"शोरूम आणि माणूस"

बाजारात शोरूमचं थैमान माजलयं. जे कपडे दिसायला पाहीजेत ते आहेतच पण जे कधी दिसू नयेत अशा कपड्यांना निर्जीव पुतळ्यांवर सजवलयं.
पशुमय प्रवृत्तीला नराधमांच्या खत घातलयं निरागस मनांमध्ये अविचारांच बीज रूजवलयं...बाजारात शोरूमचं थैमान माजलयं.
वाईट याचं वाटतय निर्जिव पुतळ्यांसारखंच सजीव माणसानं ही चालत्या-फिरत्या शोरूमचं प्रदर्शन मांडलयं.
काय घालवं आणि काय दाखवावं याचं भान सांडलयं. बाजारात आता माणसाच्या शोरूमचं थैमान माजलयं.
-------------------------------------------

प्रेम....रंग आणि अंग बघूनच करतात माणसं...
हे आता तुमच्यातील काही हसला असाल आणि काही 'असं नसतं' असे म्हणाला असाल.
काही जनानां पटलं नसेल तर काहीनां राग आला असेल. तुम्ही व्यक्त केलेले विचार मेंदूचे होते.
कारण खरं प्रेम करणारे विचार करत नाहीत तर.. आपल्या मनातल्या भावनांना जपत असतात.
म्हणूनच व्यक्त करताना मेंदूचा कमी अन् मनाचा जास्त वापर करा.
-------------------------------------------

राञ....म्हणजे काय ?
थकलेल्या प्रत्येक शरीराला आपल्या घट्ट मिठीत घेणारी प्रेमळ आई.
माणसाला बालपणातचं आईच्या कुशीत झोपता येतं, आई नेहमीच कुशीत आणि मिठीत घेऊ शकत नाही आणि काही माणसानां राहाता येत नाही.
म्हणूनच वेळेनं बनवली आहे राञ.
------------------------------

सकाळ म्हणजे काय ?
राञी निवांत विसावलेल्या आपल्या लाडक्यांसाठी वेळेने तयार केलेली नव्या अनुभवांची शिदोरी.
शेवटी पोट भारल्याशिवाय मेहनत करता येत नाही आणि मेहनती शिवाय थकून राञ रूपी आईच्या मिठीत सूखावता येत नाही.........
सकाळी उठाल तेव्हा शिदोरीचा आनंद घेण्यास शुभेच्छा.
-------------------------------------------

माणसं आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात हे जरी खरं असलं तरी ते कर्तृत्व करण्यास ज्यांनी जन्म दिला,
ज्यांनी त्यासाठी मार्गदर्शन केले, ज्यांनी मोठं होण्याच्या शर्यतीत स्पर्धा  देऊन जिकंण्यास प्रवृत्त केले ,
ज्यांनी  प्रोत्साहन दिलं, ज्यांनी यश-अपयशात सोबत केली, अशा अनेक माणसांमुळेच माणूस मोठा होतो.
म्हणूनच कितीही मोठं झालं तरी माणूसकी जपता आली पाहिजे. अर्थात ..... "जाणीव " ठेवली पाहीजे.
-------------------------------------------

"अमाप पैसा" कमवला तरी त्याने  निस्वार्थी आणि निरागस प्रेम विकत घेता येत नाही.
"शिखर प्रसिद्धी" मिळवली तरी त्याचा आनंद आणि समाधान कायम टिकून रहात  नाही.
पण..."मनातली आठवण" एक छोटीशी किंवा क्षणभराची आठवण कायम सोबत रहाते.
कधी हळूच गालात हसते तर कधी झर्यासारखी डोळ्यांमधून उन्मळून येते. फक्त आनंद आणि समाधान देते.
-------------------------------------------

जसं पोटभरून जेवणं जरुरीचं असतं, तसं मनभरून प्रेम करणं ही शिकावं माणसानं.
जसं मानात राहणं जरूरीचं असतं, तसं मनात राहणं ही शिकावं माणसानं.
-------------------------------------------

जगात आणि जीवनात सर्वच गोष्टींवर  मर्यादा आहेत ...वेळेच्या, वयाच्या, वागण्याच्या ....
फक्त एका गोष्टींवर मर्यादा नाही, तरी ती गोष्ट फार कमी माणसांना करता येते. "चांगला विचार करणे".
आपण त्या कमी माणसांमध्ये असावं आणि नेहमी बसावं.
-------------------------------------------

आपली वाट लावण्याची प्रवृत्ती नसली तरी चालेल, पण वाट बघण्याची जरूर असावी. कारण वाट बघण्यातच सयंमाची खरी परिक्षा असते.
-------------------------------------------

* गरज नसते.........*
सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथ विधीची गरज नसते.
नदीला वाहण्यासाठी कोणत्याही वाटेची गरज नसते.
जे स्वतः वर विश्वास ठेवतात त्यांना नसीबाची गरज नसते.
मेहनत करून पुढे जाणाऱ्यांना कोणत्याही रथाची गरच नसते.
-------------------------------------------

*बदल*.....
एक काळ होता जेव्हा नजरेला नजर मिळाली आणि इशारा झाला की प्रेम व्हायचं.
आजही नजर आहे पण *बदल* एवढाच की .....त्या नजरेनं आता समोरच्याचं सौंदर्य आणि संपत्ती पाहीली जाते.

मनोगत...

माणसं स्वतःला का बरं नटवतात ?

खरंतर.... माणसानं आपलं शाश्वत सौंदर्य कृत्रिम साधनांनी नटवू नये. अन् क्षणभंगूर साजात स्वतःला  कोणाला भेटवू नये.
कारण साज उतरला की, शरीराची मुद्दल आणि व्याज ही कमी होत. त्यापेक्षा.. मनांच्या भेटी व्हाव्यात,
कारण मनाला साजाची गरजच भासत नाही. अर्थात ... ज्यांना जाणीव नसेल त्यांच्या डोळ्यानां मन दिसत नाही.
जर मानाला नटण्याबद्दल उत्सुकता नाही... तर माणसं स्वतःला का बरं नटवतात कळतं नाही.
---------------------------------------------

विश्वासाला डोळे असते तर तो वेळोवेळी त्याला फसवताना माणसानं विचार केला असता.
पण.. माणसांच्या व्यवहाराच्या नात्यात माणसानं विश्वासालाच सोईस्कर वापरलं आहे.
माणसानं जाणीव ठेवली पाहीजे..... विश्वास म्हणजे विचारांचा श्वास - विचार शाश्वत असला की , श्वास नात्यालां निरंतर जपून ठेवतो.
-----------------------------------------------

