"मन - मिञ"

जेव्हा आपल्याबरोबर कोणीही नसतं तेव्हा फक्त मन असतं. माणसं झोपेत अचानक बडबडतात, हसतात किंवा दचकून जागी होतात तेव्हा त्यांच्या मनात काहीतरी घडत असतं.
त्यावेळेस मेंदू झोपलेला असतो. शरीराचं अस्तित्व असे पर्यंत मन (आत्मा) आपल्या सोबत असतो ते मृत्यूनंतर नष्ट केल्यावर निघून जातो.
जन्म होण्याआधी ते मृत्यूनंतर आपण जसे आहोत तसे आपल्याला स्विकारणारा आपला एकमेव मिञ "मन".
---------------------------------

एकटेपण
माणसाला एकटेपण आजूबाजूला कोणी नसेल तेव्हा येत नाही, तर..जेव्हा तो मनानं एकटा होतो तेव्हा येतं.
माणसाला इतर कोणतीही शक्ती तेव्हाच हरवू शकते जेव्हा त्याला मनाचं एकटेपण येत. म्हणूनच मनाची माणसं जोडून मन सांभाळावं. मनाच महत्त्व साऱ्यांना कळावं म्हणूनच ...
---------------------------------

जो तुमच्या आनंदासाठी हारतो त्याच्या बरोबर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. ज्याला तुमचे महत्त्व माहीत आहे त्याला तुम्ही कधीच समजू शकत नाही.
हे जग अजब आणि अनोळखी स्वभावाच्या माणसांनी भरलेलं आहे. इथं "गरज" हीच ओळख आहे , ती पूर्ण झाली की पुन्हा सगळं जसं आहे तसं.
---------------------------------

माझ्या सहवासात न राहणाऱ्या  बहुतेकांना असे वाटते की माझ्यात भरपूर चूकीच्या सवयी आहेत....अगदी बरोबर आहे.
पण माझ्यामधील एवढ्या साऱ्या चुका शोधणे ही किती मोठी चुकीची एकच सवय त्याच्यांत असते याचा विचार करूनच मला त्यांची कीव येते.
---------------------------------

जनांसाठी जगण्यापेक्षा माणसांनं मनासाठी जगावं" हेच माझ्या जगण्याचं तत्त्व आहे. जेव्हा माझ्या चेहऱ्यावर माणसं मला ओळखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला ओळखणं अवघड असतं...
कारण माझं मन कधीतरीच माझ्या डोळ्यातून वाहतं बाकी माझ्या चेहऱ्यावर माझ्या मेंदूचं राज्य असतं.
---------------------------------

माणसं जेव्हा जाणीवपूर्वक खेळतात, तेव्हा त्याचे खरे अंतरंग कळतात. तशी सगळ्यांची मन कुठं एकमेकांशी जुळतात,
म्हणूनच भावनांना न समजून घेता ती भोळी बनून छळतात. सगळ्यांनाच आधाराचे हात थोडी न मिळतात, आपआपलं वळण आलं की सहज हात सोडून वळतात.
---------------------------------

कोणालाही माहीत नाही आपण कोणासाठी कधीपर्यत असणार , तरी माणसं नाती जोडतात.
पण आपण जो पर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या माणसांसाठी असणार,अशाप्रकारे जगण्यात कमी पडतात.
जेव्हा मनातले भाव चेहऱ्यावर येऊनही आपल्या एखाद्या माणसाला दिसत नसतील आणि शब्दांत मांडूनही ते त्याला कळत नसतील....
तर ते माणूस आपलं नसतं , कारण त्याला आपलं मन कळत नसतं.
---------------------------------

फक्त सुरूवात पुरेशी नसते , सुरूवात केलेली कृती शाश्वत ठेवणं आणि निरंतर ठेवणं जरुरीचं असतं.
नाहीतर जन्म तर अनेकांना मिळतो तो सार्थकी लावणं आणि आदर्श करून जगणं जरुरीचं असतं.
---------------------------------

यशस्वी आणि समाधानी माणसाची माणसांची जीवन सूत्र - निस्वार्थ प्रेम आणि अतूट विश्वास.
वाचायला सोपी असली तरी कृतीत वापरण्यास फार कठीण असतात. कारण यासाठी संयम असावा लागतो.
---------------------------------

फार कमी माणसं समोरच्या माणसावर पूर्ण विश्वास ठेवून नातं जोडतात. त्यानां समोरच्या व्यक्तीबद्दल अविश्वास नसतो असं नसतं...
त्यानां समोरच्या माणसाचं महत्त्व कळत नसतं. खरं तर प्रश्न समोरच्या व्यक्तीच्या महत्वाचा नसतो, तर  स्वतःच्या स्वार्थाचा असतो.
म्हणूनच मन असेल निस्वार्थ, तरचं नात्याला आणि जीवनाला अर्थ.
---------------------------------

कोणाच्याही निस्वार्थ कर्तुत्वावर चिकलफेक करणारे आणि निरर्थक आरोप करणारी माणसं कितीही महान असली तरी त्यांच्या आधीन जाऊन नतमस्तक होणं मला कधीच जमलं नाही.
बेभरवसा माणसांच्या गोळक्यात रहाण्यापेक्षा मला एकटेपण जास्त आवडते.
---------------------------------

आपण खूप काही मिळवू शकतो पण ते मिळवण्यापेक्षा त्यातून आपल्याला समाधान किती मिळाले हे महत्वाचे असते.
कारण आपण बऱ्याच वेळा जे मिळवतो त्याचा आनंद न घेता अधिक मिळवण्यासाठी धावत असतो. जर आनदं घेता येत नसेल तर समाधान कसे मिळेल.
अर्थातच... समाधान हे आनंदात लपलेल सत्व आहे.
---------------------------------

कसली तयारी करत असतं माझं मन? आणि सर्व शारीरिक बळ एकञ येत कशासाठी? का हा येणारा दिवस माझ्यात आतूरता निर्माण करत असतो?
कारण माझ्या सर्वस्वाच्या मानाचा दिवस असतो हा ! माझ्या दुसऱ्या जन्माचा असतो हा!  माझ्या अस्तित्वाच्या मार्गातील सन्मानाचा दिवस असतो हा!
---------------------------------

आयुष्यात कधीतरी....
पटत नसला तुम्हाला माझा स्वभाव आज जरी , अशी वेळ येईलच आठवण येईल तुम्हांला माझी.....
आज आहे अंगात दमक आणि रगांत चमक , खंत नाही तुमच्या मनी माझ्या नसण्याची जरी, असा क्षण येईलच जेव्हा आठवण येईल तुम्हाला माझी....
अविश्वास आणि गैरसमज वाढवतात नात्यातली दरी , तरी गोष्ट एक सांगतो खरी , असं वळण येईलच जिथं आठवण येईल तुम्हांला माझी.....

