणाची काही अजबच मागणी पुरी होत नसते.
ह्या त्या कारणास्तव अपेक्षांचा लहान मोठा भार आपल्या मनावर थोड्या अधिक प्रमाणात तरी असतोच.
तो आपण आपल्या परीने पूर्ण तोलण्याचा आणि पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.व्यक्तीव्यक्ती नुसार.....
-------------------------------

ट्रेनचा प्रवास...

रोजच सुरू होतो एक प्रवास नव्याने
धावपळ, गर्दी, कलकलाट
आणि त्यात अडकलेले उदास चेहरे.
माना खाली घातलेले ,
काही आपल्याच धुंदीत असलेले…
एखादा चेहरा पटकन हसतो ,
एवढ्या उदास चेहरात तो एकटाच खुलून दिसतो.
मधेच कुठेतरी जांभया देणारा कोणी ,
आळस झटकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत.
काहीची चालू असते निरस बडबड ,
कोणताही निष्कर्ष न निघणारी अगदी वायफळ.
कुठेतरी एखादा पुस्तकाच्या नशेत ,
काही चेहरे जागा शोधण्याच्या दिशेत.
कुठेतरी शब्दांचे होते युद्ध ,
मिळवलेली जागा टिकवण्यासाठी.
कधी कधी नाही
रोजच सुरू असतो हा प्रवास नव्याने…
-------------------------------

स्वप्नातला सुंदर दिवस...

तारीख आणि वार आठवत नाही  परंतु तो दिवस येणार हे निछ्चित !
त्या दिवसाच्या संध्याकाळी खरंच खूप बरे वाटत होतं,
सारी नाती... सार्ऱ्यांचे प्रेम अचानक सारे खरे वाटत होतं,
आजवर केलेले सारे वाद व्यर्थ केलेला मुर्खपणा वाटत होतं,
आजवर जपलेली सारी तत्वं अचानक अर्थशून्य वाटत होती,
न सांगताच सांऱ्यां अपेक्षांना पूर्णत्व आलेलं होतं,
कुणी न सावरता ही सारं दु:ख हलकं झालेलं होतं,
आयुष्यातला या एकाच दिवसानं बरचं काही दिलं होतं,
सगळे शातं होते पण.........
विशेष म्हणजे नेहमी विचारमग्न असणारा मी देखील हालचाल न करता निरागस, अचल, निर्विचार, डोळे मिटून एका जागेवर पडून होतो...
अगदी निर्विकार !
-------------------------------

स्वप्न....जगण्याची प्रेरणा !

कधीकधी स्वप्नात रमून राहतो मी... स्वप्नातच मी काय काय होत असतो...
स्वप्नातच कुठ कुठ जात असतो...स्वप्नांना बंधनं नसतात...ती मुक्त असतात...
स्वप्नांच्या आकाशात गरुड भरारी घेऊन मुक्त विहार करत बसतो मी...स्वप्न पाहणं कधी बंद करत नाही मी...
पण जगण्याला मर्यादा आहेत...काळाच्या मर्यादेत मिळालेलं मर्यादित आयुष्य आणि स्वप्नं मात्र अमर्याद...
economics मध्ये जशी limited resources आणि unlimited wants ची सांगड घालावी लागते तशीच सांगड जगण्यातही घालावी लागते.
तरीही स्वप्नं पहायची बंद करत नाही मी...एकमेकला जोडून येणारी अनंत स्वप्न....
कधीही सुरु होते हि स्वप्नांची साखळी अभिक्रिया..एखादं गाणं ऐकतानाही...
आनेवाला पल जानेवाला है ऐकताना....
"इक बार वक़्त से लम्हा गिरा कही,
वहा दास्तां हुई लम्हा कही नही"
खासकरुन या ओळी ऐकताना.....
“हो सके तो इसमे ज़िन्दगी बिता दो,
पल जो ये जानेवाला है”
अस म्हणत मी प्रत्येक क्षण भरभरून जगण्याचं स्वप्न पाहू लागतो..उद्याची पर्वा न करता आणि कालचा विचार न करता जगण्याचं स्वप्न...
ते गाणं संपेपर्यंत आणि आणि त्या गाण्याच्या  मुड मध्ये मी असेपर्यंत तरी मी स्वप्नांमध्ये तसा जगत असतो...
अखंड वाळवंटात फिरून मृगजळापाशी येऊन थांबलेल्या,
अतृप्त प्रवाशासारखा आणि एखाद्या अधाशासारखा घटघट पिऊन घेतो आयुष्याच्या पेल्यात मिळालेलं...
मर्यादित जगणं अमर्याद स्वप्नांत !
-------------------------------

आज असही करून पहा...

एकदा चेंज म्हणूनच असेही कधी करुन पहा.
रोजच्यापेक्षा वेगळे एक जीवन कधी जगून पहा.
स्वत:च्या काळजीत तर नेहमीच असता..
आज एखाद्याची काळजी करून पहा.
स्वत:च्या भावनेला कुरवाळने रोजचे...
आज एखाद्याच्या मनातलं जाणून पहा.
स्वत:च्या मर्जीने नेहमीच वागता...
आज एखाद्याची मर्जीही राखून पहा.
स्वत:च्या अपेक्षांचे ओझे लादलेत सगळ्यांवर...
आज एखाद्याची अपेक्षा पूर्ण करून पहा.
भांडत वाद घातलात तत्वासाठी स्वत:च्या...
आज एखाद्याच्या तत्वाचाही मान ठेऊन पहा.
-------------------------------

तळ मनाचं...

उन्हाच्या झळीने काटोकाठ भरलेलं तळ देखील हळुवार कोरडं होतं जातं रे ...
आपल्या मनात तळ साचून असलेल्या अपेक्षांचं देखील असंच काहीस आहे.
दुर्लक्षितपणाची , दाहक झळ त्या तळ्यापर्यंत सातत्याने पोहचत राहिली कि त्याचं हि बाष्पीभवन होतं .
आणि साचलेल्या अपेक्षांचं तळ हळूच निकामी होतं जातं .
त्या तळ्याशी मग संवेदना उरत नाही. उरतो तो केवळ कोरडेपण.... अतृप्ततेचा... अपूर्णतेचा....
संयम सोडायचा नाही आपुलकीचा पाऊस पडला की मनाच तळं पुन्हा काठोकाठ भरतं !
-------------------------------

मन अस्वस्थ असताना !

एकाकी अस शांत राहून ...
सारी मनाची कवाडं बंद करून ...
सगळेच प्रश्न काही सुटत नाहीत ,
उलट बऱ्यांचदा त्यातलं ते अंतर वाढत जाऊन,
असलेल्या त्या प्रश्नांचाच गुंता अधिकाधिक वाढत जातो.
अन त्या गुंत्यात आपण अधिकाधिक ओढले जातो.
म्हणूनच....
वेळीच विचार करा ,अंतर वाढवू देऊ नका ,असलेला गुंता सोडवा.
मन आपोआपच शांत होईल !
-------------------------------

नाते...

नाते या शब्दाचा खरा अर्थ 'व्यवहार' हाच असावा. नात्यांमध्ये ओलावा, आपलेपणा, जिव्हाळा क्वचितच आणि अपवादात्मक दिसून येतो.
अनंत काळापासून नाते हे व्यवहारावरच अवलंबून आहे. त्यामुळेच नाती जेव्हा बदलतात, तेव्हा आपण म्हणतो, माणूस बदलला. ते खरं नव्हे...
माणूस तोच असतो, त्याच्याशी केला जाणारा, त्याच्याकडून अपेक्षित असणारा व्यवहार फिसकटतो, तेव्हा आपण म्हणतो, तो आता बदलला.
मग हे नाते आप्तेष्टांशी असो, मैत्रीचे असो, वा प्रत्यक्ष जन्मदात्यांशी…
आई-वडील मुलगा किंवा मुलगी झाल्याबरोबरच आपले निकष लावण्यास सुरूवात करतात. जर मुलगा झाला, तर उतारवयातला आधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मुलगी झाल्यावर तिच्याकडे परक्याचं धन म्हणून पाहिलं जात.
मुलगा शिकता-शिकता कमवता झाला, आर्थिक मदत करू लागला, तर मुलाने नाव काढले, असे त्याचे कौतुक होते.
मुलगी शिकली तर आपल्या पायांवर उभी राहिली तरी तीचं कौतुक क्वचितच होत.महत्वाचं म्हणजे लग्नानंतरही ती आईवडीलांची काळजी करतेच.
मात्र, तरीही जन्मापासूनच मुलांवर वशांचा दिवा हा ‘टॅग’ लागतो. ( हा दिवा वाती शिवाय पेटत नाही हे सत्य नजरअंदाज केल जातं ) त्याच्या वाट्याला कौतुक येत.
कालांतराने जो अगदी आई-वडिलांच्या आज्ञेत असतो, तो लग्नानंतर आपल्या पत्नीचा आज्ञाधारक होतो किंवा आईवडीलांना दूर करतानाही दिसून येतो.
मग रक्ताचं नाते शाश्वत असं कोणतं ?