बालपण , तारुण्य ह्या सर्व अवस्था म्हणजे फोटोफ्रेम आहेत. म्हणूनच जशी फ्रेम ची काच फूटली की माणसं  काच बदलंत नाहीत तर फ्रेमचं टाकून देतात.
अगदी या अवस्थाचं ही असंच असतं...या अवस्थाच्या फ्रेममधील सौंदर्य नावाची काच फूटली तर माणसं या अवस्थातील आठवणींची जाणीव ही फेकून देतात.
-----------------------------------------------
* विचार * 
* एवढा तिरस्कार ही करु नका कोणाचा की, चुकून प्रेमचं नकळत हरवून बसाल. आणि एवढं प्रेम ही करू नका कोणावर की, एक दिवस स्वतःच फसाल.
* प्रेम मायाजाळ आहे , त्याचा मोह आवरता येत नाही.... हे जरी खरं असलं तरी समोरच्याला आणि स्वतःला सावरता आलं पाहीजे.
* पक्षी आणि प्राणी निसर्गतः स्थलांतर करतात परंतु आपला रहिवास सोडत नाहीत. माणसं थोडसं वेगळं काही दिसलं तरी आपलं सहज विसरून जातात. अर्थात ...... म्हणूनच माणसाला समाधान मिळत नाही.
* कृञिम रंगाने रंगविलेल्या चेहऱ्याच्या मोहात फसावं की निरागस मनाच्या डोहात असावं....हे ज्याचं त्यानं ठरवावं.
* त्या दिवशी एका तरूणानं मला विचारलं " सर मला करिअरसाठी असं एखादं क्षेञ सूचवा ज्यानं माझं नाव मोठ होईल आणि ज्या क्षेञात जास्त स्पर्धा नाही. मी मनापासून त्याला उत्तर दिलं ...."माणूसकी".
* एकदा प्रत्येकानं स्वतःला विचारावं , आपण खरोखर आदर्श आहोत का ? उत्तर नक्कीच नाही येईल. पण तरीसुद्धा तुम्हांला असं वाटतं की तुम्ही आदर्श होऊ शकता , तर कोणचं अनुकरण करु नका.
* जरूरीचे नसतं...सगळ्यांना आपण आवडलो पाहिजे. क्षणभंगूर वचनं देऊन देणाऱ्यापेक्षा नात्याला जाणीवपूर्वक जपणारं कोणीतरी असणं आवश्यक असतं. ऊगाच तोंडदेखलं सुख देणारं कोणी ....जरूरीचे नसतं.
* मनाला वाटतं तसं वागता आलं पाहीजे , प्रत्येकाला स्वतःसाठी ही जगता आलं पाहीजे. सगळं काही धनानं मिळवता येत नाही , अन् सगळ्यांनाचं मनासारख वागता येत नाही.
* आवडत्या व्यक्तीला स्वतःच करताना किंवा स्वतः आवडत्या व्यक्तीचं होताना........ आपल्या भावनांचा प्रदर्शन करू नका.
* कधीतरी आपणही कोणाचे सोबती बनावं....कारण जेव्हा आपण एकटे असू तेव्हा त्याची सोबत मिळतेच. सकाळ झाल्यावर माणसांचा बाजार भरतो त्यात आपलही कोणीतरी असावं अशी इच्छा असल्यास आधी आपण कोणाचं तरी असावं.
-----------------------------------------------

कधी अचानक आपल्या माणसाची आठवण का येते ?
आठवण म्हणजे आपल्या मनाच्या नेणिवेतून झालेली जाणीव. आठवण त्याच माणसांची येते ज्यांनी आपल्या मनात जागा केलेली असते.
आठवण म्हणजे मनाच्या झर्याला आलेला पाझर, जो अश्रूद्वारे बाहेर येतो.
कधी सुखद तर कधी दुखद, पण दोन्ही वेळा खारटंच. अर्थात ..... आठवण म्हणजे मनातील इच्छा.
-----------------------------------------------

प्रत्येक माणसाच्या जीवनात असा एक दिवस असतो जेव्हा त्याच्यासाठी जमलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात प्रेम असतं आणि चांगले विचार असतात.
पण त्याचा आनंद तो माणूस घेऊ शकत नसतो......तो दिवस म्हणजे " मृत्यू ". मला कळत नाही एखादा व्यक्ती जिवंत असताना लोक त्याच्यासाठी का एकञ येत नाहीत.
-----------------------------------------------

आपण कशासाठी जगतोय ? 
असा साधा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर उत्तर देणं फार अवघड आहे.
कारण काहीतरी मिळवायचं किंवा काहीतरी करायच या प्रयत्नात नक्की काय मिळवायचं किंवा करायचं हा साधा विचार करणं ही आपण विसरतो.
-----------------------------------------------

जेव्हा आपण स्वतःला सावरू शकत नाही आणि समजू शकत नाही... तेव्हा आपल्याला अलगद सावरतं आणि सहज समजतं ते खरं "नातं".
अशा अलौकिक सत्वाला नावामध्ये बांधणे चुकीचं होईल. नातं दिसत नाही आणि भासत ही नाही ते सहवासात अनुभवावं लागतं.

* सुंदर विचार *

* जी माणसं बदला बरोबर बदलतात...ती यशस्वी होतात...जी माणसं बदला नंतर बदलतात...ती जगतात...जी माणसं बदल घडण्यास कारण असतात...ती नेतृत्व करतात.
* प्रत्येक माणसाचं व्यक्तीमत्व त्याच्या विचार आणि कृती यामधून प्रकट होत असतं. त्याकडे आपलं लक्ष नसलं तरी इतरांचं बारीक लक्ष असतं.
* खरचं जेवढं वाटत तेवढं आयुष्य सहज नसतं. येणाऱ्या क्षणानां सांभाळून स्वतःला सावरता आलं पाहीजे.
आपण कोणाचे आहोत हे वेळ दाखवते. फक्त जे ती दाखवेल ते स्विकारत जगता आलं पाहीजे.
* गर्दीत आपल कोणचं नसलं तरी आपल्याला एकटं वाटत नाही. पण आपल्यांमध्ये असूनही एकटं असणं यासारखं ञासदायक आणि दुःखाची वेळ कोणतीच नसते.
एकटेपण हे खूप काही शिकवतं.
* परिस्थिती कशीही असो, माणसाला वेळेबरोबर राहता आलं पाहीजे. आज कळलं जेव्हा कोणीही बरोबर नसतं तेव्हा वेळेला सोबत ठेऊन आपण आपलं असणं जरूरी असते.
* आपल्यानां जपण्यास, त्याच्यासाठी जागण्यास आणि जगण्यास मनाची आवश्यकता असते. कारण व्यवहार करण्यास धनाची आवश्यकता असते.
एखाद्या विचारानं भारावून जाणं जरूरी नसतं तर त्याला कृतीत आणून जोपासनं महत्त्वाचं असतं.
* चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं सहज समजत नाहीत. त्यांना मनापासून वाचावं लागतं आपल्या सहवासात ठेवावं लागतं.
* ज्यावेळी माणूस स्वतः च्या  स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.
त्या कार्यामुळे समाजात ती व्यक्ती प्रभावी ठरते. निरपेक्ष भाव, मनःशक्ती आणि एकनिष्ठता यामुळे आपण योग्य कार्य करू शकतो.
* आपण जर आपल्या पलिकडे जाऊन  आपल्या माणसांसाठी जगलो तर जीवन सार्थक होते. अस्तित्व प्रत्येकाला हवे असते फक्त मार्ग निवडता आला पाहिजे.
* माणसाला स्वार्थ त्यागता येत नाही आणि जाणीवपूर्वक वागता येत नाही.
* जी माणसं तुमच्याबरोबर मनापासून बोलतात त्यांना मेंदूने उत्तर देऊ नका. जे कपटी विचार ठेवतात त्यांना मनात जागा देऊ नका.
* Solid असतात संबंध... तरी liquid सारखे वाहून जातात कधीकधी. बेधुंद असतात सबंध... म्हणूनच कधी करू नये त्याचा छंद.
* अपेक्षा किती  विचित्र गोष्ट  आहे, पूर्ण  झाली नाही तर *क्रोध* वाढतो. आणि... पूर्ण  झाली  तर *लोभ* वाढतो.
---------------------------------