मनोगत...

आवड ही असावी लागते...

आवड ही असावी लागते. आपण ती कोणा मध्ये निर्माण करु शकत नाही. कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या आवडीने आणि सवडीने समोरच्याशी वागत असतो.
मला भावनांचा बाजार माःडता आला असता तर मला ही तसं वागता आलं असतं. बर मला भावनांना फसवता येत नाही. तस असतं तर आज मला हे लिहता आलः नसत.
-------------------------------------

आनंद आणि दुःख या माणसाच्या जीवनात घडणाऱ्या घटना आहेत. बघा ना ! आज पर्यंत अनेक आनंद  आणि दुःख देणाऱ्या घटना घडून गेल्या आहेत.
आपण त्या त्या वेळेस फारच भारावून गेले असाल... एकतर दुःखाने किंवा आनंदाने. पण त्यात तुम्हाला कायम राहता आलेले नाही. कारण घटना ही वेळेचा एक छोटासा भाग आहे.
आता मी म्हटले म्हणून कदाचित तुम्ही काही तरी आठवत असाल आनंदाचे किंवा दुःखाचे पण आता ते तुमच्या बरोबर नाही. आहेत फक्त आठवणी.
आठवण हे एकच असं औषध आहे जे पुन्हा त्या घटना आपल्या आयुष्यात आणू शकते. पाळलेल्या प्राण्यांना देखील आठवण ( ओळख ) असते. मग माणसात ती का बरं लोप पावत जात आहे?
-------------------------------------

कोणत्याही विशेष गोष्टीत एकमाञता शोधणे फार सोपे असते. परंतू एखाद्या सामान्य गोष्टीत विशेषता शोधणे फार कठीण असते.
मला सामान्यात विशेषता शोधणे जास्त आवडते.
-------------------------------------

कधीकधी खुप वेळ लागतो काही सत्य गोष्टी स्वीकारायला. मला आज स्वीकारावे लागले की, प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची वेळे कोणाला द्यायचे हे ठरवलेले असते.
जर तो वेळ तुमच्याकडे पाहिजे तेव्हा आला नाही तर ती वेळ  आणि व्यक्ती तुमच्यासाठी नाही. कारण तेव्हा ती व्यक्ती त्याच्या स्वतःच्या आवडीच्या आणि सवडीच्या जगात असते.
-------------------------------------

कधीकधी मला वाटायचं "मी एकटाच" माझं कोणंच नाही. पण काही घटनांनी मला दाखवून दिलं...
एखाद्याची बरीच माणसं  असूनही तो व्यक्ती एकटाच असतो. ती वेळ असते जेव्हा माणूस एका जागेवर पडून निष्क्रिय असतो.
-------------------------------------

माणसाच्या निर्मिती पासून त्याची माती होईपर्यत एकच गोष्ट त्याच्या सोबत असते......
"वेळ". त्यामुळे आपल्या वेळेला म्हणजेच आयुष्यातील प्रत्येक क्षणाला ज्यानं कोणी सजवले असेल त्याला विसरू नका.
-------------------------------------

मी मस्त दिसतो...मी मस्त लिहतो...मी मस्त नाचतो...मी मस्त हसतो...मी मस्त विचार करतो असं मला कोणी म्हटलंच नाही.
का कळतं नाही...कदाचित् मला विचार करता येत नाही. पण कृती करता येते.
-------------------------------------

नेहमीच वाटते मला... माझे विचार "मस्त" नसले तरी हरकत नाही, पण ते "स्वस्त" कधीच नसावेत.
जशी माझ्यात "लाज" नसेल तर हरकत नाही, पण चूकुनही "माज" नसावा.
-------------------------------------

एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणं कीती छान असतं....
कारण राग-रुसवा , गैरसमज , अविश्वास , दुःख अशा अनेक भाजकांनी भागले तरी प्रेमाची बाकी उरतेच.
-------------------------------------

माणसाच्या सद्य स्थितीवरून त्याच्या भविष्याचे अनुमान लावू नका. कारण वेळ अशी एक शक्ती आहे जी कोळश्यामध्ये हीरा निर्माण करते आणि शिंपल्यामध्ये मोती.
-------------------------------------

मी असाच होतो , असाच आहे आणि असाच असणार.
तुम्हांला हा अभिमान वाटत असेल तर हा माझ्यासाठी आत्मसन्मान आहे. तुम्हाला माज वाटला तरी माझ्यासाठी जगण्यासाठी साज आहे.
तुम्ही माझ्यासाठी असाल की नाही है मला माहीत नाही पण मला तुमच्यासाठी असले पाहीजे तर मला स्वतःला शाश्वत ठेवणे जरूरीचे आहे.
मला कोणीतरी सांभाळावं म्हणून मी कोणालाही सांभाळत नाही तर माझी जबाबदारीची जाणीव सोडून मला जगता येत नाही.
-------------------------------------

त्या दिवशीआँफीसच्या दिशेने चालत होतो होतो तेव्हा माझ्यापासून १०० मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती,  बहुदा रोज नियमाने चालत असणार.
निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन असे वाटले.

मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला त्या माणसाला गाठायला थोडसं चालायचे होते आणि आँफीस कडे उजवीकडे फिरायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची खात्री मला होती...

थोड्याच वेळात लक्षात आले की दोघांमधील अंतर कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती  पाहून..

आणि तो क्षण आला, मी त्याला पार केले, मागे टाकले..!
हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये..
मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा....! स्पर्धा..? याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, तो या स्पर्धेचा भाग ही नव्हता.

मात्र जिंकण्याच्या ओढीने मी माझा रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो, जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, परत चालणे वाढणार  होते, अचानक चिडचिड होवू लागली, अस्वस्थता आली. उलट जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता...

असेच होते ना आयुष्यात सुद्धा ? सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते; सहकारी ? शेजारी..? मित्र? नातेवाईक?, यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण  पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते.

मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते.
या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.” ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.

कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हे ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व सुख गमावून बसतो.*

कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की; कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच; कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार; कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच; कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच; कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच...

तेव्हा लक्ष आपल्यावर, आपल्या ध्येयावर केंद्रित करावे, आपली चालण्याची गती आपल्या कालच्या गतीपेक्षा कशी आहे..? हे पाहावे. आहे ते कसे उपभोगता येईल हे पाहावे . आपल्याकडे आहे ते पहिलं जपावं.

मनोगत...

आयुष्य आणि भविष्य ...