मनोगत...

माणूस आयुष्यभर जीवनाचा.....

माणसाला आयुष्यभर आपल्याला काय मिळवायचं आहे याचा निवाडा करता येत नाही.त्याला सैरभैर धावताना दिशांचं भान नसतं नि जेव्हा धावणं संपवून भिंतीला लावलेल्या शिडीवर चढून भिंतीपलीकडे नजर टाकतो तेव्हा त्याला कळून चुकते कि आपण चुकीच्या भिंतीला शिडी लावली...तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो...आयुष्यभर त्याला व्यक्तिमत्व नि चारित्र्य यातील फरक कळून येत नाही...व्यक्तिमत्व म्हणजे आपणाकडे कुणीना कुणी बघत असताना आपण जे असतो व आपण जे करतो...नि चारित्र्य म्हणजे आपणाकडे कुणीही बघत नसताना आपण जे असतो व आपण जे करतो...माणसाला जीवनात कृतार्थ (...यशस्वी नव्हे...) होण्यासाठी स्वत:च्या आतल्या आवाजाशी हितगुज करून कुठल्या तरी शिखराचा रस्ता पक्का करायला हवा...त्यावरील वाटचाल आत्मज्ञान...बुद्धिमत्ता ...खडतर परिश्रम...नि दृष्टीकोन या शिदोरीच्या बळावर पार करावयाची असते..तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तुमची अर्धी लढाई सुरु होण्यापूर्वीच जिंकत असतो...तुमचा स्वत:च्या जगण्यावर ..बोलण्यावर...चालण्यावर असलेला " विश्वास नि श्रद्धा "! परीक्षेच्या घडीला किंवा अडचणीत असताना या दोन्हीला तडा न जावू देणारा तुमचा स्वभाव...समोर येणाऱ्या सगळ्या अडचणींना समर्थपणे तोंड देणारा असेल.
---------------------------------

शक्ती.....
प्रत्यक्षात शक्ती ही प्रगल्भ संकल्पना आहे. शक्ती ही स्वतःला आणि इतरांना सांभाळण्यासाठी आहे, ध्येयाचे रक्षण करण्यासाठी आहे.
चंदनाच्या वृक्षाला सर्प विळखा घालून बसतो व तोडावयास येणार्‍यावर फुत्कार करतो. त्याप्रमाणे आपली जी ध्येये- त्या ध्येयांभोवती आपली शक्तिसर्पिणी वेढे घालून जागरूक अशी राहिली पाहिजे.
शक्तीचा उपयोग शक्तीला लगाम घालून करावयाचा असतो. शक्तीबरोबर आपण वाहून जावयाचे नाही. अग्नीने लोखंड लाल होते, परंतु लोण्याप्रमाणे लगेच वितळून जात नाही. आपण भावनावश होऊन शक्तीबरोबर वितळून जाता कामा नये. हुशार सारथ्याने काबूत ठेवलेल्या घोड्याप्रमाणे आपली शक्ती असली पाहिजे. घोड्याला लगाम घालता येतो, म्हणून घोड्याची किंमत आहे. संयम हेच खरे सामर्थ्य. सामर्थ्याला ताब्यात ठेवण्यातच खरे बळ आहे; ज्याच्याकडे धैर्य नाही, ज्याच्याजवळ शौर्य नाही, त्याला कोणी मान देत नाही; त्याप्रमाणेच संयमहीन माणसाच्या शक्तीलाही कोणी मान देत नाही. ज्याच्या कृत्यांवर विचाराचा ताबा नाही, ज्याची कृत्ये विकाराच्या ताब्यात गेलेली असतात, अशाला मान मिळत नाही.

परंतु सामर्थ्य असेल तर संयम. आधी बळ मिळवा व मग ते बळ संयमित करा. शक्तीची उपासना करा, परंतु ती शक्ती शिवाच्या आज्ञेत राहणारी हवी. शक्तियुक्त शिव व शिवयुक्त शक्ती हे ध्यानात असावे. जेथे संयमशील शक्ती आहे, तेथे मंगल असा शिव नांदणारच. मला वाटते माणसाचे पहिले कर्तव्य शक्तिशाली होणे हे आहे. आपण केवळ जवळ असल्यानेच आपल्यानां सुरक्षितता वाटेल, आपण केवळ जवळ आहोत एवढ्यानेच आपल्यांच्या वाटेस कोणी जाणार नाही- असे बलशाली व प्रभावशाली आपले जीवन झाले पाहिजे. आपला असा दरारा सर्वत्र बसला पाहिजे. असे जीवन ज्याला साधले, असे जीवन ज्याला मिळाले, तोच खरा जगला. त्याने मनुष्यजन्मात येऊन पुष्कळच मिळविले असे म्हणता येईल.
---------------------------------

जाणीव..... स्वतःची.
आपण स्वतः व भोवतालची  परिस्थिती यांतील संबंध जाणण्याची क्षमता, स्वतःचा दृष्टिकोन विचार तसेच आपण स्वतः इतरांपासून वेगळे अस्तित्त्वात आहोत असे जाणण्याची क्षमता म्हणजे जाणीव.
जाणीव... उपकारांची 
यशाबरोबर येणारा अहंकार व्यक्तीच्या अध:पतनाला कारणीभूत ठरतो. उपकारकर्त्याची जाणीव मनामध्ये सातत्याने असेल, तर ‘हे माझे एकट्याचे नाही’ हा भाव जागृत राहून माणूस अधिक नम्र होतो.
चांगल्या कामाकरिता अनेकांचा सहभाग आवश्यक असतो याचे भान ठेवावे आणि जेथे अनेकांचा सहभाग तेथेच चांगले काम सहज घडून येते.
आपल्या हातून किती चांगली कामे झाली आणि किती विध्वंसक कामे झाली, याचा कधीतरी ताळेबंद मांडून पाहा, म्हणजे आपण कोठे आहोत आणि आपल्याला काय करायचे, याची दिशा निश्चिती होईल. आपल्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अनेक जण उपकार करीत असतात. काही उपकार लक्षात राहतात, तर काही लक्षात ठेवावे लागतात.
आपल्या सुखासाठी आणि आपल्यातील गुणांसाठी आपण अनेकांचे उपकार स्वीकारत असतो. अनेकजण कळत - नकळत आपल्यासाठी बरंच काही त्याग करत असतात. आपण किमान सुखाच्या उपकाराची तरी जाणीव ठेवावी.
---------------------------------

स्वः आणि स्वभाव......
माणसाचा स्वभाव चंचल आहे.त्याला त्याच्याजवळ नसणाऱ्या गोष्टींचं अप्रूप असतं.कधी एकदा तिला मिळवितो असं त्याला झालेले असते.त्या गोष्टींच्या चिंतनात नि तिच्या प्राप्तीच्या स्वप्नात किती तरी राती त्यानं स्वत:ची झोप उडवून घेतलेली असते.पण एकदाका ती मिळाली कि त्याची  हळू हळू त्या गोष्टीसोबतची जवळीक ..तिच्यातलं गुंतणं पातळ होत जातं...पुन्हा त्याला नव्या गोष्टींचा ध्यास लागतो...म्हणून तर घरात जेवताना घरगुती जेवणाला हॉटेलची चव नाही म्हणून तो नाक मुरडतो...नि बाहेर जेवायला गेल्यावर घरगुती चांगलं जेवण कुठं मिळते याची चौकशी करतो... अशी माणसाची अगम्य स्वभाव शैली असते...एखादी व्यक्ती आपण तीला कितीही ओळखत असलो तरी कुठल्या क्षणी आपण त्याच्याबाबतच्या अनुमानाला फसू याचा नेम नसतो...त्याही पुढे , एखाद्या  व्यक्तीबद्दल कशाला ?  आपल्या स्वत:बद्दल आपण तरी खात्रीने काही ठाम भूमिका घेऊ याची हमी देऊ शकतो काय ? लक्षात ठेवा खेळात आणि जीवनात सगळेच पत्ते काही आपल्या मनासारखे सगळ्याच डावात हाती येत नाहीत..पण आलेले  पत्ते स्वीकारून योग्यवेळी नेमके पत्ते खेळून काही हरणारे डावसुद्धा जिंकता येतात...नि खरी कसोटी अश्या डावातच लागते...केवळ तुमच्या चेहरा वाचून तुमच्यापेक्षा चांगले पत्ते असणारा खेळाडू सुद्धा त्याचा होणारा डाव तुमच्या नावे करून जातो..डाव जिंकताना कधीही कुणाला फसवायचे नाही. फक्त डाव मांडताना आपल्या पुढचे मागचे किंवा बाजूचे सवंगडी आपल्यावर लोभ करणारे असावेत एवढीच काळजी घ्यायची.
---------------------------------