त्या दिवशी देव ही वैतागला होता वाटतं.... 
एकदम प्रगट झाला आणि म्हणाला " अरे नेहमी काहीतरी मागणं घेऊन येता,
कधीतरी मनानं पण या ना ! कदाचित देव विसरला असेल बहुतेक माणसं व्यवहारानेच संबंध ठेवतात.
------------------------------------

बावरुन जाऊ नये , 
जर आपलीच माणसं स्वतःला सावरुन वागताना "नातं" नावाची अदृश्य गोष्ट विसरली असतील.
एखाद्याला फक्त शब्दांनी जिकंण सोपं असतं , त्याला जाणीव ठेऊन जपणं कठीण असतं.
--------------------------------------

अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी, भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..
झाली चूक माफ करण्यात मोठेपना असतो, सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात...
म्हणुन चुका एकांतात सागांव्यात आणि कौतुक चारचौघात करावं नातं जास्त टिकतं.!
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती, ताकदवान नसतो. पडलेल्यांना उचलणारा आणि सावरनारा व्यक्ती,
खरा ताकदवान असतो, अहंकार वाऱ्यावर उडून जातो , कायम टिकणारी गोष्ट एकच,
ती म्हणजे; चारित्र्य आणि माणुसकी. यांना  टिकविण्यासाठी जाणीव महत्वाची.
---------------------------------

डोळ्यांत अश्रू का येतात ?
माणूस आनंदाच्या डोहात बुडून त्याचा मनात अंहकार वाढू नये. तसेच दुःखाच्या नदीत गुदमरून त्याच्यात नैराश्य येऊ  नये ,
यासाठी मनरूपी महासागरातून उगम पावनारी अश्रूंरूपी नदी विध्यात्याने निर्माण केली आहे.
ज्यामुळे अती आनंदात आणि दुःखात अश्रू डोळ्यांमधून बाहेर येतात. अर्थात... ते मनरूपी महासागरातून येतात म्हणूनच ते खारट असतात.
जसे मीठ जेवणात चव आणते तसेच मनरुपी खारट महासागर जीवनाला चव आणतो.
म्हणूनच मनात आनंदरूपी अती गोडवा किंवा दुःखरूपी तिखटपणा वाढू नये यासाठी अश्रू डोळ्यांमधून बाहेर येतात.
---------------------------------

तेव्हा माणसं हळूहळू मरतात...
जेव्हा एकांतांत स्वतःला नैराश्यात ठेवतात. तेव्हा माणसं ...
जेव्हा एकनिष्ठ न राहता कोणाची फसवणूक करतात. तेव्हा माणसं....
जेव्हा एखाद्याचा अनावश्यक तिरस्कार करतात. तेव्हा माणसं...
जेव्हा स्वार्थीपणात एखाद्याच्या भावनांशी खेळतात. तेव्हा माणसं ...
जेव्हा जाणीव विसरून आपल्यानां विसरतात. तेव्हा माणसं ...
जेव्हा मनाला मारून मेंदूच्या आहारी जाऊन नाती तोडतात. तेव्हा माणसं...
---------------------------------

माणसाच्या लायकीपेक्षा जास्त अपेक्षा वाढतात तेव्हा त्याला नैराश्य मिळते.
अर्थात स्वप्न नक्की पहावी , पण त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती आवश्यक असते.
अपेक्षा या जागेपणी केलेल्या असतात म्हणून त्यांना मर्यादेत ठेवता येऊ शकते.
स्वप्नाचां जन्मच मनाच्या नेणिवेतील कप्प्यातून होतो त्यामूळे त्यांवर मर्यादा घालता येत नाही.
---------------------------------

एकदा वाघ भावनिक झाला अन् माणसात आला... माणसांनी त्याला मांजरासारख खेळवलं.
चूक माणसांची नसते, त्यांची प्रवृत्तीच खेळण्याची असते. वाघानं आपली ओळख ठेऊन जगलं पाहाजे होत.
अर्थात ....... आपली जागा सोडल्यावर मान राहात नाही, कारण सगळ्यांना मन कळत नाही.
वेळेने सांगितलं आहे... मनानं जग अन् पून्हा वाघ बनून बघ.
---------------------------------

घरात मोठ कुणीतरी पाहीजेच..

पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी (वयस्कर) माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा. कुठल्याही कार्याचा श्रीगणेशाय करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा निर्णय अंतिम असायचा, ते म्हणतील तीच पुर्व दिशा सगळे निमुटपणे मानायचे व त्यांचा आदेश कृतीत आणायचे. त्यामुळे घरातील देवघरानंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील मोठ्यांचे...! आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागला. स्वयंपाकखोली काय अन्  देवघर काय सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली. मोठी माणसं नाहीसी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक, शिस्त, संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहील्या आहेत. पूर्वी ह्याच गोष्टी, चालिरिती घरातील मोठी माणसे सांगायची...म्हणून...

घरात मोठी माणसे पाहीजेच...
संध्याकाळी दिवे लावणीला शुभमकरोति- रामरक्षा चा सूर कानावर पडलाच पाहीजे. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहीजे. रात्रीच उरलेल अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी-तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणार कुणीतरी पाहीजे. मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारे कुणीतरी पाहीजे. चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला घरात कुणीतरी मोठ पाहीजे हो..एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं...टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण का करावं यामागच कारण उत्तमरित्या पटवून देणारं... बाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं...आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणार तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणार...खरच घरात कुणीतरी मोठ पाहीजेच.
पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर...आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर...
लिंबू-मिरची ला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन...

एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबड मुख असू देत की कमी ऐकू येणारे कान...
कसं का असेना...सांगसवर करणारं घरात कुणीतरी मोठ पाहीजेच. ज्या झाडाला फळ-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसेल तरी निदान सावली तर देते, त्या सावलीत आपली अनेक कामे सहज होतात. घरातील मोठी-वयस्कर माणसं ही तशीच असतात...त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोक ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहीजेच.
घरात मोठ कुणीतरी पाहीजेच...
मनोगत...

काय बरं विचार करत असतात माणसं...