या दोन्हीनां बदलण्यासाठी लढावं लागतं आणि या दोन्हीनां सहज करण्यासाठी समजावं लागतं.
धेय्य निच्छीत असावं आणि प्रयत्न करण्याची प्रवृत्ती असावी मग स्वप्न प्रत्यक्षात येतातंच.
दरी- खोऱ्यातून वाहणारी नदी वाहताना समुद्र आणखी किती दूर आहे हे विचारत बसत नाही.
------------------------------------------

मला कळत नाही माणसं लहरी नुसार का वागतात. आपण ठरवलेल्या संकल्प किंवा घेतलेल्या निर्णयावर तटस्थ का नसतात. लक्षात असलं पाहीजे आपण जेव्हा तटस्थ नसतो तेव्हा आपण स्वतःबद्दल शाशंक असतो. समोरच्यांनी आपल्यावर विश्वास ठेवण्याआधी आपल्याला स्वतःकडे आत्मविश्वास असला पाहिजे.
------------------------------------------

 मन हे अमृत आहे आणि अ मृत ही आहे. कसेही पाहीले तरी सुंदर आणि योग्य आहे. आपण त्याला कसे पाहतो आणि स्विकारतो ते महत्त्वाचे असते.
------------------------------------------

एकच विचारणार आहे मी बाप्पाला, जर खरोखरच तू प्रसन्न होतोस आपल्या भक्ताला...
तर आजनंतर एक वरदान दे मानवाला आणि मृत्यूआधी रोपट्याचं रूप दे त्याला. खरोखरचं मनाचं आणि जीवाचं माणूस असेल ज्या कुणाचं,
संगोपन करतील ते त्या रोपट्याचं. अमरत्वच मिळेल त्या जीवाला कारण कधीच मरण नसतं बीजांला.
------------------------------------------

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर...तासभर साथ देणारी माणसं
बस आणि ट्रेन मध्ये पण भेटतात. मनाची माणसं जोडा....
कारण जी मनाची नसतात ती कोणाची नसतात.
माणसं अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.
इथं स्वतःची आवड आणि सवड जपणारे जास्त आहेत. आपण माणसं जपावी.
------------------------------------------

जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं.
वेळ तिचे कर्तव्य करत असते , तेव्हा तिला चांगले वाईट विचार करता येत नाही.
------------------------------------------

तसा चोर प्रत्येकाच्या स्वभावात असतो.....फरक इतकाच की , काही जणांनी तो इतरांना हसवण्याकरीता ठेवलेला असतो आणि काही जणांनी तो इतरांना फसवण्याकरीता असतो.
------------------------------------------

एक वेळ अशीही येते जेव्हा आपण केवळ जनात नाही तर मनातही एकटे असतो. कधीकधी आजूबाजूला अनेक माणसं असतात पण तरीही आपल्या मनात एकटेच असतो.
आपण एकटे असताना आपल्या एकटेपणाला सहज ओळखणारं माणूस आपलं असतं.
------------------------------------------

शाश्वत सत्य......
आजकाल एखाद्याचं घर बांधून देण्यासाठी कोणाचाही हात पुढे येत नाही.
पंरतू एखाद्याच्या तुटलेल्या घराच्या दगडी/वीटा उचलून नेण्यासाठी कितीतरी जण तयार असतात. " जपलं ते आपलं ".
------------------------------------------

बऱ्याच वेळा मी स्वतः काय आहे ते मला माहीत आहे असे बहुतांश लोकांचा समज असतो. आणि समोरच्या व्यक्तीला तो स्वतः काय आहे याचा समज असतो.
पण त्या दोघांना एकमेकाला समजून घेण्याची प्रवृत्ती असेल तर नातं जुळतं. नाहीतर शहाण्यांची या जगात कमी नाही. आणि कोण स्वतःला काय समजतो याची हमी नाही.

मनोगत....

* आपलीच माणसं *...

आपलीच माणसं किती सहज  अविश्वास दाखवतात.....
जीवापाड जपलेल्या नात्यावर कानोकानी संशय घेतात, समोरच्याला दोष देऊन स्वतः निर्दोष राहतात. आपलीच माणसं.....
आपण सर्वस्व अर्पण करतो, पण आपण जर नकळत चुकलो तरी अंग काढून जातात. आपलीच माणसं......
आपण प्रत्येक क्षणात त्यांना आठवतात, पण ती माञ सोईस्कर नवा चेहरा नटवतात. आपलीच माणसं.....
---------------------------------

नेहमीच ससा बनून जगू नये... कारण उंदीरानांही चरबी येते आपल्याला उगाचच घाबरवण्याची.
नेहमीच माकडासारखं ही वागू नये... कारण इतरांवर अवघड वेळ येते आपल्यातला माणूस ओळखण्याची.
नेहमीच हरणासारखं गरीब होऊ नये..कारण बुद्धीभ्रष्ट लाडंगे वाट पाहत असतात सावजाची.
नेहमीच वाघासारखं वावरु नये... कारण तारांबळ होते आपल्यावर निरागस प्रेम करणाऱ्याची.
---------------------------------

वेडी मनाची......अशी फार थोडी असतात माणसं.
"नाती म्हणजे अनमोल मोती" म्हणून जपणारी....अशी फार थोडी असतात माणसं.
"वचन म्हणजे भावनांच जतन" म्हणून सांभाळणारी....अशी फार थोडी असतात माणसं.
"आपलं धन म्हणजे आपल्या माणसाचं मन" म्हणणारी.... अशी फार थोडी असतात माणसं.
---------------------------------

जरूरीचे नसतं , की सगळ्यांनी वाचल्यावर आणि काँमेंट दिल्यावरचंं आपल लिहणं योग्य असतं.
कारण प्रत्येकाच्या आवडीचं आणि छंदाच जग वेगवेगळं असतं. असही नसतं की आपलं लिहणं आणि मन सगळ्यांनाच रूचतं.
---------------------------------

प्रत्येक माणूस सोईने वागतं, जेव्हा त्याला आपलं काय कळायला लागतं. आपल काय ठरवणं खूप सोपं असतं कारण त्यात स्वार्था शिवाय आणि कशाच जगच नसतं.
---------------------------------

माणसं प्राण्यांपेक्षा विकसित आहेत. कारण माणसं प्राण्यांना पाळतात त्यांचा उपयोग होतो म्हणून.
बरं झालं प्राणी विकसित नाही झाले... नाहीतर माणसाचं जगणं प्राण्यांपेक्षा वाईट झालं असतं.
---------------------------------