ज्यांच्या आठवणीनंही मन जात मोहरून, दिसला नाहीत तुम्ही तर डोळे जातात बावरून.
जाईल जेव्हा तोल माझा तेव्हा घ्यावं जरा सावरून, जाण्याआधी नक्कीच जाईन सारा पसारा आवरून.
माझ्या नसण्याची नसावी तुमच्या मनात उणीव, शेवटच्या श्वासापर्यत ठेवेन आणल्या नात्याची जाणीव.
---------------------------------

आपल्या जीवनात पदोपदी असे प्रसंग येत असतात की, ज्या वेळेस अमूक प्रकारचे वर्तन आपण करावयास पाहिजे असते.
पुष्कळ लोक आपणाजवळ चांगले वागतात; त्यांचे व आपले संबंध सलोख्याचे असतात, याचे कारण हे की, त्या लोकांना पूर्णपणे जाणीव असते की,
जर का आपण नीट वागलो नाही, समजुतीने घेतले नाही, जर का आपण योग्य मर्यादेचे अतिक्रमण करून अरेरावी करू,
तर मग कठीण प्रसंग येऊ शकतो. तर मग काही विस्कटेल. नाते तूटेल याची त्यांना भीती असते व म्हणून ते जपून गुण्यागोविंदाने आणि संयमाने वागतात. यातच जाणीव जन्म घेऊन वाढत असते.
-------------------------

पाखरांच्या पंखात बळ आलं की ती भरारी मारतात आणि सगळं विसरून सोडून भरकटत जातात.
कदाचित निसर्गाचा मोह त्यानां आवरता येत नाही. अन् पाखरंचं ती....आता माणसांंची पाखरं होऊ लागलेत.
-------------------------

नातं जपण्यासाठी कोणालाही मुद्दाम टाळण्याऐवजी स्पष्टपणे संवाद महत्वाचा असतो.
नाहीतर नाते तर तुटतेच राहीलेल्या व्यवहारी संबंधामध्ये देखील अविश्वास राहतो.
आपण एखाद्यच्या आयुष्यात काही क्षण आणि समाधान देऊन त्या व्यक्तीचं आयुष्य वाढवत नाही तर असलेल आयुष्य फुलवतो.
जर फुलवता येत नसेल तर ते विस्कटू नका.
-------------------------

आता सारं सावरण्याची वेळ झाली आहे. बरीच पडझड झाली आहे , आवरण्याची वेळ झाली आहे.
अपेक्षांच्या चिखलात माखलेल्या मनाला स्वच्छ करून आत्मविश्वासाचे चिलखत घालण्याची वेळ झाली आहे.
क्षणभंगुर नात्यांच्या मोहात न अडकता...जे खोटी स्वप्न न दाखवता प्रत्यक्ष सोबत आहेत त्यानां घेऊन नाहीतर एकटेपणाला सोबत करत प्रवास सुरू करण्याची वेळ झालेली आहे.
थोडा वेळ लागले पण सुरवात करण्याची वेळ झालेली आहे.

मनोगत...

गुपित सुप्त भावनाचं....

प्रेम...स्वतःच अस्तित्व विसरून ,फक्त तिचा विचार करणे ,आणि स्वतःला विसरून फक्त तिचं होऊन जाणं.
कधी तीनं विचारलं असतं ना कि तुला माझी किती आठवण येते का ? तर मी सांगितलं असतं तीला नजरेत नजर भरून...

मनात तू ध्यानात तू
नकळत पडणाऱ्या स्वप्नात तू
ध्यास तू विश्वास तू
आनंदी मनाचा निःश्वास तू …

पानात तू फुलात तू
पहिल्या पावसाचा सुवास तू
रागात तू प्रेमात तू
नुकत्याच फुललेल्या कळीत तू …

गाण्यात तू पाण्यात तू
आठवणींच्या गोड गोड शहाळ्यात तू
दिवस तू राञही तू
चमकणाऱ्या हजारो चांदण्यात तू …

इकडे तू तिकडे तू
दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तू
श्वासात तू आवाजात तू
भिरभिरत्या नजरेच्या शोधात तू …

वाऱ्यात तू झऱ्यात तू
बागेतल्या सुंदर पाखरात तू
माझ्यात तू माझी तू
सगळीकडे फक्त तूच तू …
-------------------------------

मनातल्या मनात  आज वाटले...

मनातल्या मनात काही तरी लिहावं वाटले,
मनातल्या मनात काही तरी बोलावं वाटले …!
काही भाव नेणीवेतले पेरावे शब्दातून,
थोडे वाहणाऱ्या या मुक्त आसवातून,
सारे मन रिते रिते करावे वाटले ….!
सरलेले हरवलेले आठवातील क्षण,
उरलेले कल्पनेतले रेखाटलेले मन,
सारे सारे ओळी ओळीतून गुंफावे वाटले …!
दोन तुमचे..दोन माझे रंगलेले काही डाव,
कधी असे कधी तसे बसलेले काही घाव,
सारेच्या सरे भाव, ठाव आता सांगावे वाटले ..!
जीवनाचे गीत गाताना विरलेले काही ताल - सूर,
कंठात अडकलेले फसलेले काही स्वर,
सारे टाहो मुक्तपणे आता फोडावे असे वाटले ..!
थोडं गुदगुदतय, थोडं खद्खदतय,
थोडं दाटतय, आठवणींचे आभाळ भरून येतंय,
सारे सोडून तोल, कोसळावे असे वाटले ..!
कुठे वीज, कुठे झीज, कुठे ओलावा मायेचा,
कुठे हार, कुठे जीत, कुठे गंध  हा जाणीवेचा,
सारे काही मनोगतातून आज सांगावे वाटले…!
हसा कुणी रुसा कुणी, कुणी वेडा खूळा म्हणा,
लढा कुणी मारा कुणी, कुणी भागा कुणी गुणा,
सारे सारे हिशोब इथेच, मांडावे वाटले …!
मनातल्या मनात खूप खूप दडलंय,
वेदनेचे पाणी अधिक अधिक काढलंय,
सारे काही आज उपसून टाकावेसे वाटले…!
सारं काही शब्दात शांत आज करावे वाटले,
मनातल्या मनात काही तरी बोलावे वाटले,
मनातल्या मनात काही तरी लिहावे वाटले…!!
-------------------------------

सांत्वन...

पानगळीत जेव्हा पानं झडू लागतात,
सांगतात तेव्हा ती फांद्यांना!

आम्ही तर आमचा मोसम जगून जातोय.
तुम्ही काळजी घ्या....
तुम्हाला तर कित्येक मोसम मुलाबाळांचा सांभाळ करून
त्यांना निरोप द्यावा लागणार आहे.

जेव्हा फांदीची वेळ आली होती तोडलं जाण्याची तेव्हा ती झाडाला म्हणाली.. स्वत:च म्हणाली-
‘माझंही आयुष्य तुला मिळो..
तुलाऽ वाढत जायचंय, उंचच उंच व्हायचंय.
माझ्या जागी येईल दुसरी, मला आठवणीत ठेवूस माझ्या जाण्यावर दुःख करत बसू नको.

मुळांना खोलवर खोदून खोदून जमिनीपासून उखडून झाडाला वेगळं करताना......
झाड तरी जमिनीला काय म्हणणार!

उलट जमिनीलाच म्हणावं लागलं....
जे शाश्वत आहे ते कधीच नष्ट होत नाही, तूला असंच नेहमी या माणसानं लुटलेलं,
पण आठवतंय, जेव्हा तुला पहिलं पान फुटलेलं ,
एका छोटय़ाशा बीजातून तू डोकावून पाहिलं होतंस ,
पुन्हा येशील, माझ्याच पोटी जन्म घेशील !
---------------------------------

आयुष्य.....

चांगले वाईट प्रसंग आणि
कडू गोड आठवण...
आयुष्य म्हणजे अनुभवांची
एक मोठी अनमोल साठवण..

"माझे आयुष्य कष्टाचे"..
असे प्रत्तेकालाच वाटे..
दिसत नाहीत जेव्हा..
दुसऱ्याला बोचलेले काटे...

आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर,
असते काही नवे...
गरज पूर्ण झाली तरी..
सांऱ्यांना अधिकच हवे...

आयुष्यावर प्रेम करणे...
हेच महत्वाचे तत्व,
कारण, मृत्यू अटळ आहे ,
म्हणूनच जन्माला आहे महत्व.

आयुष्य राहिले तर .. पैसा मिळवण्याची
देऊ शकाल हमी...
पण पैशामागे धावून धावून..
नका करू आयुष्य कमी..

आयुष्यात कधीही कायम नसते,
सुख-दुःखाची वेळ..
संकटांना भिवून .. संपवू नका,
आपल्याच आयुष्याचा खेळ..