सगळ्यांमध्ये असूनही स्वतःमध्ये नसतात.
तेव्हा...सगळं काही अनपेक्षित घडत राहत आणि मन अस्वस्थ असतं.
तेव्हा...एखाद्या साठी सर्वस्व अर्पण करुन त्यांची जाणीव नसते.
तेव्हा...एकांतांत असताना विचारांचं वादळ मन उद्वस्त करतं.
तेव्हा...अन् ...मी हे असे लिहिलेले मनापासून वाचतील. तेव्हा.....
---------------------------------

एकटं राहण्याचे अनेक तोटे आहेत.. पण एकच फायदा आहे.
माणसाला स्वतःचे इतरांसाठी काय महत्त्व आहे ते कळते आणि आपल्याचे महत्व कळते.
माणसाच्या आयुष्यात एकटेपण नसावं, प्रत्येकाला कोणीतरी आपलं असावं.
---------------------------------

सगळं छान असतं..जेव्हा आपल्यावर  
कोणाचं तरी ध्यान असतं.
खरचं.... प्रत्येकाजवळ आपल्या "हक्काचं" कोणीतरी असावं.
अन् मी कुठंही असलो तरी माझ्या "अक्काचं" असावं.
---------------------------------

काल ठरवलं होत थोडसं स्वार्थी व्हायचं आणि मस्त बेफिकीर होऊन रहायचं.
पण.... गंमतच झाली आज सकाळ झाली तरी शब्दांना बेफिकीरपणे वापरण्याची चूक करता नाही आली.
---------------------------------

काहीजण म्हणतात माणूस एकटा येतो अन् एकटाच जातो. मलाही काल पर्यंत वाटायचे एकटेपण वाईट.
पण ..... प्रत्यक्षात जेव्हा माणसाबरोबर "कोण" नसतं तेव्हा त्याचं "मन" असतं.
मेंदूने एकटेपणाची भीती दाखविली तरी मन सोबतीचे धैर्य देते.
---------------------------------

कठीण असतं जे आहे ते स्विकारत जगणं. लोकं जरी बोलत राहीले काहीही मागनं.
जरुरी नाही सगळ्यांना पटेलच आपलं वागणं. परीक्षा असते वेळेने घेतलेली, आपल्या शब्दाला जागणं.
---------------------------------

नेहमीच सगळ्यांना हरवून जिकंण जरी छान असलं .....
तरी स्वतः  कधीतरी हरून जिकंण अविस्मरणीय असतं.
असं हरताना फक्त स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि समोरच्यावर आंधळा विश्वास असावा लागतो.
---------------------------------

* आपण सर्वच एका गोष्टीत खूप प्रामाणिकपणे वागतो, एखादी गोष्ट अप्रामाणिकपणे करायची असते तेव्हा.......
* आपण सर्वच एका गोष्टींवर जास्त विचार करत नाही, जी आपल्याला माहीत नसते......
* आठवणीत येणारे क्षण फक्त साठवून ठेवते मन. तसं मन सगळ्यांना दिलेलं आहे जन्मापासून. काही माणसांना जगता येत नाही मनापासून....
---------------------------------

जन्माला आलेला प्रत्येक जीव हा अशुद्धच असतो कारण तो एकजीव असला तरी दोन जीवांच्या संगम होऊनच निर्माण होतो.
मग ज्यात दोन गोष्टींची भेसळ आहे ते शुद्ध कसे असू शकते ?
तसं प्रत्यक्षात काहीच शुद्ध नसते, स्वतःला वेगळं दाखवण्यासाठी ते माणसाच्या विचारांचं युद्ध असते.
या ब्रम्हांडात प्रत्येक गोष्ट ही कशा ना कशाच्या संयोग किंवा मिश्रणातून बनली आहे. साक्षात मानवी देह हा अनेक सुक्ष्म जीवाणू आणि विषाणू यांनी व्यापलेला आहे.
तो नाशिवंत आहे. मग शुद्ध ते काय ?  "वेळ" आणि माणसाचे "मन" केवळ शुद्ध असू शकते.
पण त्याचीही शुद्धता मोजण्याचं माप नाही. अर्थात .....कोण किती शुद्ध आहे आपआपल्या मनात हे ज्याचे त्यालाच माहीत  असते.

--------------------------------------------------

कधी कधी वाटतं संशोधनानं विजेच्या ताराद्वारे जग जोडलं , पण माणसाचं माणसाशी नातं तोडलं.
हातात टच चा मोबाईल असूनही एकमेकांच्या मनाशी टच नाही. सगळ्यांना वाचा (तोंड) दिलेलं असूनही फक्त व्यवहारी सिम्बाँल आणि स्माईली  यातच नातं राही.
मनात भाव नसेल तर आपूलकीचा गाव कसा दिसेल. शुभेच्छा देखील उस्टया किंवा भाड्याने घेतलेल्या,
कोणाच्या तरी ताटातील ( मोबाईल ) आपल्या ताटात टाकलेल्या...अर्थातच शिळ्या. हरवलेली माणसं आणि नाती शोधायची सोडून जो तो "पोकीमाँन" शोधतो आहे.
अहो.... मोबाईल मुव्ही बघताना आणि "कँडी क्रँश " खेळताना  आपण स्वतःच क्रँश झालो आहोत याच ज्याना राहीलं नाही भान,
कशी असेल त्यांच्यात नात्याची जाणं?
---------------------------------

आपण कशासाठी जगत असतो या प्रश्नाला उत्तर देताना बराच विचार करावा लागतो...
अर्थात उत्तर फारच सोपे असते. पण आपल्याला देता येत नाही.
कारण जन्म एवढा सहज नाही की तो शब्दात बांधता येईल.
माणूस स्वतःला ओळखत नसला तरी त्याचे कर्तुत्व त्याची ओळख जगाला करून देते.
---------------------------------

मला एकदा एकजण उपहासात्मक बोलला... तुला जीवनाकडे सकारात्मक  ( positive ) बघता आले असते तर आज तूही संसार करू शकला असतास.
मी म्हटले बरोबर आहे तुझं... मी सकारात्मक विचार कधीच केलेला नाही कारण माझ्या कृतीशील ( practical ) विचारांचा अंदाज सर्वांपेक्षा वेगळा होता.
मी सगळ्यांपेक्षा वेगळा राहाण्यातचं खूष आहे. तीच माझी ओळख आहे म्हणूनच तर तू आता माझ्याबरोबर हा विषय बोलतोयसं.
नाहीतर तुझ्यासारखे सकारात्मक विचाराचे भरपूर आहेत.
---------------------------------

मला नाही वाटत मी कोणासारखं तरी व्हावं आणि असं तर जराही नाही पटत की कोणीही माझ्यासारखं व्हाव.
ज्यानं - त्यानं आपआपल्या जागेवर कोणासाठी तरी मनात जाणीवपूर्वक असावं आणि कर्तव्यात एकनिष्ठ असावं.
असं जगावं की की कोणीतरी प्रत्येक क्षणात आपल्याला मागावं , समोरच्यानं न मागता आपण त्याच्यासाठी सर्वस्व त्यागावं.
---------------------------------