* स्वार्थ *
आपण स्वतःला....स्वार्थापासून वेगळ ठेऊ शकत नाही मग म्हणून आपल्याला इतर कोणालाही दोष देण्यास अधिकार नाही.
इथं प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीनूसार जगण्याची मुभा आहे....म्हणूनच स्वार्थ पदोपदी उभा आहे.
फरक एवढाच की.......
काही स्वार्थ मनासाठी असतात तर काही मेंदूसाठी.
काही स्वार्थ इतरांसाठी असतात तर काही स्वतःसाठी.
काही स्वार्थ समाधानासठी असतात काही अभिमानासाठी.
काही चांगल्यासाठी असतात तर काही कोणाच्या वाईटासाठी.
अर्थात.... स्वार्थ नेहमीच वाईट असतो असं नाही. पण ज्याचा त्याला वाईट आहे की Right आहे हे माहीत असतं.
---------------------------------

शब्दांचे अर्थ बदलतात पण शब्द कधीच बदलत नाहीत.
पाण्याच्या अवस्था बदलतात पण पाणी कधीच बदलत नाही.
माणूस बदलतो वेळ कधीच बदलत नाही.
---------------------------------

जे भाड्याने (रूपये देऊन) आणलेले असते ते आपल्याकडे कायम रहात नाही. ते कायम स्वरूपाचे नसते.
मग त्या वस्तू असोत किंवा व्यक्ती त्या एका काळ मर्यादेपर्यतच आपल्याकडे असू शकतात. कारण आपण त्या मिळवलेल्या नसतात किंवा त्यावर आपला मालकी हक्क नसतो.
परंतु....ज्या वस्तू किंवा व्यक्ती आपण आपल्या कर्तुत्व किंवा मेहनतीने मिळवलेल्या असतात. त्या आपण मानाने ठेऊ शकतो. कारण त्या आपल्याच असतात. कारण जे जपलं तेच आपलं असतं.
---------------------------------

मी शोधत असतो अशी माणसं जी कोणत्याही मुखवट्याशिवाय खऱ्या चेहऱ्याने जगत असतात. ना स्वतः फसण्याची भीती ना कोणाला फसवण्याची इच्छा.
स्वतःच्या स्वच्छ निरागस आणि निखळ भावनांचा बंध समोरच्या माणसाच्या मनाशी घट्ट राहून जगणारी माणसं. तुम्ही म्हणालं काय गरज आहे अशी माणसं शोधायची....
कारण मला सवय आहे जे माझ्याकडे नाही ते इतरांच्या व्यक्तीत्वात शोधून त्यातून समाधान आणि आनंद मिळवण्याची.
सगळेच बोध तपस्येतून होत नाहीत आणि सगळेच शोध होकायंञ आणि सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने लागत नाहीत.
---------------------------------

* अटळ सत्य *
या जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे *आनेवाला पल जानेवाला है* या गाण्यासारखे. जे मनात करावसं ते करायचं आणि जे बोलावं वाटतं ते बोलायचं कारण ते परत करण्याची वेळ येईल की नाही हे निच्छीत नसते. आज जे आपल्याकडे आहे ते आपले आहे, जे काल पर्यंत होतं आणि आज नाही ते आपलं नाहीच... त्या फक्त आठवणी आणि उद्या काय असेल  त्याबद्दल फक्त वेळच ठरवू शकते.
जगताना मनाचा विचार करा कारण जनाचा विचार करताना जगता येत नाही. फक्त जगताना मनात आणि जनात आपलं माणूस सोबत असणं जरूरी असतं.
आपलं कोण आहे प्रत्येकानं आपआपलं ठरवायचं असतं. हे ठरवण्याचं नाव नातं असतं. त्याला नाव नसलं तरी मनात वाव असणं जरूरीचं असतं.
---------------------------------

*Mood..... अर्थात "लहर"*

का वागतात माणसं एवढी rude. जी आणतात नात्यात खोटा mood.
काहीजण करतात एकदमच कहर. आली जर त्यांना चुकून एखादी लहर.
सहजच माणसं होऊन जातात dud. जेव्हा आणतात ती नात्यात mood.
संशयी विचार म्हणजे भयानक जहर. क्षणात संपतात नाती आली जर लहर.
जाणीवपूर्वक म्हणावं ok I should. नात्यांमध्ये कधी आणू नका mood.
---------------------------------

मनाची नाती वेळच जुळवून आणते. जर वेळेने ती जूळवली असतील तर ती जपा.
जर अशी नाती जुळली नसतील तर आजचा दिवस तुम्हाला वेळेने दिला आहे. तुमच्या मनाच नातं जुळावंं आणि तुम्हाला एखादं छान माणूस मिळावं.

मनोगत...

* मेळा भावनांचा *

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला .....
काय, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हणालो ...अरे नुकताच "संयम" स्विकारलाय.
तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.

पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.
आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात भेटतात का ?
मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा !  हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी.

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.
मीही मग मुद्दाम "गडबडी"च्या गाडीत बसलो आणि तिथून सटकलो.

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या आपल्यापेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात. कसं काय सर्व? घरचे मजेत ना?".

मी म्हणालो, "छान" चाललय सगळं......."सयंम" आणि "विश्वास"हे मिञ आहेत सध्या ह्रदयघरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं,  धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय..
एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं  नावच "समाधान" ठेवलंय." आणि "जाणीवेला" सोबत ठेऊन जगतोय.

तसं ते हसलं माझ्याकडे पाहून आणि परत पाठ फिरवून निघून गेलं "मत्सरा"च्या हातात हात घालून अन माझी "इर्षा"करत गेलं दुसर्‍याला भुलवायला.......

तेंव्हापासुन आनंदच आनंद आणि समाधान सर्वत्र अनुभवतोय...
----------------------------------------

* खरं काय असत माहित आहे? *
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.
----------------------------------------

* आठवण *
आज...फार जूनी म्हणजे (१५ वर्षापूर्वीची) फाईल आणि डायरीमधील मधील कागदपत्रे चाळत होतो.
अचानक एक कागदाचा लीफाफा (पाकीट) मिळाले. उघडून पाहीले तर त्यात एक १०० /- रूपयांची नोट मिळाली.
मेंदूवर थोडा जोर दिला तेव्हा आठवले, १९९५ साली मी एक छोटीशी स्वरचीत कवीता मी पेपर मध्ये छापण्यास पाठवली होती त्याचे मानधन म्हणून मला संपादक मंडळाने दिले होते ते शंभर रुपये. पाहून मन भरून आलं...
खरं सांगू स्वतःचा अभिमान वाटला. कारण २० वर्षानंतर ही १००/- रूपयांची नोट तशीच होती, आजच्या १०० /- रूपयांच्या नोटीच्याच  मुल्याची. पण २० वर्षानंतर माझ्यात माणूस म्हणून झालेले बदल १०० पेक्षा जास्त आहेत. तेव्हा एकटाच मनाचा राजा होतो पण आज स्वतःच्या मनाचा राजा असताना १००पेक्षा जास्त माझ्या मनाची जपणारी माणसं जोडली आहेत. वेळेनुसार पैशाचं रूप बदलत नाही त्याचं केवळ तुलनात्मक मूल्य बदलत पण माणसाचं रूप बदलत पण त्याचं मन बदलू नये.
----------------------------------------