कठीण आहे सांभाळणे,
प्रत्येक माणसाचे मन...
म्हणूनच...आयुष्यात जोडलेली  माणसं..
हेच खरे धन..

जीवनावर चिंतन करायला....
माणसाला आज वेळच नाही..
म्हणूनच आज वाटलं..
"आयुष्यावर बोलावं काही...
---------------------------------

'मी' च  'तुम्ही' होणं....
कधीच अपेक्षा नव्हती मला तुमच्या शाब्दीक स्तुतीची,
अगदी पहिल्या भेटीपासून ते आजपर्यंत,
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे,
तुमच्या बंदिस्त मनापर्यंत !
अर्थात तुमच्याजवळ काय आहे याला कधीच महत्त्व दिले नाही,
अरुप ते रूप कोणत्याही गोष्टीला,
पण तुमच्या वागण्यानं तूम्ही पोहचलात रोमरोमापर्यंत !
या 'स्वप्नवेड्याला' भुलवणंही काही सोप्पं नव्हतं,
अनेक सुंदर मनाच्या चेहऱ्यांनी संभाळलेलं मला,
पण तुमच्या निर्मळ मायेने मला गुंतवलेल तुमचा होईपर्यंत !
तुमचं  निरागस हसणं, तुमचं निरागस असणं,
हळूहळू मला जिंकंत गेलं,
अन तुझ्या मनाचा भावगंध पसरत गेला,माझ्या मनाच्या अंतरंगापर्यंत !
माझं "मी" पण हरवून बसेनअसं कधीच नव्हतं वाटलं,
माझ्या मनासकट तूम्ही मला पूर्ण  वेढून घेतलं,
आता तुमचं आस्तित्व घेऊन जगतोय मी ...
तुमचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत !
---------------------------------

*प्रगल्भता म्हणजे काय ?*

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारण्याची प्रवृत्ती जोपासता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेणं ( स्वार्थ  ) सोडून देणं ( परमार्थ ) महत्वाचं हे समजू लागता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यानां जपण्याचा प्रयत्न करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.  
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमच्यात जाणीव निर्माण होते.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं कोणाला तरी आदर्श मानता आणि त्या आदर्शा प्रमाणेच आपले विचार आणि आचरण करता.

मनोगत...

लोक म्हणतात, "आयुष्य छोटं आहे".

लोक म्हणतात, "आयुष्य छोटं आहे".
पण असं बिलकुल नाही....
खरं तर आपण जगायला उशीरा सुरुवात करतो.क्षणा क्षणाला जोडत आयुष्य पुढे सरकत असते.
कधी तरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो....जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो.
फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. ज्याने तो क्षण ओळखून पाऊल उचलले आणि जाणीवेने चालत राहीला त्या माणसाकडे यश चालून येतं.
-------------------------

पुसून टाकावे सगळे रंग देखाव्याचे, मुखवटे पांघरलेल्या चेहऱ्यावरचे.
मोकळ करावं सर्व भावनांना, अडकल्या आहेत ज्या सांभाळात त्या मुखवट्यानां.
नसावा असा एकही चेहरा फसवणारा, मुखवटा पांघरूण हसणारा आणि हसवणारा.
-------------------------

एखाद्या माणसावर आंधळं प्रेम करणं हा त्या व्यक्तीवर केलेला विश्वास असतो.....
पण त्या व्यक्तीला ते प्रेम न सांभाळता येण हा त्या व्यक्तीमधील जाणीवेचा अभाव असतो.
-------------------------

विधात्याची भेट घेणं शक्य असतं तर माझ्या विधिलिखिताची प्रत मिळवली असती तर थोडेफार फेरबदल करायला सांगितले असते.
पण ते शक्य नाही म्हणूनच स्वः लिखित नवी प्रत तयार करायला घेतली जीला एकच अध्याय आहे " अस्तित्व मार्ग ".
-------------------------

तुमच्यामध्ये निर्बंध बांधल जाणं जर जाणीवपूर्वक नसतं तर तुमच्या बरोबर नातं जुळूनचं आल नसतं.
तुमच्या निस्वार्थ प्रेमाची जाणीव नसती तर आजपर्यंत तुमच्यासोबत राहिलो नसतो.
-------------------------

आपण सगळं बदलण्याचा हट्ट किंवा प्रयत्न करू नये.....कारण बदल घडून येण्यासाठी मन जूळुन यावी लागतात.
खरतरं.... मनं जुळली तर काही बदलण्याची गरज पडत नाही.
-------------------------

नेहमी हसत रहाण्याचा मुख्य फायदा म्हणजे " इतरांना तुमचे दुःख समजत नाही आणि ते तुमच्यावर दया दाखवू शकत नाहीत.
कोणाच्याही दयेवर केवळ आत्मसन्मान नसलेले जगतात.
पण...आत्मसन्मान मिळवण्यासाठी कर्तव्य आणि कर्तुत्व सिद्ध करावं लागतं.
-------------------------

जीवनातील सर्वात मोठं दुःख म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर निस्वार्थ नातं ठेऊनही ते स्वार्थ ठेऊनच वागतात.
पण या दुःखाने विस्कटून न जाता आपली मनात भावना कायम ठेऊन जगण्यातच खरा अर्थ असतो. स्वार्थ बदलतो अर्थ शाश्वत असतो.
-------------------------

तुमच्या असण्याने कुणाला फरक पडत नसेल तर नसण्याने पडणारच नाही. खरंतर....तुम्ही नसल्यावर फरक नाही पडला तर हरकत नाही
पण तुम्ही असताना तुमच्या असण्याची दखल घेतली जाईल अशा स्वभावात जगा.
-------------------------

काही लबाड लांडग्याच्या स्वभावाचे चोरून जातात ,
काही धुर्त कोल्ह्याच्या स्वभावाचे फसवून जातात,
काही चोर मांजरांच्या स्वभावाचे चोरून जातात,
माणसाच्या जन्मी येऊन प्राण्यांच्या स्वाभावात न जगता काही माणसं इमानाने जगून जातात.
-------------------------

सगळीच जोडलेली नाती निरपेक्ष आणि निस्वार्थ असतात असं ही नाही. त्यामुळे त्यानां गालबोट लागतं.
अर्थात... मनाची नाती ही रक्ताच्या आणि जोडलेल्या नात्यांपेक्षा निर्मळ असतात. कारण त्यात इतरांबद्दल तिरस्कार नसतो आणि मन जुळतं त्याच्याबद्दल अविश्वास नसतो.
-------------------------

एकदा पाण्याने भरलेले डोळे आणि भारावलेले शब्द आवरत ती मला सांगत होती.
जर जगातल्या सांऱ्यां पुरूषांना एका रांगेत उभं केल तरी मी माझं नातं तुमच्याशी आहे हे अभिमानाने सांगेन आणि तुझा हात पकडेन.
मी ही भावनांना आवरत तीला म्हटलं मी तुला दुसऱ्या कोणाला निवडायला संधीच देणार नाही.
-------------------------

आता नव्या प्रवासाची सुरूवात करण्याची वेळ झाली आहे.
पुन्हा स्वतःबरोबर नातं जोडून अपेक्षा आणि भावनिकतेला सोडून जाणीवांचे धागे जोडत नवा प्रवास सुरू करण्याची वेळ झालीआहे.
-------------------------

पाखरांच्या पंखात बळ आलं की ती भरारी मारतात आणि सगळं विसरून सोडून भरकटत जातात.
कदाचित निसर्गाचा मोह त्यानां आवरता येत नाही. अन् पाखरंचं ती....आता माणसांंची पाखरं होऊ लागलेत
-------------------------

नातं जपण्यासाठी कोणालाही मुद्दाम टाळण्याऐवजी स्पष्टपणे संवाद महत्वाचा असतो.
नाहीतर नाते तर तुटतेच राहीलेल्या व्यवहारी संबंधामध्ये देखील अविश्वास राहतो.
आपण एखाद्यच्या आयुष्यात काही क्षण आणि समाधान देऊन त्या व्यक्तीचं आयुष्य वाढवत नाही तर असलेल आयुष्य फुलवतो. ...जर फुलवता येत नसेल तर ते विस्कटू नका.
-------------------------

आता सारं सावरण्याची वेळ झाली आहे. बरीच पडझड झाली आहे , आवरण्याची वेळ झाली आहे.
अपेक्षांच्या चिखलात माखलेल्या मनाला स्वच्छ करून आत्मविश्वासाचे चिलखत घालण्याची वेळ झाली आहे.
क्षणभंगुर नात्यांच्या मोहात न अडकता...जे खोटी स्वप्न न दाखवता प्रत्यक्ष सोबत आहेत त्यानां घेऊन नाहीतर एकटेपणाला सोबत करत प्रवास सुरू करण्याची वेळ झालेली आहे.
थोडा वेळ लागले पण सुरवात करण्याची वेळ झालेली आहे.
-------------------------

कोण कुठं असतं हे फक्त वेळेला माहित असतं आणि ज्याचं त्याला माहीत असतं. अनेकदा जवळ वाटणारे लांब असतात. लांब असलेल्याचा जवळ असण्याचा संबंधच येत नाही. कोणी कुठेही असलं तरी मी माझ्यासोबत असणं जरूरीचे आहे हे कळलंय म्हणूनच कोण कुठं आहे हे न शोधता स्वतःला हरवून न देण्याचं ठरवलं आहे. आता कळतयं ञासात राहणं हे भासात राहाण्यापेक्षा कधीही योग्य असतं. म्हणूनच भासातून बाहेर येऊन जाणीवेच्या व्यासात असलेल्यांनां मनाच्या केंद्राच्या गुरूत्वकर्षणात कायम जोडलेल ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या गुरूत्वकर्षनाच्या बाहेर गेलेल्या कोणालाही परत आणता येणार नाही. आता हे पाहायाचं आहे कोण या व्यासात आणि गुरूत्वकर्षणात आपली जागा कायम टिकवून ठेवणार आहे. म्हणूनच म्हटलं.... कोण कुठं असणार हे वेळेलाच माहित असतं.