राञ का होते... असे एकदा मला माझ्या मेंदूने विचारले.
मी म्हटले तु दिवसभर सैरवैर आपल्यानां विसरून अनेकाच्या मोहात अडकतोस. कधी स्वतः फसतोस तर कधी कोणाला तरी फसवतोस.
मनाचे काहीएक न ऐकता सगळं स्वतःचे खरं करत असतोस म्हणूनच वेळेने राञ घडवून आणली आहे. राञी तू झोपलास की मन आपल्यानां भेटतं,
जे तुझ्या वागण्यानं नकळत दुखावले असतील त्यांना समजावून येत. कोणी एकटं रडत असेल तर त्याचे अश्रू पुसून येतं.
तू विस्कटलेलं सगळं आवरून येतं. असो हे तुला कळणार नाही... कारण तुला मनाच्या जागेवर कधी जाता येणार नाही.
---------------------------------

मनावर दिवसा राज्य करण्यासाठी मनःशक्ती, मनःस्थिती आणि मनोकामना या मनःपूर्वक असल्या की मेंदूची मती या मनाच्या ञिमूर्ती पुढे जात नाहीत.
या ञिमूर्ती म्हणजे साक्षात "दत्तगुरू" आहेत.
---------------------------------

नेहमीच भावनांचे लाड नाही करायचे, प्रेम देखील व्यवहारानेच करायचे...
असे मला लहानपणापासून नेहमी वाटायचे. जेव्हा कळलं की भावनांना मनात ठेवायचं असतं आणि प्रेमाला मनाच्या सुरक्षित कोपऱ्यात ठेवायचं असतं.
तेव्हापासूनचं भावनांनी भरलेल्या प्रेमळ नात्यांनां मी जपायला लागलो आहे. म्हणूनच आपलं नातं अतुट आहे.

मनोगत......

एकटाच होतो तर वेळ बोलली ....

थोडा वेळ देशील मला, थोडसं बोलायचं आहे.
मला लाज वाटली की वेळेला विसरण्या इतका मोठा झोलोय की मनाने खोटा झालोय.
तिनं लगेचच ओळखलं आणि मला जवळ घेत म्हटलं " मी तुझ्यासोबतचं आहे तरी तू स्वतःला सावरून रहा...
स्वतःच्या मनाला आवरून रहा. तुझं मन माझ ऐकत नाही, आणि तुला असं एकटं निराश पडलेलं मला पाहवत नाही.
नेहमी प्रमाणे तीला काहीतरी उत्तर देणार त्याआधीच तीनं मिठीत घेतलं. मला पण भरून आलं...
डोळ्यातलं पाणी मनाविरूद्ध  बंड करून गेलं. डोळे भरलेले पाहून वेळ म्हणाली.... फक्त हरवून जाऊ नकोस,
आपलं कोणी नसतं तेव्हा आपण स्वतःचं व्हायचं असतं. आता थोडी भावनिक झाली होती...
म्हणाली, "तु नेहमी हसत रहावं वाटतं, तुला एकटं पाहून मन माझं दाटतं.
"मला ही स्वतःला आवरता आलं नाही. मी म्हटल अशी कधीतरी येत जा, मला धीर देत जा.
फक्त बघत होती ..... जणू डोळ्यात भरून मला निघत होती.
------------------------------------

त्या दिवशी एकाने मला उपहासाने विचारले.....
काय आठवण .... आठवण बोलतोस नेहमी.
काय अर्थ आहे या शब्दात....मी सहज सांगितले ....
अर्थ कळण्यास आपल्याकडे कोणीतरी स्वतःच मनाचं आणि मानाचं असं  'एक ' माणूस असावं लागतं ज्याची.
कारण त्याचीच काढतो आपण ....आठवण म्हणजे = आठव + वण ( एक ).
--------------------------------

विचार करतो मी कधी कधी की माणूस जन्माला एवढं सिरयसली का घेतो....
इथून जिवंत कोण जाणार आहे. आपण आज आहोत तसेच उद्या खरंच राहणार आहे का ?
--------------------------------

एक काळ होता माणसाचं मन मायेच्या शब्दांनी भरायचं.
आजही मायेने भरतयं..... फक्त मायेच रूप बदललं आहे.
--------------------------------

माणसं गरीब-श्रीमंत असतात.
काळी-गोरी असतात.
लहान-थोर असतात.
भोळी-भामटी असतात.
आडानी-हुशार असतात.
कपटी-निरागस असतात.
पण.... सगळ्यांना दिवसाचे तास माञ २४ असतात.
--------------------------------

ज्या जखमेतून रक्त येत नाही ती जखम आपल्यांनीच दिलेली असते.  
बरं आहे अशा जखमा सहज दिसत नाहीत त्यामुळेच कोणी या जखमांवर हसत नाहीत.
दोष जखम देणाऱ्याचा नसतो, आपणच उगाच वेड्यासारखे जखमा करुन घेत असतो.
--------------------------------

कशी कशी माणसं जीवनाच्या वाटेवर मिळतात....
काही एखाद्या वळणावर सोबत सोडून वळतात....
काही शिषिरातील पानासारखी ओळख विसरून गळतात....
काही निरागस मनाला जखमा देऊन बिनधास्त छळतात....
काही तर स्वतःची पोळी भाजून सोईने दूर पळतात....
काहीं बरोबर आपण निस्वार्थी राहीलो तरी स्वार्थी खेळतात...
काहींशीच मनाचे धागे अतूट आणि अलगद जुळतात...
फक्त आपल्यानांच मनातील दुःखाची वादळ कळतात.
--------------------------------

आजचा थकवा घालवण्यास आणि उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो.
पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका......
--------------------------------
माणसाला ....
जे मिळत नाही, त्याला तो व्यर्थ समजतो.
जे त्याच्याकडे आहे त्यात तो नेहमी अर्थ शोधत असतो.
जे सहज मिळत त्याची किंमत कळत नाही, जे त्याचे नसते ते चुकूनही त्याच्याकडे वळत नाही.
काही नसलं तरी जाणीव असली पाहीजे, आपले सोबत नसल्याची उणीव भासली पाहीजे.
--------------------------------

मी हल्ली पुस्तकं नाही,
माणसंच वाचतोय !
पुस्तकं महाग झालीयत, माणसं स्वस्त. शिवाय,
सहज सगळीकडे उपलब्ध असतात माणसं.
बरीचशी चट्कन वाचून होतात,
कधी कधी मात्र खूप वेळ लागतो समजायला.
काही तर आयुष्यभर कळत नाहीत !
सगळ्या साईजची सगळ्या विषयांची.
छोटी माणसं, मोठी माणसं,
चांगली माणसं, खोटी माणसं.
आपली माणसं, दूरची माणसं,
दूर गेलेली माणसं, जवळची माणसं.
दु:खी माणसं, कष्टी माणसं
कोरडी माणसं, उष्टी माणसं
बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं
निमग्न, तिरसट, मूडी माणसं.
पाठीवर थाप मारणारी, हातावर टाळ्या मागणारी,
थरथरत्या हाताने, घट्ट धरून ठेवणारी.
मोजकं बोलणारी कविता-माणसं,
कादंबरीभर व्यथा माणसं.
सतत खोटी वचनं देणारी माणसं,
काही एकनिष्ठ जाणीवपूर्वक माणसं.
पुस्तकांचं एक बरं असतं,
कितीही काळ गेला तरी,
मजकूर कधी बदलत नाही,
माणसांचं काय सांगू,
वेष्टन, आकार, विषय, मजकूर सारंच बदलत
शेवटी वाचायला माणूसच उरत नाही.
तरीही अनेक जणात असतो मी,
माझी माणसं मनात ठेवतो.

