काय बरं विचार करत असतात माणसं...

सगळ्यांमध्ये असूनही स्वतःमध्ये नसतात.
तेव्हा...सगळं काही अनपेक्षित घडत राहत आणि मन अस्वस्थ असतं.
तेव्हा...एखाद्या साठी सर्वस्व अर्पण करुन त्यांची जाणीव नसते.
तेव्हा...एकांतांत असताना विचारांचं वादळ मन उद्वस्त करतं.
तेव्हा...अन् ...मी हे असे लिहिलेले मनापासून वाचतील. तेव्हा.....
---------------------------------

एकटं राहण्याचे अनेक तोटे आहेत.. पण एकच फायदा आहे.
माणसाला स्वतःचे इतरांसाठी काय महत्त्व आहे ते कळते आणि आपल्याचे महत्व कळते.
माणसाच्या आयुष्यात एकटेपण नसावं, प्रत्येकाला कोणीतरी आपलं असावं.
---------------------------------

सगळं छान असतं..जेव्हा आपल्यावर  
कोणाचं तरी ध्यान असतं.
खरचं.... प्रत्येकाजवळ आपल्या "हक्काचं" कोणीतरी असावं.
अन् मी कुठंही असलो तरी माझ्या "अक्काचं" असावं.
---------------------------------

काल ठरवलं होत थोडसं स्वार्थी व्हायचं आणि मस्त बेफिकीर होऊन रहायचं.
पण.... गंमतच झाली आज सकाळ झाली तरी शब्दांना बेफिकीरपणे वापरण्याची चूक करता नाही आली.
---------------------------------

काहीजण म्हणतात माणूस एकटा येतो अन् एकटाच जातो. मलाही काल पर्यंत वाटायचे एकटेपण वाईट.
पण ..... प्रत्यक्षात जेव्हा माणसाबरोबर "कोण" नसतं तेव्हा त्याचं "मन" असतं.
मेंदूने एकटेपणाची भीती दाखविली तरी मन सोबतीचे धैर्य देते.
---------------------------------

कठीण असतं जे आहे ते स्विकारत जगणं. लोकं जरी बोलत राहीले काहीही मागनं.
जरुरी नाही सगळ्यांना पटेलच आपलं वागणं. परीक्षा असते वेळेने घेतलेली, आपल्या शब्दाला जागणं.
---------------------------------

नेहमीच सगळ्यांना हरवून जिकंण जरी छान असलं .....
तरी स्वतः  कधीतरी हरून जिकंण अविस्मरणीय असतं.
असं हरताना फक्त स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि समोरच्यावर आंधळा विश्वास असावा लागतो.
---------------------------------

* आपण सर्वच एका गोष्टीत खूप प्रामाणिकपणे वागतो, एखादी गोष्ट अप्रामाणिकपणे करायची असते तेव्हा.......
* आपण सर्वच एका गोष्टींवर जास्त विचार करत नाही, जी आपल्याला माहीत नसते......
* आठवणीत येणारे क्षण फक्त साठवून ठेवते मन. तसं मन सगळ्यांना दिलेलं आहे जन्मापासून. काही माणसांना जगता येत नाही मनापासून....
---------------------------------

जन्माला आलेला प्रत्येक जीव हा अशुद्धच असतो कारण तो एकजीव असला तरी दोन जीवांच्या संगम होऊनच निर्माण होतो.
मग ज्यात दोन गोष्टींची भेसळ आहे ते शुद्ध कसे असू शकते ?
तसं प्रत्यक्षात काहीच शुद्ध नसते, स्वतःला वेगळं दाखवण्यासाठी ते माणसाच्या विचारांचं युद्ध असते.
या ब्रम्हांडात प्रत्येक गोष्ट ही कशा ना कशाच्या संयोग किंवा मिश्रणातून बनली आहे. साक्षात मानवी देह हा अनेक सुक्ष्म जीवाणू आणि विषाणू यांनी व्यापलेला आहे.
तो नाशिवंत आहे. मग शुद्ध ते काय ?  "वेळ" आणि माणसाचे "मन" केवळ शुद्ध असू शकते.
पण त्याचीही शुद्धता मोजण्याचं माप नाही. अर्थात .....कोण किती शुद्ध आहे आपआपल्या मनात हे ज्याचे त्यालाच माहीत  असते.