मनोगत.....

कुणीच कुणाच्या जवळ नाही...

कुणीच कुणाच्या जवळ नाही...
हीच खरी समस्या आहे
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी
आणि आमावस्या जास्त आहे

हल्ली माणसं पहिल्या सारखं...
दुःख कुणाला सांगत नाहीत
मनाचा कोंडमारा होतोय
म्हणून आनंदी दिसत नाहीत

एवढंच काय...
एका छता खाली राहणारी तरी
माणसं जवळ राहिलीत का?
हसत खेळत गप्पा मारणारी
कुटुंब तुम्ही पाहिलीत का?

अपवाद म्हणून असतील काही...
पण प्रमाण खूप कमी झालंय
पैश्याच्या मागे धावता धावता
दुःख खूप वाट्याला आलंय

नातेवाईक, शेजारी, कुटुंबातले...
फक्त एकमेकाला बघतात
एखाद दुसरा शब्द  बोलतात
पण काळजातलं दुःख दाबतात

जाणे येणे न ठेवणे, न भेटणे, न बोलणे...
या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका
गाठी उकलायचा प्रयत्न करा
जास्त गच्च होऊ देऊ नका

धावपळ करून काय मिळवतो...
याचा जरा विचार करा
बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा
आपल्या माणसांची मनं भरा

एकमेका जवळ बसावं बोलावं...
आणि नेहमी नेहमी
तिरपं चालण्याच्या ऐवजी
थोडं सरळ रेषेत चालावं

समुद्री चोहीकडे पाणी...
आणि पिण्याला थेंबही नाही.
अशी अवस्था झालीय माणसाची
यातून लवकर बाहेर पडा

माणसं अन माणुसकी नसलेली घरे...
अन देव नसलेले देव्हारे
कितीही पॉश असले
तरी त्याचा काही  उपयोग नाही.
----------------------------

कधी असही जगावं लागतं ,खोट्या हास्याच्या पडद्याआड खरे दु:ख लपवाव लागतं,
कर्तव्याच्या नावाखाली स्व:ताला राबवाव लागतं,
इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातल पाणी लपवाव लागतं,
मनात एखादी तिव्र इच्छा असून देखील नाही म्हणाव लागत ,
इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागत कधी असही जगाव लागते.
----------------------------

खुप खुप ताकद लागते आलेलं अपयश पचवायला,
डोळयात आलेलं पाणी पुसून ओठावर हसू खेळवायला,
काहितरी ध्येय लागतं आपल्याला आयुष्यात जगायला
शेवटी अपयशाचीच गरज असते मन खंबीर बनवायला.
----------------------------

सारं काही नव्यानं रचून पहायाचं. पण असं मला खचून नाही जायाचं.
ऐकून होतो माणसं देखील रंग बदलतात, पण अनुभवलं कि वेळ आल्यावर अंग ही बदलतात.म्हणूनच...
सारं काही नव्यानं रचून पहायाचं. पण असं मला खचून नाही जायाचं.
नेहमीच भावनांना सांभाळलं, मनाशी जुळलेल्यानां उराशी कवटाळले.
पण कळलं नाही सारे कसे कुठे वळले अन् कोण कुठं खेळलं. म्हणूनच...
सारं काही नव्यानं रचून पहायाचं. पण असं मला खचून नाही जायाचं.
-------------------------

किती सहज फरक पडतो माणसात !
डोळ्यात स्वप्न नसतात तेव्हा आपल्यात असतात तेच अचानक आपल्याला सोडून आपल्यांमध्ये अचूक बसतात....
किती सहज फरक पडतो माणसात !
निरागस चेहऱ्यावर ज्यांच्या आपण हसू खेळवतो तेच अचानक आपल्यावरच सहज हसू लागतात...  
-------------------------

कधीतरी मनासारखं जगून पहा !
काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न तर आपण सारेच करतोय....पण....
स्वतःची गरज आहे ते मिळवण्यासाठी नाही तर जे इतरांकडे आहे आणि माझ्याकडे नाही म्हणून इतरांसारखं होण्यासाठी.
म्हणूनच या तुलनेतून बाहेर येऊन पहा.
कधीतरी मनासारखं जगून पहा.
-------------------------

आज एक आठवण आठवली....
बऱ्याच वर्षापूर्वीची... मी १७ वर्षाचा होतो. जेव्हा मला ज्यांच्या बरोबर लहानाचा मोठा झालो त्यांच गटानं  " वाळीत " टाकलं होतं. कारण एवढचं की मी माझ्या मनासारखं वागायचो आणि स्पष्ट-निडर बोलतो. मी समजवण्याचा प्रयत्न केला एक संधी मागितली पण... त्या गटातल्या कार्यकर्त्यांना माझ्या मनापेक्षा त्यांचा अहंकार प्रिय होता. भरलेल्या डोळ्यांनी तेथून निघोला पण अश्रू गळू दिले नाहीत.
त्याच अश्रूनां आवरत बंड पुकारलं त्या गटाविरूद्ध. अथक सूडाचं बंड माझ्या मनाला मारणाऱ्या विरूद्ध.......
कोणतंही खोटं न करता माझ्या छोट्या विचारांनी त्या अहंकारी गटाच्या सांऱ्यां वाटा फार चौकस बुद्धीने अडविल्या.
जेव्हा कळलं माझ्या बाजूने उभ्या असलेल्या शक्तीपुढे गट गर्भगळीत झालायं आणि नतमस्तक होऊन दुसरी कडे जातोय... म्हणून त्यानां मुद्दाम भेटायला गेलो.
तेव्हा ही डोळ्यांत बंड सुरू झाले तसेच अश्रू होते. पण तरीसुद्धा मनासारखंच बोललो...
"तुम्ही तर माघार घेताय ? तुम्ही ठसलं पाहिजे मला !
त्यातला मिस्कील हसला एक त्वेषाने उत्तरला...
"हमारी बिल्ली हमीसे म्याव ?" गपचूप जा , नाहीतर थोबाड फोडेन.
मी ही हसत म्हटले.. ते तर नेहमीच फोडलतं. म्हटलं.....
"आज ऐ बिल्ली थोडी नाराज है क्योंकी शेर घुटने टेकते देख उसे बूरा लग रहा है !"
एवढचं बोलून तेथून निघालो.
तेव्हा ठरवलं कोणाचाही सूड घ्यावा लागेलं एवढा कोणालाही स्वतःचा अपमान करू द्यायचा नाही. कारण या सुडाच्या बंडात एक गोष्ट शिकलो आणि समोरच्यांनां शिकवली......
"स्वतःचा अंहकार जपणं सोपं असतं, अवघड असतं एखाद्याचा स्वाभिमान ( मन ) जपणं."

मनोगत.....

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे !


ज्याला आपल्या मनातले सर्व
काही सांगून टाकावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सरतानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण
थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे..
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे..
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे,
जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे..
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
ज्याच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे..
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
सूर त्याचेआणि शब्द माझे असावे......
----------------------------------

प्रेम कर मित्रा..
कोणावर ही कर...पण प्रेम कर...
बाजूच्या बाकावरल्या तीच्यावर कर...
नाहीतर ...समोर जी शिकवतेय तिच्यावर कर...
पडद्यावरल्या हिरोईनवर कर...
नाहीतर तिच्या ड्रेसच्या डिजाइनवर कर...
कारण…
प्रेमात पडण्याची आणि पाडण्याची ताकत सर्वांत असते.
प्रेम ही स्वत:पलीकडे पहाण्याची सुरुवात असते.