* आजपर्यंत.......*
मान्य आहे की,बालवाडीपासून इ.९वी पर्यतचे एकही प्रगती पञक नाही जपून ठेवता आले. पण इ.१०वी पासून M.phil. पर्यंतची सर्व बोर्ड सर्टिफिकेट आणि डीगरी सर्टिफिकेट मी आज २० वर्षानंतर ही जपून ठेवली आहेत. पण आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली त्या त्या ठिकाणी इन्टरव्यु पँनल ने फक्त माझ्या बायोडाटा पाहिला (मला १० वी ते M.Phil.या प्रत्येक परीक्षेत किती टक्के मिळालेत हे पाहिले की नाही माहीत नाही) पण मला प्रत्यक्ष कृतीत शिक्षणाचा संदर्भ किती लावता येतो आणि त्या ज्ञानाचा वापर मी कसा करू शकतो याची शहाणीशा (तपासणी) अनेक प्रश्न विचारून केली होती.
अर्थात ... कागदावर असलेल्या ग्रेड /टक्के यापेक्षा माझी कृतीशील विचार प्रवृत्ती जास्त महत्त्वाची ठरली. अगदी आजपर्यंत....
----------------------------------------

बहुतांश माणसं का बरं समाधानी नसतात, कारण एकदम सोपं आहे - जन्माला आल्यानंतर बालकाला लवकरात लवकर बाल अवस्थेतून तरूण अवस्थेत जायचं असतं. याच तारूण्यात जीवनाच्या प्रत्येक क्षणाला अनुभवन्या ऐवजी संपंत्ती जमवण्यात व्यस्थ राहतात. जेव्हा तारूण्य नकळत प्रौढ अवस्थेतून म्हातारपणात घेऊन जातं तेव्हा माणसं परत बालपणाच्या अवस्थेची इच्छा करतात. अर्थात ती पूर्ण होणं शक्य नसतं मग माणसं आपल्या नातवंडासोबत खेळत आपली इच्छा पूर्ण करतात. माणसं जे स्वतः जवळ आहे त्याचा पूर्ण आनंद न घेता आणि त्याचं महत्व न ओळखता पुढे निघून जातात. कालमध्ये आणि उद्यामध्ये जगण्याऐवजी आज आणि आज पेक्षा सध्यस्थितीत जगा आणि मग बघा.
----------------------------------------

काल चा मेसेज वाचून समजले की आयसँक न्युटन ने सांगितलेल्या गुरूत्वाकर्षनाचा तिसरा नियम हा वैश्विक नियम आहे... "प्रत्येक क्रियेला समांतर प्रतिक्रिया असते".
अर्थात आपण बोललो तरच समोरचा बोलतो. पण यालाही अपवाद आहे. कारण या जगात अशीही माणसं आहेत जी समोरच्या व्यक्तीबद्दल कोणताही चूकीचा विचार न करता आणि तर्क न लावता आपल्या परीने संवाद साधत असतात. कारण त्यांचा हेतू अगदी  निस्वार्थी असतो. अशा सर्व माणसांना माझा मनःपूर्वक नमस्कार.

मनोगत......

सत्य नेहमीच सुंदर नसते...

सत्य नेहमीच सुंदर नसते आणि जे सुंदर असते ते सगळेच सत्य  नसते.
सुंदर माणूस चांगल्या विचारांचा असेलच असे नाही. पण चांगल्या विचारांचा माणूस सुंदर शकतो.
---------------------------------------

"ज्ञान" हे "पैशा" पेक्षा श्रेष्ठ आहे..
कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते. याउलट ज्ञान तुमचे रक्षण करते.                                                               पण.... केवळ ज्ञान असून उपयोगाचे नाही.
ते कसे , केव्हा आणि कोणासाठी वापरायचे याचे ही ज्ञान हवे.
---------------------------------------

मनुष्य कितीही गोरा असला, तरी त्याची सावली मात्र काळीच असते,
"मी" श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण,फक्त "मीच" श्रेष्ठ आहे हा अहंकारआहे.
---------------------------------------

मर्यादा ही कशासाठी ठेवायची हे ज्याने त्याने ठरवायचे असते.
कारण माणूस स्वतःला जास्त चांगला ओळखतो.
त्यामुळे आपण जेव्हा इतरांवर मर्यादा घालतो तेव्हा आपली फसगत होणे स्वाभाविक आहे.
इतरांना बदलण्यासाचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदला.
---------------------------------------

माणसं  चुकून हरवतात तेव्हा त्यांना शोधनं ठीक असते...
पण माणसं जेव्हा जाणीवपूर्वक हरवतात तेव्हा त्यांना शोधनं निरर्थक असते.
---------------------------------------

दुधापासून दही, ताक, लोणी, तुप हे सर्व तयार होत असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....
श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वातून आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं.
---------------------------------------

कधीकधी आपण स्वतःला शहाणे समजून काही बदल आणण्याचा प्रयत्न करतो.
पण म्हणतात ना... तेरड्याचा रंग तीन दिवस. अशी माणसाची प्रवृती झाली आहे.
त्यामुळे निसर्गाकडून बरेच काही शिकता येत. ढग भरून आले याचा अर्थ पाऊस पडतोच असे नाही.
---------------------------------------

डोळे पाण्याने भरून येतात म्हणजे माणूस खरोखर रडतोच असं नाही...
आकाशत ढग भरून येतात म्हणजे पाऊस पडतोच असं नाही...
---------------------------------------

जीवनाच्या कोणत्याही वळणावर निर्णय घेताना मेंदूचा नाही तर मनाची बाजू ऐकून घ्या.
कारण मेंदूतील निर्णय ही मजबूरी असू शकते पण मनातील निर्णय नेहमीच मंजूरी असते.
---------------------------------------

मत्सराने तिरस्काराने भरलेला तुमचा हितशत्रु देखील काय करेल तर... जास्तीतजास्त तुमची संपत्ती हिरावु शकेल..
पण तुमचं ज्ञान, अनुभव, एकनिष्ठता, जाणीव, वेळ या गोष्टी तो कसा हिरावून घेईल.
पण तुम्ही जर मत्सराने तिरस्काराने आतुन जळत रहाल तर ते तुम्हालाच आतुन पोखरत राहील..
त्यामुळे कोणाचाही मत्सर वा तिरस्कार करु नका.. समाधानी रहायला शिका.आपोआप सुखी व्हाल.
वेळ प्रत्येकाला तेच देते जे तो इतरांसाठी चिंततो. इतरांसाठी किंबहुना सर्वांसाठीच सुख समाधान मागा. तुम्हालाही सुख समाधान लाभेल.
-------------------------------------
मनातले सुविचार...