--------------------------------------------------

कधी कधी वाटतं संशोधनानं विजेच्या ताराद्वारे जग जोडलं , पण माणसाचं माणसाशी नातं तोडलं.
हातात टच चा मोबाईल असूनही एकमेकांच्या मनाशी टच नाही. सगळ्यांना वाचा (तोंड) दिलेलं असूनही फक्त व्यवहारी सिम्बाँल आणि स्माईली  यातच नातं राही.
मनात भाव नसेल तर आपूलकीचा गाव कसा दिसेल. शुभेच्छा देखील उस्टया किंवा भाड्याने घेतलेल्या,
कोणाच्या तरी ताटातील ( मोबाईल ) आपल्या ताटात टाकलेल्या...अर्थातच शिळ्या. हरवलेली माणसं आणि नाती शोधायची सोडून जो तो "पोकीमाँन" शोधतो आहे.
अहो.... मोबाईल मुव्ही बघताना आणि "कँडी क्रँश " खेळताना  आपण स्वतःच क्रँश झालो आहोत याच ज्याना राहीलं नाही भान,
कशी असेल त्यांच्यात नात्याची जाणं?
---------------------------------

आपण कशासाठी जगत असतो या प्रश्नाला उत्तर देताना बराच विचार करावा लागतो...
अर्थात उत्तर फारच सोपे असते. पण आपल्याला देता येत नाही.
कारण जन्म एवढा सहज नाही की तो शब्दात बांधता येईल.
माणूस स्वतःला ओळखत नसला तरी त्याचे कर्तुत्व त्याची ओळख जगाला करून देते.
---------------------------------

मला एकदा एकजण उपहासात्मक बोलला... तुला जीवनाकडे सकारात्मक  ( positive ) बघता आले असते तर आज तूही संसार करू शकला असतास.
मी म्हटले बरोबर आहे तुझं... मी सकारात्मक विचार कधीच केलेला नाही कारण माझ्या कृतीशील ( practical ) विचारांचा अंदाज सर्वांपेक्षा वेगळा होता.
मी सगळ्यांपेक्षा वेगळा राहाण्यातचं खूष आहे. तीच माझी ओळख आहे म्हणूनच तर तू आता माझ्याबरोबर हा विषय बोलतोयसं.
नाहीतर तुझ्यासारखे सकारात्मक विचाराचे भरपूर आहेत.
---------------------------------

मला नाही वाटत मी कोणासारखं तरी व्हावं आणि असं तर जराही नाही पटत की कोणीही माझ्यासारखं व्हाव.
ज्यानं - त्यानं आपआपल्या जागेवर कोणासाठी तरी मनात जाणीवपूर्वक असावं आणि कर्तव्यात एकनिष्ठ असावं.
असं जगावं की की कोणीतरी प्रत्येक क्षणात आपल्याला मागावं , समोरच्यानं न मागता आपण त्याच्यासाठी सर्वस्व त्यागावं.
---------------------------------

राञ का होते... असे एकदा मला माझ्या मेंदूने विचारले.
मी म्हटले तु दिवसभर सैरवैर आपल्यानां विसरून अनेकाच्या मोहात अडकतोस. कधी स्वतः फसतोस तर कधी कोणाला तरी फसवतोस.
मनाचे काहीएक न ऐकता सगळं स्वतःचे खरं करत असतोस म्हणूनच वेळेने राञ घडवून आणली आहे. राञी तू झोपलास की मन आपल्यानां भेटतं,
जे तुझ्या वागण्यानं नकळत दुखावले असतील त्यांना समजावून येत. कोणी एकटं रडत असेल तर त्याचे अश्रू पुसून येतं.
तू विस्कटलेलं सगळं आवरून येतं. असो हे तुला कळणार नाही... कारण तुला मनाच्या जागेवर कधी जाता येणार नाही.
---------------------------------

मनावर दिवसा राज्य करण्यासाठी मनःशक्ती, मनःस्थिती आणि मनोकामना या मनःपूर्वक असल्या की मेंदूची मती या मनाच्या ञिमूर्ती पुढे जात नाहीत.
या ञिमूर्ती म्हणजे साक्षात "दत्तगुरू" आहेत.
---------------------------------

नेहमीच भावनांचे लाड नाही करायचे, प्रेम देखील व्यवहारानेच करायचे...
असे मला लहानपणापासून नेहमी वाटायचे. जेव्हा कळलं की भावनांना मनात ठेवायचं असतं आणि प्रेमाला मनाच्या सुरक्षित कोपऱ्यात ठेवायचं असतं.
तेव्हापासूनचं भावनांनी भरलेल्या प्रेमळ नात्यांनां मी जपायला लागलो आहे. म्हणूनच आपलं नातं अतुट आहे.

मनोगत......

No comments:

Post a Comment