* मेळा भावनांचा *

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला .....
काय, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हणालो ...अरे नुकताच "संयम" स्विकारलाय.
तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.

पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.
आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात भेटतात का ?
मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा !  हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी.

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.
मीही मग मुद्दाम "गडबडी"च्या गाडीत बसलो आणि तिथून सटकलो.

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या आपल्यापेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात. कसं काय सर्व? घरचे मजेत ना?".

मी म्हणालो, "छान" चाललय सगळं......."सयंम" आणि "विश्वास"हे मिञ आहेत सध्या ह्रदयघरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं,  धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय..
एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं  नावच "समाधान" ठेवलंय." आणि "जाणीवेला" सोबत ठेऊन जगतोय.

तसं ते हसलं माझ्याकडे पाहून आणि परत पाठ फिरवून निघून गेलं "मत्सरा"च्या हातात हात घालून अन माझी "इर्षा"करत गेलं दुसर्‍याला भुलवायला.......

तेंव्हापासुन आनंदच आनंद आणि समाधान सर्वत्र अनुभवतोय...
----------------------------------------

* खरं काय असत माहित आहे? *
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.
----------------------------------------

* आठवण *
आज...फार जूनी म्हणजे (१५ वर्षापूर्वीची) फाईल आणि डायरीमधील मधील कागदपत्रे चाळत होतो.
अचानक एक कागदाचा लीफाफा (पाकीट) मिळाले. उघडून पाहीले तर त्यात एक १०० /- रूपयांची नोट मिळाली.
मेंदूवर थोडा जोर दिला तेव्हा आठवले, १९९५ साली मी एक छोटीशी स्वरचीत कवीता मी पेपर मध्ये छापण्यास पाठवली होती त्याचे मानधन म्हणून मला संपादक मंडळाने दिले होते ते शंभर रुपये. पाहून मन भरून आलं...
खरं सांगू स्वतःचा अभिमान वाटला. कारण २० वर्षानंतर ही १००/- रूपयांची नोट तशीच होती, आजच्या १०० /- रूपयांच्या नोटीच्याच  मुल्याची. पण २० वर्षानंतर माझ्यात माणूस म्हणून झालेले बदल १०० पेक्षा जास्त आहेत. तेव्हा एकटाच मनाचा राजा होतो पण आज स्वतःच्या मनाचा राजा असताना १००पेक्षा जास्त माझ्या मनाची जपणारी माणसं जोडली आहेत. वेळेनुसार पैशाचं रूप बदलत नाही त्याचं केवळ तुलनात्मक मूल्य बदलत पण माणसाचं रूप बदलत पण त्याचं मन बदलू नये.
----------------------------------------

* आजपर्यंत.......*
मान्य आहे की,बालवाडीपासून इ.९वी पर्यतचे एकही प्रगती पञक नाही जपून ठेवता आले. पण इ.१०वी पासून M.phil. पर्यंतची सर्व बोर्ड सर्टिफिकेट आणि डीगरी सर्टिफिकेट मी आज २० वर्षानंतर ही जपून ठेवली आहेत. पण आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली त्या त्या ठिकाणी इन्टरव्यु पँनल ने फक्त माझ्या बायोडाटा पाहिला (मला १० वी ते M.Phil.या प्रत्येक परीक्षेत किती टक्के मिळालेत हे पाहिले की नाही माहीत नाही) पण मला प्रत्यक्ष कृतीत शिक्षणाचा संदर्भ किती लावता येतो आणि त्या ज्ञानाचा वापर मी कसा करू शकतो याची शहाणीशा (तपासणी) अनेक प्रश्न विचारून केली होती.
अर्थात ... कागदावर असलेल्या ग्रेड /टक्के यापेक्षा माझी कृतीशील विचार प्रवृत्ती जास्त महत्त्वाची ठरली. अगदी आजपर्यंत....
----------------------------------------

बहुतांश माणसं का बरं समाधानी नसतात, कारण एकदम सोपं आहे - जन्माला आल्यानंतर बालकाला लवकरात लवकर बाल अवस्थेतून तरूण अवस्थेत जायचं असतं. याच तारूण्यात जीवनाच्या प्रत्येक क्षणाला अनुभवन्या ऐवजी संपंत्ती जमवण्यात व्यस्थ राहतात. जेव्हा तारूण्य नकळत प्रौढ अवस्थेतून म्हातारपणात घेऊन जातं तेव्हा माणसं परत बालपणाच्या अवस्थेची इच्छा करतात. अर्थात ती पूर्ण होणं शक्य नसतं मग माणसं आपल्या नातवंडासोबत खेळत आपली इच्छा पूर्ण करतात. माणसं जे स्वतः जवळ आहे त्याचा पूर्ण आनंद न घेता आणि त्याचं महत्व न ओळखता पुढे निघून जातात. कालमध्ये आणि उद्यामध्ये जगण्याऐवजी आज आणि आज पेक्षा सध्यस्थितीत जगा आणि मग बघा.
----------------------------------------

काल चा मेसेज वाचून समजले की आयसँक न्युटन ने सांगितलेल्या गुरूत्वाकर्षनाचा तिसरा नियम हा वैश्विक नियम आहे... "प्रत्येक क्रियेला समांतर प्रतिक्रिया असते".
अर्थात आपण बोललो तरच समोरचा बोलतो. पण यालाही अपवाद आहे. कारण या जगात अशीही माणसं आहेत जी समोरच्या व्यक्तीबद्दल कोणताही चूकीचा विचार न करता आणि तर्क न लावता आपल्या परीने संवाद साधत असतात. कारण त्यांचा हेतू अगदी  निस्वार्थी असतो. अशा सर्व माणसांना माझा मनःपूर्वक नमस्कार.

मनोगत......

No comments:

Post a Comment