* आपण... कोणासाठी?, का?, कसं ?, कधीपर्यत?, कशासाठी ?, असायचं हे प्रत्येक माणूस स्वतःच्या सोयीने ठरवतो.

* दगड न होता दगडातील काही चांगले गुण घेऊन स्वतःच्या जीवनाचे सुंदर शिल्प घडविताना दुःखाचे ठोके सहन करण्याची शक्ती आणि संयम  सुखाचे मूर्तीरूप धारण करता येते.

* जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तडजोड करायला शिका. कारण तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते.

* चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य,एकनिष्ठता आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.

* पूर्ण वेडंपण किंवा पूर्ण शहाणपण असलेलं माणूस ञासदायक असतं. पण अर्धवेडं किंवा अर्धशहाण फारच धोकादायक असतं.

* आज ढळलेला सूर्य उद्या पून्हा उगवणार... नवीन दिवसासाठी नवीन तेज तो राञीच्या अंधारातचं जमवणार...

* माणूस हा भूतलावरील एकमेव प्राणी आहे जो स्वतःच्या सोयीचे सुंदर नियोजन करतो आणि भूतकाळ सहज विसरतो.

* माणसाच्या आयुष्याची सुरवात स्वतःच्या रडण्याने होते आणि आयुष्याचा शेवट इतरांच्या रडण्याने होतो.

मनोगत..

* मनोहर मैत्री *

"मनोहर मैत्री" बनविण्यासाठी कृती.

मनामध्ये थोडीशी ओळख घालून ती नीट समजून घ्या. त्यात निखळ मैत्रीचे नातं घालून ते नीट एकत्र करा.
अर्थात ओळख आणि भावाना असल्याशिवाय मैत्रीला चव येणारच नाही. ओळख व मैत्रीचं नातं छान एकत्र झालं की त्यात चवीनूसार काळजी, प्रेम व विश्वास घालून पुन्हा एकत्र करा.
या मिश्रणाला आपूलकीचा एक वेगळाच रंग येईल आणि एकनिष्ठेने मैत्री अधिकच चवदार होईल. या मिश्रणात चिमूटभर रुसवा-फुगवा घालून पुन्हा एकदा एकजीव करा.
मैत्री अधिक रुचकर होण्यासाठी त्यात चिमुभर का होईना पण रुसवा-फुगवा हवाच,त्याशिवाय मजा येत नाही. हा रुसवा-फुगवा मैत्रीत विरघळून जाईल तेंव्हाच मैत्रीला खरी चव येईल.
आता ही मैत्री अधिक घट्ट व्हावी असे वाटत असेल तर त्यात आदर-सन्मान मिसळा व एकजीव करा. आता ही मैत्रीची डिश सजवण्यासाठी त्यावर गोड गोड हसूं पसरा आणि या घट्ट मैत्रीची चव घ्या.
ही घट्ट मैत्री आयुष्यभर छान टिकते. या मैत्रीने शरीराला स्थूलपणा येत नाही आणि ह्दयाला कोणत्याही परिस्थितीत ह्दयविकाराचा झटका येत नाही.
आवश्यक तेवढयाच गोडव्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता नाही. कोणत्याही प्रकारचा अती ताण तणाव नाही, असलाच तरी त्वरित हलकेच मिळणाऱ्या आधाराने रक्तदाब होत नाही.
आयुष्यातील प्रत्येक क्षणात जिवंत ठेवून जन्माला अर्थ आणणारी "मनोहर मैत्री" आपल्या सर्वांना लाभावी.
---------------------------------

* दगड *
'दगड' म्हणजे 'देव' असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे वेगवेगळ्या रूपात असतो मनात त्याचा विचार करून पाहीलं तर दिसतोच.
तसा तो फारच उपयुक्त असतो. अनोळख्या गल्लीत किंवा रस्त्यावर हाताला लागलाचतर तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.
आजही दळण-वाटण करून देतो. मनमौजी मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो.
रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वत:ला फोडुन घेतो.
शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छिन्निचे घाव सहन करतो.
शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो. चिखलात पाय पडू नये म्हणून आधार देतो.
बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो.
मला सांगा, "'देव' सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं ?"
बाई म्हणतात, "तू 'दगड' आहेस. तुला गणित येत नाही. देवाला तरी कुठे गणित येतं? नाहीतर त्याने फायदा-तोटा बघितला असता. तो व्यापारी झाला असता."
दगडाला शेंदुर फासून त्यात भाव-श्रद्धा ठेवली की, त्याचा 'देव' होतो." म्हणजे, 'दगड'च 'देव' असतो.
मला तो खूप आदर्श वाटतो... कारण तो कोणालाही नाकारत नाही अन् स्विकारत ही नाही.
तो देवळाच्या कळसाशी असूनही राजा नाही आणि पायरीशी असूनही गुलामही नाही.
---------------------------------

* तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे व्यक्तिमत्त्व  घडवीत असते. वाईट विचार आणि वाईट कृती ह्या जशा तुमचा घात करायला टपलेल्या असतात तसेच तुमचे चांगले विचार आणि तुमचे चांगले कर्मे तुम्ही जोडलेल्या नात्यातील माणूस रूपी देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात. म्हणूनच..... कोणाचे चांगले करता आले नाही तर हरकत नाही पण वाईट करून स्वतःला दोषपाञ करू नका.
---------------------------------

* ज्या माणसा मध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करायची उर्मी असते ,तीच माणसे खऱ्या अर्थाने खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात.
त्याचप्रमाणे अशीच नाती टिकतात ज्यात..शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.
परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्ती ला  "प्रभाव आणि पैसा" नाही तर  "स्वभाव आणि संबंध" कामाला येतात...
---------------------------------

* माणसाला उपजत एक गोष्ट मिळत नाही ती म्हणजे "जाणीव."
ती माणसानं स्वतःच्या स्वभावात निर्माण करून जोपासायची असते. कारण जीवनात आदर्श होण्यासाठी फक्त जाणीवेचीच गरज असते.
जन्म दिलेल्या आईपासून, जगायला शिकवलेल्या प्रत्येक व्यक्ती, वास्तू  आणि वस्तूची जाणीव ठेवणं जरूरी असतं.
---------------------------------