मनोगत ...

सारेच म्हणतात मला....

तुझं बरं आहे कसली चिंता नाही, नेहमी हसत असतोस.
कारण लोकांना कळत नाही हसत हसत मी चिंतेलाच लपवत असतो.
खूप पुढं आलोय वेगळं वळण घेऊन. मागे राहीले सारे कुळाच्या नावाचे, सोबत आहेत आता फक्त जोडलेले जीवाभावाचे.
खरं आहे जोकर बनून मी नेहमीच हसवत नाही. पण मन मोडून कोणाचं कोणालाही फसवत नाही.
काहीजण बोलून गेले, की मी कर्तव्यदक्ष नाही. पण खरं तर आजही माझं तुमच्याशिवाय कोणावर  लक्ष नाही.
कळत नाही कधीकधी मी नक्की काय मिळवतोय की शोधतोय.
एवढा  माञ विश्वास आहे मी नेहमी समाधानी जगतोय.
--------------------------------------------

मला कधीच वाटत नाही, की मला ओळखावे सर्वांनी.
समाधान यातच आहे माझ, की ओळखल मला तुमच्या सारख्या देव माणसांनी.
चांगल्यानी चांगला म्हणून आणि वाईटांनी वाईट म्हणून स्विकारलं, ज्याची जेवढी गरज होती त्यांनी तेवढ्या पुरतं वापरलं.
मी नाही म्हटलं कधी, की मी शुद्ध तरू आहे. कारण स्वतःला पविञ करण्यास येथे अनेक पापी माणसांचे युद्ध सुरू आहे.
नेहमी वाटतं मला, की सर्वांनी मोठं व्हावं. फक्त हवेत न वाहता जमीनीवर रहावं.
राग आणि वादळ या दोन्हीमध्ये एकच विशेष असतं...
शातं झाल्यावरचं काय नुकसान झालं ते दिसतं.
-------------------------------

मजबूत हातातून ही बोटं सूटतात कधीकधी ......
नातं ताकतीच्या जोरावर बनत नाही तर विश्वासाच्या नाजूक दोरावर बांधलं जातं.
-------------------------------

कोणीतरी आपल्याला  एवढं अलगद सांभाळून घ्यावं ...
की ते आपणांस सहज न कळावं.
असं मायेच प्रेम शेवटच्या श्वासापर्यत मिळावं...
-------------------------------

काय solid असते ना कोणीतरी आपल्याला आवडनं...
सगळ्यांना सोडून आपण त्या व्यक्तीला निवडणं.
-------------------------------

ते क्षणच भारी असतात...
जेव्हा आपलं मन आपल्याजवळ असूनहीआपलं नसतं.
कारण वेड म्हणजे ...वेड म्हणजे ...वेड असतं.
तुमचं आणि आमचं रोज रेड असतं...
-------------------------------

"परिवर्तन" हा निसर्गाचा नियम आहे, तो स्विकारता आला पाहिजे.
"संघर्ष" हा जीवनाचा नियम आहे, तो निडरपणे करता आला पाहिजे.
"विश्वास" हा नात्याचा नियम आहे, तो नचुकता टिकवता आला पाहिजे.
"प्रेम" हा माणूसकीचा नियम आहे, तो निस्वार्थीपणे करता आला पाहिजे.
-------------------------------

जीवनातले सर्वात महत्वाचे दिवस....
पहिला...
ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला.
आणि
दूसरा...
ज्या दिवशी तुम्हाला समजले की तुम्ही का जन्माला आला.
-------------------------------

काही नाती पाण्यासारखी असतात...
रंग नाही...आकार नाही...ठिकाण नाही....
तरीही जीवनासाठी महत्वाची असतात.
-------------------------------

माणूस नेहमी काहीतरी Wish करत आसतो....
त्याला कधी Fish होऊन जगता येत नाही...
पण Selfish होऊन सहज जगतो.
-------------------------------

EGO हा फक्त तीन अक्षरी शब्द.....
RELATIONSHIP या बारा अक्षरी अभेद शब्दालाच तोडत नाही....
तर सर्वकाही उद्वस्त करून एकटेपण देतो.
-------------------------------

सत्याची साथ देणारे नेहमी एकटेच राहतात .
कारण...... सत्य नेहमीच कडू असतं.
-------------------------------

मला थोडा वेगळा विचार करायला आवडतो...
माणसं चागल्या वाटेने चालणं पसंत करतात, मी योग्य मार्ग निवडतो.
मला याचं दुःख नाही वाटत की हे जग वाईट माणसांनी भरले आहे,
फक्त चांगल्याना साथ देणारे कमी उरले आहेत.
--------------------------------------

जेव्हा कधी...स्मशानात एखादी मृत्यूशैया किंवा कबर पाहतो...
तेव्हा विचार करतो. एवढीशी जागा मिळवण्यासाठी माणूस जन्मभर काय काय करतो.
----------------------------------------------

मला एका गोष्ट आजही कळत नाही, दिवस राञ शोधूनही सूर्याला त्याची जागा मिळत नाही.
मग आपण आपली जागा का बरं सहज सोडतो, मनाची नाती संशयाने तोडतो.
----------------------------------------------

कोणाच्याही आयुष्यात एखादी जागा सहज मिळत नाही.
मिळालेली किंवा मिळवलेली जागा कशी जपावी हेच कधीकधी माणसांना कळत नाही.
----------------------------------------------

धरता येत नाही आठवनीनां, नाहीतर एकञ साठवलं असतं,
मन जर पाखरू असतं तर आता लगेचच तुमच्याकडे पाठवलं असतं.
----------------------------------------------

आपण सारे किती हुशार वागतो.
स्वतःचा मुड असेल तर हास्याचे तुषार टाकतो.
नाहीतर.....स्वतःच्या सोयीने समोरच्यानां सहज.......टाकतो.
----------------------------------------------

बरं आहे मन दिसत नाही आणि त्याला Decorate करता येत नाही.
कारण मनावर कोणताही Research झालेला नाही आणि त्यामुळे तशी काँसमेटिक्स बाजारात उपलब्ध नाहीत.
----------------------------------------------

"मन" म्हणजे मधुर नशा......नको असली तरी होणारंच.
मन जसं आहे तसचं एवढं सुंदर असते की त्याला कोणत्याही Decoration ची गरज नसते.
----------------------------------------------

मला वाटतं काहीतरी बिघडलं आहे...
माणसाच्या मुखातील गोडवा कमी झाला अन् Blood sugar चं प्रमाण वाढलं आहे.
मला वाटतं ...
ह्दयातील निरागस प्रेम आटलं आहे आणि ज्याला त्याला Heart aatack नं गाठलं आहे.
मला वाटतं...
--------------------------------

असं लिहत असताना....मन असं भरून येत.
भूतकाळातील कडू आठवणी विरूद्ध जबरदस्त  बंड करून येतं.