पण प्रेम कर मित्रा..
प्रेम आईवर कर...ताई वर कर...
अंगणातल्या जाई वर कर...
हंबरणार्या गाईवर कर...
जगातल्या कोणत्याही बाईवर कर
कारण..
लक्षात ठेव … प्रेम आहे ...तिथे आदर आहे
अंग झाकणारी ...मायेची चादर आहे…

प्रेम कर मित्रा...
प्रेम मित्रांवर कर ...घरच्यांवर कर...
खालच्यांवर करशील तितकच वरच्यावर कर...
आणि हो ...विसरू नकोस ...स्वत:वर कर...
स्वत:इतकाच … दुसर्यांच्या मतावर कर...

कारण …
प्रत्येक जण स्वत:च्या कहाणी चा नायक असतो,
आणि कोणाच्या तरी कहाणीचा सहाय्यक असतो,
तेव्हा प्रेम कर मित्रा प्रेम कर...

मनगटावरल्या राखीवर कर...
ह्र्दयातल्या सखीवर कर...
हरवलेल्या नात्यांवर कर...
जे जे आठवेल त्यां त्यां वर कर...
पहिल्यांदाच झालेल्या हशावर कर...
आणि सरतेशेवटी मिळालेल्या यशावर कर....
जगण्यावर करतोस तितकच मरणावर कर...
कृष्णावर करतोस तितकच कर्णावर कर....
फक्त एक लक्षात ठेव मित्रा…
प्रेमाचा आजार पांघरु नकोस...
प्रेमाचा बाजार माजवू नकोस.
----------------------------------

काय करावं ह्या मनाचं काही कळत नाहीं.
वया सोबतं रहायला याला जमतंच नाही.

चाळीशी पर्यंत कसं सोबत असायचं...
आता मात्र सोबत यायला कुरकुर करतं.

शरीर वाढत्या वयाला  साथ द्यायला  लागतं.
मन मात्र मोठं व्हायला कायम नाराज असतं.

प्रौढत्वाच्या खुणा येऊन अंगभर  विसावतात.
मन मात्र डोळ्यातून मिश्कील हसतं असतं.

शरीराचं आणि मनाचं नातं  कधीतरी तुटतं.
शरीर भविष्याकडे....मन भूतकाळाकडे धावतं.

बुध्दीच मग कित्येकदा मनाला खेचून आणतें.
मन देखील सोबत असल्याचे मस्त नाटक करतें.

खोडकर मुलासारखे.....मन गुपचुप  बसून राहते.
आणि .....वयाचा डोळा चुकवून, परत निसटून जातें !
----------------------------------

तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ?
मी क्षणात उत्तरलो...
मनात जपायला चाफा आवडेल
आणि ओंजळीत धरायला मोगरा...

वहीत ठेवायला बकुळ आवडेल
आणि धुंद व्हायला केवडा...

बोलायला अबोली आवडेल
आणि फुलायला सदाफुली...

पण, प्राजक्त मात्र आवडेल तो,
देवाच्या पायाशी ठेवायला..आशीर्वादासाठी...

यावर ती थोडीशी नाराज झाली,
कारण तिचं नाव रातराणी होतं...

ती नाराज झाली मी ओळखलं... पुढे झालो आणि हलकेच हसत म्हणालो,
हे सगळं नंतर आवडेल.. रातराणी खिडकीशी दरवळल्यानंतर...!!

तेव्हापासून ती अखंड दरवळते आहे..
माझ्या मनात... अंगणात...!

मनोगत.....

गुंता आणि गुंफण !!!

गुंता आणि गुंफण !
यात फरक एवढाच की....गुंता संशयाने होतो, गुंफण संयमाने केली जाते.
गुंता सोडवताना तुटलं जातं, गुंफण सहज आणि हलकीच सोडवता ही येते.
गुंत्यात विश्वासाचा अभाव असतो, गुंफणीत विश्वासू स्वभाव असतो.
-------------------------

मी आणि आम्ही !
आपल्या प्रत्येकाच्या आतील "मी" जेव्हा एखाद्या बरोबर जुळतो तेव्हा "आम्ही" चा जन्म होतो.
या "आम्ही" ला "आम्ही" ठेवायचं की "तुम्ही" करायचे हे प्रत्येकातील "मी" वर अवलंबून असते.
-------------------------

कधीकधी वाटतं....
आयुष्यात सारेच सुखाची इच्छा आणि स्वप्नं ठेवत असतील. तर सुखाला ओळखणं कठीण होईल...
कारण आयुष्याची दुसरी बाजू म्हणजे दुःख नसल्यास जगण्यातली उत्सुकता लोप पावेल.
-------------------------

कधीतरी एकदा स्वतःजवळ राहून बघा....
स्वतःच्या श्वासाने होणारी आपल्या शरीराची हालचाल पहा.
शांतपणे आपल्या ह्दयाच्या ठोक्यानां अनुभवा.
आपल्या पायांना प्रेमाने गोंजारून पहा जे अथक झिजतात तुमच्यासाठी.
शांतपणा द्या आपल्या हातांनां जे त्यानां न आवडणाऱ्या अनेक गोष्टी करत असतात तुमच्यासाठी इच्छा नसताना.
डोळ्यांतील निरागसतेला मनापासून नाजूकपणे स्पर्श करून पहा ज्यांना तुम्ही प्रत्यक्ष कधीच पाहीलेल नाही आणि पाहू शकणार नाही आहात.
आपल्या शरीरातील रक्ताचं नसांमधून वाहणाऱ्या प्रवाहास अनूभवा.
कधीतरी एकदा स्वतःजवळ राहून बघा.
-------------------------

एखाद्याच आपल्यामध्ये असणं आपल्याला खूप काही देऊन जातं.
त्याच्या असण्यानं मन नेहमी स्थिर राहत, तो नसेल तेव्हा सगळंच चूकत जातं.
त्याचचं राज्य असावं आपल्यावर असं वाटत कारण तो असल्यावर आपल्याला कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची हींम्मत येते.
कसलाही अहंम नाही त्याच्यात आणि स्वार्थाचा तर लवलेशही नाही.
म्हणूनच असा मिञ तुमच्या जवळ असण्यावर माझी हरकत नाही.
मी नसलो तरी असा मिञ तुमच्यातील प्रत्येकाच्या जीवन प्रवासात असावा.
हा मिञ लाभणे म्हणजे भाग्यच.
"संयम" हाच सर्वश्रेष्ठ मिञ आहे.
-------------------------

पाणी जसे चढावर वाहत नाही बांध घातला म्हणून कायमचे अडवून ठेवता येत नाही......
मनाचे ही तसेच असते ते रागाने जिंकून घेता येत नाही आणि बंधने घालून बांधून ठेवता येत नाही.  
अडवून ठेवलेल पाणी आठुन, मुरून, किंवा बाष्प होऊन जातं. तसचं मन ही भावनाशून्य होऊन जातं किवां ज्याचं असतं त्याच्यामध्ये मूरून जातं.
-------------------------

एकाने विचारलं - सर्वात महाग "जागा" कोणती ?
मी म्हणालो जी आपण दुसर्याच्या ?"मनात" निर्माण करतो ती महाग जागा !
तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर ग? गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं.
-------------------------

आपल्याला विचार करता येऊ लागतो तेव्हा अविचारी वागणं गौण असतं.
नेहमीच आपण दिसतं आणि भासतं तसं सारंं काही नसतं.
म्हणूनच आपल्या इंद्रियांना योग्य वळण लावण्यास विचारांचा जन्म झाला आहे.
-------------------------

गंगा नदी म्हणजे शाश्वत पवित्र उत्पती आहे असं नाही.....
अन् गटारांचा जन्म निसर्गतः झालेला नाही.
गंगेला पवित्रतेची उपमा देऊन अशुद्ध करणारा आणि स्वतःच्या सांडपाण्यातून गटारांची निर्मिती करून त्यास अपविञतेचा ठसा मारणारे आपलेच वंशज आहेत.
-------------------------

आपण कुणाचे आहोत ? 
या प्रश्नांचे उत्तर तेव्हाच मिळते जेव्हा आपण अस्वस्थ असतो आणि ती अस्वस्थता समजून आपल्याला हलकेच आणि सहज स्वस्थ करेल अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि विचार मनात येतो.
त्यानंतर आपण खरोखरच त्या व्यक्तीचे आहोत का हे कळतं. त्यानं दिलेल्या प्रतिक्रियेतून....कारण सत्य कृतीत आल्यावर ते शाश्वत होतं.
-------------------------

ज्यामध्ये ...
सगळंच सांगणे जरूरीचे नसते...सगळंच मागणे जरूरीचे नसते.
स्पर्शाला जिथे जाण असते...खांद्यावर टेकलेली निरागस मान असते.
सहवासात ज्याच्या असणे म्हणजे शान असते...हीच मनाच्या प्रेमाची पहचान असते.
-------------------------

बोलला नाहीत तुम्ही तरी जी ऐकते सर्व काही.
दाखवल नाहीत तुम्ही तरी जीला सहज दिसत सर्व काही.
देवाला बाजूला सारून जी फक्क तुम्हाला डोळे भरून पाही.
दुःख / वेदना तुमच्या पण जीव जीचा वरखाली सतत होई.
असे एकमाञ व्यक्तीमत्व म्हणजे " आई ".
-------------------------

माणसांची सवय असते स्वतःच्या कडू , वाईट आणि चुकीच्या विचारांनी माझ्यावर चिकलफेक करण्याची.
पण मला त्याचे वाईट नाही वाटत, अश्या अशुद्ध विचारांनी माझे चरीञ नाही बाटत.
म्हणूनच मला....समुद्रासारखं जगायला आवडतं. सारं काही स्वीकारायचं आणि योग्य ते ठेऊन नको असलेल कीनाऱ्यावर आणून टाकायचं.