* सुरवात करणे जरुरीचे असले तरी कुठे थांबावे हे माहीत असणे जास्त महत्त्वाचे आहे.
प्रयत्न करणे जरूरीचे असले तरी कशासाठी हे माहीत असणे जास्त महत्त्वाचे आहे.
प्रश्न करणे जरूरीचे असले तरी विषयाचा योग्य संदर्भ माहीत असणे जरूरीचे आहे.
प्रेम करणे जरूरीचे असले तरी नात्यांतील जाणीव व जबाबदारी माहीत असणे जरूरीचे आहे.
---------------------------------

* नजर *
माणसाच्या नजरेला लगेच काही दिसत असेल तर ते "जे अयोग्य आहे" पण "जे योग्य आहे" ते माणसाच्या नजरेला सहज स्विकारता येत नाही.
हा बहुतेक माणसांच्या स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. नजरेला दोष देऊन काही बदल होत नाही, माणसाला मनोभावना योग्य ठेवता आली पाहिजे.
कारण " मनी वसे ते नजरेला दिसे ".
---------------------------------

*"नातं "आणि "जिव्हाळा  "*
दोनच गोष्टी अश्या आहेत की, त्यांना नियमांची गरज नसते...!
कोणी मनाशी जुळलं की "नातं "होते,
आणि
कोणी मनात शिरलं की,"जिव्हाळा ".
ज्यांचं मन, भावना सुंदर असतात, ज्यांना जाणीव असते.
त्यांना माणसं जपता येतात. अशी मनाची माणसं जोडा आणि जपा.
---------------------------------
*माणसातला " मी "*

* मी * का बोलू ?
* मी * का फोन करू ?
* मी * का कमीपणा घेऊ ?
* मी * का नमते घेऊ ?
* मी * का नेहमी समजून घ्यायचं ?
* मी * काय कमी आहे का ?                                                              
असे बरेच सारे "मी" आहेत
जे आयुष्यात बरंच काही "कमी" करतात आणि नुकसान करतात.
म्हणून "मी" पणा सोडा व नाती जोडा.      

मनोगत.....

सजीव हा जन्माला येतोच

* सजीव हा जन्माला येतोच.... जन्माला येणं महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे असते जीवन जगणे.
प्राण्यांना जन्म मिळतो परंतु त्यानां आपला इतिहास आणि संस्कृती जपता येत नाही.
झाडा-वेलींना जन्म मिळतो परंतु त्यांना आपल्या भाव-भावना प्रकट करता येत नाहीत.
माणसाला जन्म मिळतो, त्याला वरील दोन्ही गोष्टी करता येतात परंतु वरील सजीवांप्रमाने समाधानी आणि जाणीवपूर्वक वागता येत नाही.
अर्थात.... या भूतलावर कोणत्याही सजीवाचा जन्म परिपूर्ण नाही.
------------------------------------------------------

* शुल्लक अहंकार  सांभाळताना बहुमोल नाती सहज निसटुन जातात.

* गरज असते फक्त शुल्लक अहंकार  सोडुन देण्याची.

* मला विचारलच नाही; मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; माझ्याकडे बघितलंच नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही.
अशा छोट्या गोष्टी सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.

* सूक्ष्म अहंकार हा अमरवेली सारखा परपोषी असतो.तो सोडता आला पाहिजे . तो लगेच सोडता येणारच नाही.
महाकठिण आहे ते,पण प्रयत्न करायला काय हरकत आहे...कारण नाती या अहंकारापेक्षा अनमोल असतात.

* माणसाची सर्वात मोठी ओळख ही केवळ त्याच्याकडे असणाऱ्या अमाप ज्ञानातून होत नाही ...तर मनात प्रेमळ भावना, इतरांना मदत करण्याची वृत्ती आणि जाणीव यातूनच होत असते.

* प्रयत्नांचे पंखांची भरारी आणि आत्मविश्वाचा मार्ग यामध्ये आजच्या दिवसाची सुरूवात करा. संयमाची शिदोरी आणि समाधानाचे लक्ष्य  असल्यावर मनभरुन आनंद तुम्हाला मिळेलच.

* माणसानं माणसात असताना मोबाईल, खिशात ठेवून माणसात राहावं...मोबाईल हातात ठेवून माणसं, खिशात ठेवल्यागत वागू नये..

* प्रत्येकावर विश्वास ठेवणे चुक असले तरी... कोणावरही विश्वास न ठेवण्यासारखी घोर चूक कोणतीच नाही. कारण कोणावरही विश्वास न ठेवणे हे स्वतःवरच्या अविश्वासाचे लक्षण आहे.

* कधीच कोणाच्या हुशारी विषयी तर्क लावू नका. कारण प्रत्येक माणूस वेळेनुसार, अनुभवाने किंवा  स्वतःच्या सोईने हुशार होतोच.

* डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो; पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो, कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे आणि कोणी ताठ बनत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे.
------------------------------------------------------

* विचार, नियोजन, कृती, एकसंघता, प्रेम, राग, दुःख, यातना, आनंद, जाणीव यासारख्या अनेक गोष्टी प्राण्यांमध्ये ही दिसून येतात...तरी मनुष्य स्वतःला श्रेष्ठ समजतो....
उलट प्राण्यांना स्वतःची मर्यादा ओळखून वागता येते आणि दूसर्याचा अपमान करण्याची वृत्ती नसते, हेच मनुष्याला जन्मभर करता येत नाही.
------------------------------------------------------

* अनेक वेळा आपण केवळ आपल्या काल्पनिक तर्कांद्वारे आपल्या विश्वासातील माणसं आणि नाती गमावून बसतो. तर्क लावणे चुकीचे नाही पण त्यात तथ्य ( सत्य ) असणे जरूरीचे असते.
कोणत्याही व्यक्तीबद्दल तर्क लावण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल सर्वव्यापी अभ्यास असावा लागतो आणि असा अभ्यास करण्यास त्या व्यक्तीला सर्वंअंगाने समजून घेणे जरूरीचे असते..
अर्थातच त्यासाठी त्याचा सहवास मिळविणे जरूरीचे असते. अशाप्रकारे जर एखाद्याच्या  सहवासात आपण आपण राहू शकतो
तर त्या व्यक्तीबद्दल तर्कांद्वारे अनुमान न लावता स्पष्ट संवाद साधून नाते आणि व्यक्ती दोन्ही जपावं.
------------------------------------------------------