मनोगत....

नेहमीच गरुड भरारी जरुरी नसतं...

कधीकधी चिमणीसारखे समाधानी ही जगता आलं पाहीजे.
नेहमीच मोरासारखा तोरा दाखवून राहणे जरुरी नसतं ....
कधीकधी कावळ्यासारखं स्वतःवर प्रेम करत ही जगता आलं पाहिजे.
नेहमीच मांजरासारखे डोळे मिटून दूध पिणे चांगलं नसतं...
कधीकधी इमानदार कुञ्यासारखं जिथं खाल्लं तिथं एकनिष्ठ ही राहता आलं पाहिजे.
---------------------------------------------------------------

नेहमीच पुस्तकात सगळं शिकता येत नाही....
माणूस .....पक्षी आणि प्राणी यांच्याकडूनही बरचं काही शिकू शकतो....
फक्त शिकण्याची प्रवृत्ती जरुरी आहे.
---------------------------------------------------------------

शरीर आणि मन यामधील एक विशेष  म्हणजे ....
शरीराला कोणीही धक्का देऊ शकतं. पण.....
मनाला तेच धक्का देतात जे मनात असतात.
---------------------------------------------------------------

प्रेम म्हणजे मौसमी झरा...
अर्थात ...झरा जसा भूगर्भात पाणी असे पर्यंत खळखळतो.
तसंच प्रेमही मनात निरागस भावना असेपर्यत दाटत.
पाऊस संपल्यावर जसा झरा आटतो, तसंच भावनांचा पाऊस संपला की प्रेमही आटतं.
पण फरक एवढाच की...."झरा" आजही जमिनीशी एकनिष्ठ आहे.
फक्त "प्रेम" मन सोडून मेंदूच्या आहारी जाऊन व्यवहारी झाले आहे.
------------------------------------------------

असं काही तरी व्हावं...
ज्यांना आपण आवडतो त्याचं मन आपल्या मनात यावं.
उत्कंठ प्रेमाच्या भावनांना आपण न्याहळून पहावं.
अन्... नातं निशब्द रहावं.
------------------------------------------

काही माणसं फारच भोळी वागतात... 
पण स्वतःची पोळी सोयीस्कर  भाजतात..
चेहऱ्यावर साधी दिसतात. पण मनात महा लबाड असतात.
तोंडाने साखरेसारखे गोड बोलतात..
पण स्वतःची चाल अचूक चालतात.
--------------------------------------------

एकदा असंच एकांतात ...स्वतःशीच बोलत होतो.
कोणालाही न उलगडायला दिलेलं, क्षणांची पानं  खोलत होतो.

एकदा असंच एकांतात ...स्वतःशीच बोलत होतो.
अचानक मन करुण झालं, डोळ्यांतून पाणी टचकण भरून आलं ....

एकदा असंच एकांतात ...स्वतःशीच बोलत होतो.
पुढच्या क्षणाला सगळं स्तब्ध, अन् मी निःशब्द...

हे पान फक्त माझं गुपित आहे, म्हणून आजही मनाच्या कुपीत आहे.
खरंच....मला असं वाटत.
प्रत्येकानं कधीतरी स्वतःशी बोलावं.. असं कुपितलं पान स्वतःसाठी खोलावं.
---------------------------------------------------------------

Make up अर्थात .... शृंगार या शब्दाचा अर्थ समजल्या पासून मी पाहतोय.
बहुतेक माणसं सुंदर दिसण्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि जीवाची ओढातान करत असतात.
पण मला वाटत खरी आणि शाश्वत  सुंदरता मिळवण्यासाठी कधीतरी आपण हे जाणलं पाहीजे की....

आपल्या चेहऱ्यावरचं तेज हे आपल्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.

मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.

मनातले भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
आपला चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.
खरी सुंदरता मिळवण्यासाठी ......
माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे, खळखळून हसलं पाहिजे,
दिलखुलास विनोद केले पाहिजेत, मनसोक्त रडलं पाहिजे !

थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.
त्यासाठी वाचन पाहिजे, चिंतन पाहिजे, खेळ पाहिजे.... हे सगळं जवळ असेल तरच चेहरा सुंदर बनतो.

मन शुद्ध आणि एकनिष्ठ असलं की चेहरा आपोआप तेजस्वी होतो.
सुंदर होण्यासाठी जणाचा नाही ..... मनचा आरसा वापरा. मनाचा आरसा नेहमी तुमची खरी प्रतिमा दाखवेल.
---------------------------------------------------------------

कधी वाटते ....
एक अशी बँक असावी....
सर्व नात्यांची जिथे रोज बचत करावी.
कधी वाटते...
एक असं मंदिर असावं ...
सर्व भावनांनी जिथे नेहमी शुद्धीकरण व्हावं.
कधी वाटते...
आपलंच कोणीतरी असं असावं...
ज्यात बँक आणि मंदिर एकञ असावं.
---------------------------------------------------------------

"अंदाज" चुकीचा असू शकतो , कारण तो आपल्या मेंदूचा अनिश्चित  विचारांचा वार असतो.
"अनुभव" बहुधा बरोबर असतो , कारण तो आपल्या जीवनातील निश्चित घटनांचा सार असतो.
---------------------------------------------------------------

स्वप्न जेव्हा तारखेसहीत लिहिली जातात, तेव्हा ती धेय्य होतात.
धेय्याला पायरी पायरीने जोडले की, नियोजन होते.
नियोजन कृतीत उतरवले की, स्वप्नपूर्ती होते.
---------------------------------------------------------------

नेहमीच वाटतं, 
जसं तुम्ही मला प्रत्येक क्षणात मनात ठेवता....
अगदी तसंच ....
तुम्हालाही फक्त मनातच नाही, तर ह्दयाच्या प्रत्येक ठोक्याला समोर ठेवावे.
पण तसं करता येत नाही...
कारण वेळेच्या पुढे जायला मला आवडत नाही...
---------------------------------------------------------------

जसं माणसाचं जीवन अवलंबून असत श्वासावर....
तसंच नातं अवलंबून असतं विश्वासावर.
जसा श्वास ह्दयापर्यत पोचल्यावर  ह्दय फुलंत अन् ...श्वास न पोचल्यास ते गूदमरतं.
अगदी  तसंच...विश्वास ह्दयात पोचल्यावर नातं फुलतं आणि विश्वास संशयात बरबटला तर ते विस्कटतं.
---------------------------------------------------------------