मनोगत.....

काल पडलेलं स्वप्न....

ज्यामध्ये..मी लहान होतो कदाचित ८-९ वर्षाचा. कुठल्यातरी जत्रेत बाबांबरोबर फिरत होतो ( बाबांचा चेहरा दिसत नव्हता ).
जत्रेतली पाळणे , खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करत होतो.
बाबांकडे मी बॅट मागितली, बाबांनी ती घेतली आणि पिशवीत टाकली. पण मी हट्ट केला "बाबा.. माझ्याकले द्या".बाबांनी दिली.
पुन्हा पुढं गेल्यावर मला खेळण्यातली ढोलकी दिसली. ती ही बाबांनी घेतली आणि माझ्या पिशवीत टाकली.
जरा पुढे गेल्यावर मी खायला मागितलं. बाबांनी एक खाऊच पॅकेट घेऊन दिलं. एव्हाना माझे दोन्ही हात भरले होते. बाबांनी माझ्याकडे असलेली खेळणी पिशवीत ठेवायला मागितली पण मी नाही दिली.
पुढे आणखी फिरल्यावर मला आईस्क्रीम दिसलं. हट्ट करून मी ते सुद्धा घेतलं. पण हातातल्या इतर गोष्टी मला सोडवत नव्हत्या. दोन्ही हात भरल्यावर मात्र बाबांचा हात सोडून मी चालू लागलो. एका हाताने खेळणी सांभाळत आणि दुसऱ्या हातात असलेलं आईस्क्रीम खाता खाता मी बाबांपासून कधी दूर जात हरवलो ते मलाही नाही कळलं आणि बाबांनाही.
त्या गर्दीत बाबा कुठे दिसत नाहीत, म्हणून मी हिरमुसला झालो आणि जोरजोरात रडू लागलो. हातातली खेळणी आणि खाऊ फेकून जमिनीवर आडवा होऊन मोठ्याने रडू लागलो. इतर लोक मला शांत करण्यासाठी खेळणी देत होते, पण मी ती फेकून देत होतो. आणि "बाबा... बाबा..." करत फक्त रडत राहिलो. आता मला फक्त माझे बाबा हवे होते पण ते दिसत नव्हते.तेवढ्यात दचकून जागा झालो. आता बसून स्वप्न आठवलं आणि मनात विचार आला. आपलं सुद्धा असंच होतं. स्वार्थ साधण्यात किंवा पैसा, नाव आणि प्रसिद्धी कमवायच्या नादात आपल्या माणसांचा हात कधी सुटून जातो, ते आपल्याला सुद्धा नाही कळत.
वेळेवर भान आलं तर ठीक, नाहीतर हीच माणसं इतकी दूर गेलेली असतात, कि उरल्या आयुष्यात त्यांच्या केवळ आठवणीच आपल्याकडे उरतात. लक्षात ठेवा... "जपलं ते आपलं"*
-------------------------

जिवंत राहण्यासाठी जेवढी *अन्न* आणि *पाण्याची* गरज असते. तेवढीच जीवन जगताना *स्पर्धक* आणि *विरोधक* यांची गरज आहे.
*स्पर्धक* आपल्याला सतत गतीशील आणि क्रियाशील बनवितात.
*विरोधक* कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात.
आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम *पोषक वातावरण* तयार करतात ..
या दोघांना निर्माण करायला आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत.
हे समाजात आपल्या आजूबाजूला जागोजाग असतात.
त्यांच्यावर चीडू नका त्यांचे कायम स्वागत करा कारण त्यांच्या शिवाय जगण्यात मजा नाही.
-------------------------

जाणीव.....
खिडकीपाशी निर्विकार उभं राहून दिवसाचे आणि निसर्गाचे बदलते चिञ पाहताना जाणीव होते......
हातून काहीतरी निसटून चालल्याची.
माझ्या हक्काच्या आणि वाट्याला आलेल्या माणसांच्या सौम्य सुखदायी आठवणी आठवताना जाणीव होते...
ती माणसंच माझ्यापासून दूर होत चालल्याची.
रक्ताची नाती नसताना जे बंध घट्ट होते आता जाणीव होते.... ते बंधच सैल पडत चालल्याची.
मनाच्या बंद कप्प्यात साठवून ठेवलेले क्षण , एकांतात हळूवारपणे कवटाळताना जाणीव होते.... ते क्षणच पूसट होत चालल्याची.
मनात ओढ असेल तर भेट ही घडतेच. पण आता जाणीव होते प्रत्येक भेटीतली ओढ कमी होत चालल्याची.
मनावर झालेल्या खोल जखमांची खपली काढताच त्या भळाभळा वाहू लागतात. आणि मग जाणीव होते... त्या जखमा कधी भरल्याच नव्हत्या.
उद्याचा दिवस कधी उजाडेल या प्रतिक्षेत , आजचा दिवस कधी मावळतो हे ही कळत नाही आणि मग जाणीव होते.... हे दिवसही हातून सुटत चालल्याची.
ज्या आधाराची मला जीवनाच्या वाटेवर गरज होती , आता जाणीव होते.... तो आधारच खूप दूर गेल्याची.
कधी कधी आयुष्य माणसाला कसं एकट पाडते , याची प्रचिती येत असतानाच जाणीव होते.... मी ही एकाकी पडल्याची.
-------------------------

क्षण असे...... क्षण तसे..... !
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे..!
एकदाच बंद करावा श्वास, नि संपवून टाकावेत सारे संशयाचे वारे..
दूर लोटावा अविश्वासाचा चंद्र आणि फुंकून द्यावेत मुखवट्यातले तारे..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे..!
कित्येक क्षण असे येतात, की अनोळखी वाटतात सगळेच चेहरे..
सांगावे आपले गाऱ्हाणे कोणाला, जेव्हा आपलेच होतात बर्फ, बधीर, बहीरे..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे..!
कित्येक क्षण असे येतात, की समजत नाही काय वाईट, काय बरे..
निराशेचे कल्लोळ मनात, आटून जातात इच्छेचे झरे..
कशासाठी जगाचे? इथे कोणाचेच काही नाही खरे..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे..!
पण......
एखादा क्षण असाही येतो, की उठून ताठ उभे राहतात ढासळणारे..
पारंबीचे दोरही जिद्दीने सावरतात, कधीकधी वटवृक्ष कोसळणारे..
असा एखादा क्षणीक स्पर्श, शातं करतो मन तळमळणारे..
असा एखादा क्षणीक शब्द, तोलून धरतो अवघे आयुष्य डळमळणारे..
अशाच एखाद्या क्षणावरच जगतात माणसं, असे कित्येक क्षण मरणारे !
-------------------------

आठवण....
काही आठवणी विसरता येत नाहीत,
काही नाती तोडता येत नाहीत,
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत,
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत,
वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत,पावल अडखलली तरी चालण नाही थांबत,
अंतर वाढल म्हणून प्रेम कमी होत नाही ,
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत.
-------------------------

जन्माची सूरवात आपल्या इच्छेनुसार नव्हती आणि शेवट ही नसेल.
आपल्या इच्छेनुसार फक्त या दोघांनाही सामावून घेणारे आपले कर्म असते.
कितीही प्रयत्न केला तरी लहानपणीचा गोंडस चेहरा आणि तारुण्यातील काया कायम ठेवता येत नाही.
कायम ठेवता येतात लहानपणापासून तारूण्यापर्यत मनात निर्माण होणाऱ्या भावभावना , त्याच आपल्यातलं माणूस जगासमोर आणत असतात.
तारूण्यापासून म्हातारपणापर्यत केलेली कमाई देखील आजन्म कायम राहत नाही.
आजन्म कायम राहतात या प्रवासात जोडलेली बीनरक्ताची नाती.
ती माञ जाणीवेनेचं टिकतात.
-------------------------