* नातं मनाच्या मातीतलं असेल तर ते रूजतं.......
आपूलकीच्या आणि मायेच्या भावनेत ते अंकुरतं......
निस्वार्थ आणि एकनिष्ठ प्रेमाच्या प्रकाशात ते आकारतं.......
विश्वासाच्या आधारावर ते सतत बहरतं.......
------------------------------------------------------

* आम्ही लहानपणी लपाछपी चा खेळ खेळायचो ज्यामध्ये लपलेल्या सर्वांना ज्याच्यावर डाव ( राज्य ) असेल त्याने शोधायचे.
फार मज्जा असायची कारण आपण लपलेल्यानां शोधले की मनात आणि चेहऱ्यावर असलेला आनंद गगनात मावेनासा होत असे.
ज्याला शोधलंय तो ही मान्य करून समोर येत असे कोणतेही कारण न देता अगदी निरागसपणे.
आज तो डाव राहीला नाही, तो आनंद , ती निरागस भावना , लपून राहणे ही राहीले नाही.
कारण आजकाल माणसं न लपता ही एखाद्याला समोरासमोर नजरअदांज (टाळून ) करून अनोळखी भाव आणून बाजू काढतात.
आता माणसांना चेहऱ्यावर मुखवटा घालून वागण्याची सवय झाली आहे त्यामुळे लपण्याची गरज पडत नाही.
मग अशा मुखवटा घातलेल्यानां शोधण्यात अर्थ ही नाहीचं आणि मज्जा तर जराही नाही.
------------------------------------------------------

* आयुष्यातील प्रत्येक चुकीच्या वळणावर , अनुत्तरीत प्रश्नावर , हतबल करणाऱ्या अडचणीत,
निराशावादी विचारात जी व्यक्ती आपल्यासोबत तटस्थ उभी असते ... त्या व्यक्तीबद्दल अविश्वास म्हणजे नात्याचा अंत असतो.
------------------------------------------------------

* पक्ष्यांना साऱ्या आकाशाचे एश्वर्य आणि सौंदर्य मोकळे असते तरी ते कधी दिशा विसरत नाहीत. माणसं माञ थोड्याफार स्वार्थात सगळं काही सहज विसरतात.

* आपण काय विचार करतो... आपल्याला काय माहिती आहे .... आपण कशावर विश्वास ठेवतो...
आपले काय समज आहेत..... या साऱ्या गोष्टी गौण असतात....महत्वाचे आहे आपण काय कृती करतो.*
------------------------------------------------------

* शब्द महत्त्वाचे असतात कारण त्यांना अर्थ असतात. पण प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडता येत नाही.
म्हणूनच श्वास , नजर आणि स्पर्श हा अनमोल गोष्टी अस्तित्वात आहेत.
अर्थात ... जीवन सर्वांसाठी सारखेच असते. फरक फक्त एवढाच असतो कोणी स्वतःच्या मनासारखं जगत असतं आणि कोणीतरी आपल्याचं मन जपून जगत असतं.
------------------------------------------------------

* आयुष्य म्हणजे अनुभव , प्रयोग आणि स्वप्न यांचे उत्कृष्ट समीकरण आहे.
कालचा दिवस हा अनुभव होता , आजचा दिवस हा प्रयोग असतो आणि उद्याचा दिवस हे स्वप्न असेल.
म्हणूनच तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची स्वप्न साकार करा.
------------------------------------------------------

* सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक सूवर्णसंधी.
या संधीचा योग्य वापर करण्यासाठी स्वच्छ विचार , निर्मळ मन आणि चेहऱ्यावर स्मित हास्य असावे. यामुळे स्वतःबरोबरच समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो आणि सुंदर बनतो.
------------------------------------------------------

* वेळेचा आभारी आहे मी.... तिने शब्दाला जन्म दिला.
उपसता येतात शब्दांनी आनंद , दुःख , संताप , संशय , सुखाच्या सर्व भावनाआणि मोकळं करता येत मनाला.
------------------------------------------------------


* सर्व झुरत प्रेम करणाऱ्या येड्यांसाठी *
एकदा तरी साला सगळं मनासारखं होऊ दे !
मी तिला पहाताना तिनं ही मला डोळे भरून पाहू दे. एकदा तरी साला.....
माझं बोलावनं नेहमीचचं आहे, तिचं बोलावनं कधीतरी येऊ दे. एकदा तरी साला......
नूसतचं किती झुरायचं , दुरूनचं बघायचं..कधीतरी तिचा अलगद स्पर्श होऊ दे. कधी तरी साला.....
खिशाला कडकी तर पटणार कशी लडकी...आहे तसे छान आहोत तीला आता तरी कळू दे. कधी तरी साला...            
प्रेम-लफडं काही जमत नाही.. अरे यार लग्नंच जमू दे. कधी तरी साला...
------------------------------------------------------

* कोण म्हणत......* 
की प्रेमाची लफडी फक्त सिनेमा, सिरियल, नाटकातच असतात. अहो पोकळ मनाच्या माणसांचे प्रेमाचे लोचे होतातच.
आजकाल प्रेमासाठी मनाची नाही, तर.. धनाची आणि देहाची गरज असते. एकतर पोरांनी बापाच्या खिशाला हात घालून इम्परेशन पाडायचे किंवा पोरींनी आपल्या शरीराचे प्रदर्शन करून इम्परेशन पाडायचे.
काहीजण तर उगाचच हवेत उडतात अन् प्रेमात पडतात.            
काहीजण फक्त फँशन म्हणून सगळेजण करतात म्हणून प्रेम करतात.
काहीजण केवळ छंद म्हणून प्रेम करतात तर काही मंद होऊन प्रेम करतात.
काहीजण  आईवडीलांना फाट्यावर मारून प्रेम करतात तर काहीजण स्वतःला काट्यावर ( अपमान सहन करत ) मारून प्रेम करतात.
काहीजण गल्लीत प्रेम करतात तर काही नाक्यावर उभ्या भडव्या टपोरी भाई वर प्रेम करतात.
काहीजण इतरांना जळवायला प्रेम करतात तर काहीजण स्वतःची जळते म्हणून प्रेम करतात.
काहीजण स्वतःची लाल करायला प्रेम करतात तर काहीजण उलटी चाल करायला प्रेम करतात.
काहीजण फुकटचा आईस्क्रीम, पिझा- बर्गर, फ्रँकी खाऊन तर काही उदारीच्या बाईक अन् कपड्यावर फीदा होऊन प्रेम करतात.
खरंच यडं.. नक्की प्रेम करतात की भावनांचा गेम करतात. म्हणूनच म्हटलं कोण म्हणत की....

मनोगत......