माणसं ही अजब वागतात...
समोर असलेल्या माणसावर अविश्वास करतात......
आणि ज्याला कधी पाहीलं नाही त्याला विश्वात्मा मानतात.
---------------------------------------------------------------

तुमच्या आठवणीत जगणं यासारखी दुसरी माजा नाही........
आणि.... तुमच्याशिवाय जगणं यापेक्षा मोठी सजा नाही.
---------------------------------------------------------------

स्वच्छ मनाच्या भांड्यात स्वप्नाचं आधण ....
त्यात चवीनुसार विचारांची साखर ...
मस्त सकारात्मक स्वादाचा आल्याचा तुकडा ......
कृतीशीलतेची दोन चमचे चहा पावडर ......
प्रयत्नांना मस्त उकळी फुटल्यावर
निग्रहाच्या ताज्या दुधात
संयमाच्या गाळणीतून गाळून
समाधानाच्या कपातून दोन घोट परिपुर्तिच्या आनंदाचे ....
असा फक्कड चहा उद्या सकाळी घेऊनच पहा…

मनोगत....

सगळं एका क्षणात संपवलं असतं...

सगळं एका क्षणात संपवलं असतं...
पण तसं करण्याइतकं मन कठोर राहील नाही....
तसं ते कधीच नव्हतं. मन जर तुमच्यात गूंतलेलं नसतं तर..
सगळं एका क्षणात संपवलं असतं. असा कसा गुंतंत गेलो ,
कधी तुमचा झालो काहीच कळलं नाही. जर हे कळलं नसतं तर....
सगळं एका क्षणात संपवलं असतं.
----------------------------------------------------------------

अफवा .....
तिरस्कार करणारे लोक निर्माण करतात.
अडाणी असलेले लोक त्या पसरवतात.
आणि
मूर्ख असलेले लोक त्या स्विकारतात.
----------------------------------------

मनाला समजून वागा....
त्याचा गोंधळ करु नका.
वेळे सोबत चला......
तिला बदलण्याचा प्रयत्न करु नका.
नात्यातील गैरसमज टाळा.....
त्यांना विस्कटू देऊ नका.
------------------------------------

शुन्यालाही किंमत देता येते.......
फक्त त्यापुढे एक होऊन उभे राहता आले पाहीजे.
--------------------------------------

घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच त्रास देतो.
गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा,
कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच मागे डोळे न देता पुढे दिले आहेत.
चांगले लोक आणि चांगले विचार  आपल्या बरोबर असतील तर वेळही तुमच्या सोबत राहील.
-----------------------------------------------------------------------------

गोष्टी आपल्या मर्जीनुसार झाल्या  नाहीत म्हणून नाराज नाही व्हायचं.
आपण आपल्या मनाचा राजा होऊनच राहायचं.
कोणाला नाही दिसलो, तरी आपण स्वतःला स्वतःच्या मनात पाहायचं.
कारण...
माणसाला स्वतःच्या हट्टापुढे आणि सोयीसाठी सर्व काही शून्य असतं.पण आपलं मन तेवढ सहज नसतं.
----------------------------------------------------------------------

नाते जुळने आणि जुळून येणे हे आपल्या विश्वासाचा पुरस्कार असतो.
नाते निरंतर टिकवून ठेवणे हा आपल्या त्यागाचा भाग असतो.
नाते घट्ट करणे हा आपल्या एकनिष्ठतेचा आणि काळजीचा भाग असतो.
---------------------------------------------------------------------

माझा मला राग येतो....
जेव्हा मी भावनांचा व्यापार करणाऱ्यानां नकळत बळी पडतो.
माझा मला राग येतो....
जेव्हा मी ऊगाचच माझ्या मनाला लबाड माणसांच्या संगतीत सोडतो.
माझा मला राग येतो....
जेव्हा माझ्या मनाला दुखवणार्यानां केवळ कर्तव्यापायी माझ्या सोबत पाहतो.
-----------------------------------------------------------------

आपण आरशात पाहिले की आपल्याला आपली प्रतिमा दिसते...
आपण तीला नटवतो पण काही वेळानं सगळं पुर्ववत प्रतिमेसारखं होत.
अन् आपल्याला राग येतो , ञास होतो किंवा दुःख होतं.
खरंतर , आपण त्या प्रतिमेचे खरं चिञ नटवलं पाहीजे. कारण जसं ते चिञ असतं तशी आरश्यातील प्रतिमा असते.
ते चिञ म्हणजे " मन ".... म्हणूनच मला वाटतं ' मनी असे ते चित्र दिसे '.
-----------------------------------------------------------------------
"जप"आणि "जप "
दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण
उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वत:ला सावरणे म्हणजे जप.
तरी पण त्यांचा संबंध खुपच जवळचा आहे .
आपण भगवंताची नाम माळ "ज प तो "
तेंव्हा भगवंत आपल्याला " ज प तो "
-----------------------------------------------
आज मेंदूने अचानक मनाला स्वतःच्या ताब्यात घेतले आणि मला प्रश्न केला ?
कशासाठी केला आहेस हा हट्ट आणि कशावरून जोडलेली नाती तुझी होतीलच घट्ट ?
थोडासा बावरलो.... कारण नेहमी मन सोबत असायचे त्यामुळे एकटेपण नसायचे.
आज अचानक त्यानं मला सोडलं होतं आणि मेंदूच्या  बेरकी तावडीत धाडलं होतं.
पण सगळ्यांना खेळायला लावणारी वेळ माझ्या सोबत होती... दोघांचाही डाव गुपचूप बघत होती.
मला अस्वस्थ पाहून लगेच सावरलं... त्या दोघांना एका उत्तरात आवरलं.
हा जे करतोय ते त्याचं कर्म आहे, माझ्या मिठीत येऊन आपल्यानां दिलेलं मर्म आहे.
हीच त्याची सुरुवात आणि यातच त्याचा शेवट आहे. हे ऐकून मेंदू मागे सरला अन् मानाने लगेच माझा हात धरला. म्हणालं.... खरंच .. " जे जपलं तेच आपलं ".
---------------------------------------------------------------------

बाप आणि मी.....
बालपणापासून तरूणाई पर्यत जवळ कधी बसलो नाही. एकाच घरात राहून आम्ही, एकमेकांसाठी कधी हसलो नाही.
कधी हरवला तेच कळलं नाही जिव्हाळ्याचा संवाद. नेहमीच एकमेकांस दोष देऊन फक्त शांततेचा वादविवाद.
आजही मला आवाज त्यांचा मनापासून येत नाही. आतूरलेले पाऊल माझं त्याच्याकडं वळत नाही.
एकञ राहीलो पण बोलायला वेळ नाही, असं कसं नातं आमचं कशालाच कशाचा मेळ नाही.
क्षण एक येईल असा, घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावरच थांबेल हा अर्धवट जीवन प्रवास.
असं नाही की मला बोलावसं वाटत नाही. खंत याचीच आहे माझ्यासाठी आजही त्याचं मन दाटत नाही.
मनोगत ...........