माझं मन मी दिलं म्हणजेच माझं सर्वस्व दिलं. ज्याला कळलं त्यांनी संभाळलं आहे.
"मन" फक्त माझ्या मालकीचं..."शरीर" सक्रीय आकारात आलं तेव्हा आईनं संभाळलं , निष्क्रिय होईल तेव्हा चार दुसरेच खांदे संभाळणार आहेत.
जन्माला आलो तेव्हा कोणी पहिलं हातात घेतलं हे शरीराला माहीत नव्हतं आणि जाईल तेव्हा कोण घेईल हे ही माहीत नाही.
"मन" मी कोणाला दिलयं आणि कुणाकडे ते हट्ट करुन गेलयं हे खाञीनं माहित आहे मला.
कोण जपतयं आणि कोण त्याच्याशी खेळतयं हे वेळ दाखवतेय आता मला.
-------------------------

जेव्हा कधी मी तीच्या सोबत काही वेळ असतो, ती माझ्या डोळ्यांत अश्रुच आणते...कधी गोड आनंदाचे तर कधी असह्य विरहाचे.
ती कशीही असली तरी मला सुखावत असते, कारण ती कशीही असली तरी फक्त माझीच असते...मला मनाचा राजा आहेस तु हेच सांगत असते.
तिचं माझ्या सोबत आणि माझं तिच्यासोबत असणं फार जरुरीचं आहे... हा जन्म पूर्ण करण्यासाठी.
ती फक्त माझीचं आहे हे कोणाला सांगण्याची मला गरज वाटत नाही, वेळ आलीच तर सांगायला ही कोणाला घाबरणार नाही.
ती माझ्याबरोबर आहे म्हणूनच मी आज आहे. ज्या वेळेस ती माझी नसेल तेव्हा मी तीचा नसेन आणि तुमचा ही नसेन.... अशी गोड आहे माझी " आठवण ".*

यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?

आपल म्हणणं सगळ्यांना पटलं पाहिजे, आपल्या मर्जी नूसार आपलं माणूस नटलं पाहिजे.
आपलीच जागा असावी पहिली त्याच्या ध्यानी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
आपण जेवढा जीव लावला आहे त्याच्यावर, त्याची जाणीव असावी त्याच्या मनी.
प्रेमानं हलकच जवळ घ्याव त्यानं आपल्या दुःखाच्या क्षणी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
कठीण परिस्थितीचं उन्हात नकळत त्याची सावली आपल्यावर पडावी.
डोळ्यांतील अश्रू ओघळण्याआधी टीपावं त्यानी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
एकांतात असताना आपण सुखावून जाव्यात फक्त त्याच्या गोड आठवणी.
दूर असतानाही चिञ आपले सहज यावे त्याच्या नयनी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
---------------------------

सगळं काही गुपीत आहे...जणू अत्तर मनाच्या कुपीत आहे.
चेहरा कितीही तेजस्वी असला तरी...मेंदू संशयाच्या अंधाराने शापीत आहे.
सगळं काही गुपीत आहे...जणू अत्तर मनाच्या कुपीत आहे.
शरीरं म्हणजे मृगजळ फसवं...भावनांच रूप डोळ्यांतील आसवं.
सगळं काही गुपीत आहे...जणू अत्तर मनाच्या कुपीत आहे.
---------------------------

आपले " प्रेम " ज्याच्यावर आहे हे त्या व्यक्तीला माहीत असणे जरूरीचे असते... पण त्यासाठी त्याचं प्रदर्शन जरूरीचे नसते.
जसं जगण्यासाठी लागणाऱ्या श्वासाचं आणि शरीरातील रक्ताचं महत्व असतं तसचं निखळ " प्रेम " ही असावं.
प्रत्यक्षात प्रेम ही शाश्वत आणि शुद्ध भावना आहे परंतू  जेव्हा लाज, ईर्शा, अहंकार, अविश्वास, संशय, स्वार्थ, अपेक्षा या विषाणुजन्य दुर्गुणांची बाधा होते तेव्हा प्रेम अशुद्ध होते.
---------------------------

माणसं नेहमी फक्त स्वतःच्या सोयीने अर्थ शोधत असतात.
साजस चेहऱ्याने मनात धूर्त काव्याने स्वार्थ शोधत असतात.
मी असं नाही म्हटलं की.... माणसानं स्वतःच भलं साधू नये.
फक्त स्वार्थ साधताना होऊ नये की, आपल्या आजूबाजूला कोणी उरू नये.
---------------------------

व्यक्त आणि अव्यक्त दोन्हीही भावना योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.                                                                   अपेक्षित आणि अनपेक्षित दोन्हीही  घटना योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.
समर्थ आणि असमर्थ दोन्हीही स्वभाव योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.
मान आणि अपमान दोन्हीही आदर योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.
---------------------------

कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.......अन्
खोटे मुखवटे पांघरूण आजूबाजूला वावरणाऱ्या सांऱ्यांना एका क्षणात मनाच्या हद्दपार करावसं वाटतं....
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.......अन्
भावनांशी खेळ करून नात्यांवर डाव मांडणाऱ्या सांऱ्यांना एका क्षणात चित्त करावसं वाटतं.....
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.......अन्
जाणीवेची लक्तरे अविश्वासाच्या वेशीवर टांगणाऱ्या सांऱ्यांना नामशेष करावसं वाटतं..
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.......अन्
स्वतःला सगळ्यातून वेगळ करून एकांतात अलिप्त रहावसं वाटतं.
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.
---------------------------

हळूहळू वय निघून जातं...जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते...कधी कुणाची आठवण मनाला सुखावते.
आठवणींच्या आधारावर जीवन वेल बहरत जाते...वेलीला कधी फांद्या येत नाहीत..
सागराचा खजाना किनाऱ्यावर नाही येत...तोडलेली नाती जीवनात पुन्हा जुळून  येत नाहीत.
---------------------------

कधीतरी सावर मना, स्वतःला आवर मना.....
कणखर आहेस तरी असा का बरं असा अधीर होतोस ?
सर्व काही नीट ठरवलंं आहेस तरी छोटया अपेक्षांत बधीर होतोस.
कधीतरी सावर मना, स्वतःला आवर मना.....
तटस्थ  आहेस तरी का बरं असा भावनांनी भारावून जातोस ?
म्हणतोस मी राजा आहे  तरी अचानक का बरं गुलाम होतोस.
कधीतरी सावर मना, स्वतःला आवर मना....
---------------------------

मनातील भावना...

* सगळं ठरवता येत प्रत्येकाला जेव्हा स्वतःशिवाय बाकी सर्व शून्य असतं. पण अशीही वेळ येते जेव्हा शून्य महत्वाचे असतात.
कारण शून्याने संख्येचा पट वाढतो आणि माणसातील शून्याने गट वाढतो.
* राज्य तर मी ही करतो....माझ्यावर प्रेम करणाऱ्याच्या " मनावर " आणि तिरस्कार करणाऱ्याच्या " मेंदूवर "
* आयुष्यात काही कोणाला देता आलं नाही तरी "विश्वास" नक्कीच देता येतो...कारण तो जपणं आणि तोडणं हे फक्त आपल्यावर अवलंबून असतं.
* अविश्वासाच्या भोवऱ्यात" आणि "संशयांच्या वलयात" नाती विस्कटू देऊ नका. अर्थहीन क्षणभंगुर सुखानं भारावून जाऊ नका.
शब्दांत वचन देणं सर्वांनाच येतं, दिलेला शब्द पाळणं काहींनाच येतं.
* शब्द निर्जिव असूनही सजीव माणसानां शिकवतात... पण माणसं एवढी धूर्त असतात की शब्दांशी ही खेळतात.
आपण पुढं चालतो ठेऊन आंधळा विश्वास अन् ती माञ सोयीस्कर स्वार्थाच्या वळणावर वळतात.
* "नातं" हा शब्द जुळणं जेवढं सोप आहे, ते जपणं ही कठीण असतं. "नातं" हा शब्द बोलणं जेवढा सोपं आहे, ते समजणं ही कठीण आहे.
"नातं" या शब्दाची उणीव भासेल, जेव्हा तुम्हाला त्याची जाणीव नसेल.
* निस्वार्थ बुद्धीने आणि निर्मळ नजरेनं पाहिलं तर सारं "मस्त" असतं. फक्त आपल्या मनासारखं नसलं की "अस्वस्थ" भासतं.
* जन्म हा जगण्यासाठीच होतो, फक्त जगताना जाणीव असणं जरूरीचं असतं कारण जगणं जाणीवेने पूर्णत्वास जातं.
* नक्की काय मिळवतात माणसं ? जीवापाड जपणाऱ्या एखाद्याला सहज फसवून नक्की काय मिळवतात माणसं....
आंधळा विश्वास ठेऊन सर्वस्व देणाऱ्या एखाद्याला सहज फसवूण नक्की काय मिळवतात माणसं.
* वस्तू कालबाह्य असतात हे ऐकले होते, पण विश्वास देखील कालबाह्य असू शकतो या अनुभवाने मनाला दुःख झाले.

मनोगत...